Success Story: साहिल पंडिता यांचे बालपण खूप कष्टात गेले. त्यांनी ५,२०० रुपयांच्या नोकरीपासून सुरुवात करून, हॉटेल मॅनेजमेंटच्या क्षेत्रात मेहनतीच्या जोरावर प्रोमिलर ही कंपनी स्थापन केली. प्रोमिलर ही हॉटेल मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे. ही हॉटेलमालकांना सल्लागार सेवा प्रदान करते.
साहिल पंडिता यांचे बालपण
साहिल पंडिता यांचा जन्म एका काश्मिरी पंडित कुटुंबात झाला. काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरादरम्यान त्यांच्या कुटुंबालाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. श्रीनगरमधील सरकारी बँकेत काम करणाऱ्या त्यांच्या वडिलांचीही नोकरी गेली. त्यानंतर त्यांचे कुटुंब चंदिगडजवळील एका गावात स्थायिक झाले. लहानपणापासूनच साहिल यांना अभ्यासापेक्षा आणि व्यावहारिक गोष्टींमध्ये जास्त रस होता. दहावीनंतर त्यांनी शाळा सोडली. मात्र, त्यांच्या पालकांनी त्यांना पुण्यात मेकॅनिकल इंजिनियरिंग डिप्लोमासाठी दाखल केले; परंतु तीन महिन्यांनंतर त्यांनी तेही सोडले.
२०११ मध्ये साहिल पंडिता यांचे पालक हुबळी, कर्नाटक येथे राहायला गेले. साहिलही कुटुंबासह राहू लागले. तिथे त्यांनी कॉल सेंटरची नोकरी करायचे ठरवले. मात्र, हुबळी येथील वर्तमानपत्रात क्लार्क्स इन हॉटेल, अशी नोकरीची जाहिरात पाहिल्यानंतर त्यांनी तिथे प्रयत्न करायचे ठरवले. कोणताही अनुभव नसताना त्यांना हॉटेल ऑपरेशन ट्रेनी प्रोग्राममध्ये ५,२०० रुपये दरमहा पगारावर नियुक्त करण्यात आले. तिथे त्यांना भांडी घासणे, बाथरूम साफ करणे, भाजी कापणे अशी अनेक कामे करावी लागत होती.
२०१२ मध्य, त्यांना ITC हॉटेल्समध्ये फ्रंट-ऑफिस असिस्टंट म्हणून नोकरी मिळाली. आयटीसी हॉटेल्समध्ये काम करताना साहिलने हॉटेलच्या इतर विभागांच्या कामकाजाचीही माहिती घेतली. त्यांची मेहनत आणि समर्पण पाहून व्यवस्थापनाने त्यांना आयटीसी हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये रुजू होण्यास सांगितले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्यात आले. मग तेथे हॉटेलमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
त्यानंतर ते आयटीसी हॉटेल्सच्या वेलकम लीड प्रोग्राममध्ये सामील झाले. २०१४ मध्ये त्यांना हयात रीजन्सी – दिल्ली येथे ३०,००० रुपये मासिक पगारासह टीम लीडर म्हणून नोकरी मिळाली. चार महिन्यांतच त्यांना पदोन्नतीने मॅनेजर फ्रंट ऑफिसमध्ये बदलण्यात आले. त्यानंतर त्यांनी ‘हयात’ सोडले आणि जानेवारी २०१६ मध्ये ते ताज हॉटेल्समध्ये ड्युटी मॅनेजर म्हणून रुजू झाले.
२०१८ मध्ये केली ‘प्रोमिलर’ची स्थापना
डिसेंबर २०१६ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी साहिल यांना एका नामांकित मालमत्ता व्यवस्थापन फर्ममध्ये नोकरी मिळाली. सुरळीत कामकाज, डेटा हाताळणी, वित्त व्यवस्थापन आणि एकाधिक मालमत्तेचे ऑडिट सुनिश्चित करणे, असे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. या क्षेत्रातील चांगला अनुभव घेतल्यानंतर साहिल यांनी जानेवारी २०१८ मध्ये ‘प्रोमिलर’ची स्थापना केली. ही एक हॉटेल मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे. ही कंपनी करोडो रुपये कमावते.