Success Story: आजपर्यंत तुम्ही व्यावसायिकांचा किंवा शेतकऱ्यांचा प्रेरणादायी प्रवास पाहिला असेल. ज्यातील बर्याच यशस्वी व्यक्ती त्यांची चांगल्या पगाराची नोकरी सोडून नव्या क्षेत्रात यश मिळवण्याचा प्रयत्न करतात. यातील अनेक जण मेहनतीच्या जोरावर यश मिळवतात. आज अशाच एका तरुणाचा प्रेरणादायी प्रवास आम्ही घेऊन आलो आहोत, ज्याने मेकॅनिकल इंजिनीअरची नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्रातील दौंड येथील समीर डोंबे यांनी आपली मेकॅनिकल इंजिनीअरची नोकरी सोडून अंजीर शेतीतून दीड कोटी रुपयांचा वार्षिक व्यवसाय केला. समीरने पारंपरिक पद्धतींपासून वेगळे काहीतरी करून सुपरमार्केट आणि ऑनलाइन माध्यमातून अंजीर विकून यश मिळवले आहे.
मेकॅनिकल इंजिनीअरची नोकरी सोडून केली शेती
समीर डोंबे हे मेकॅनिकल इंजिनीअर आहेत. त्यांनी आपली ४०,००० रुपये प्रति महिना नोकरी सोडली आणि आपल्या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय करण्याचे ठरवले. हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा निर्णय होता. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचे कुटुंबीय नाराज होते. पण, समीर आपल्या निर्णयावर ठाम राहिला. त्याने अंजीर शेतीची आपल्या कुटुंबाची जुनी परंपरा पुढे नेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या निर्णयाला कुटुंबीयांनी आणि मित्रांनीही साथ दिली नाही. समीरला शेतीत यश मिळणार नाही, असे सर्वांना वाटत होते. पण, समीरने सगळ्यांनाच चुकीचं ठरवलं. आज तो अंजीर विकून वर्षाला दीड कोटी रुपयांचा व्यवसाय करत आहे.
हळूहळू समीरने आपल्या शेताचे क्षेत्र अडीच एकरांवरून पाच एकरांपर्यंत वाढवले. त्याने अन्न प्रक्रिया युनिटही स्थापन केले. ‘पवित्रक’ ब्रँडचे अंजीर जाम आता ऑनलाइनही उपलब्ध आहेत. लॉकडाऊनच्या काळात समीरने अनेक ग्राहकांशी संपर्क साधला. त्याने व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ऑर्डर घेण्यास सुरुवात केली. लॉकडाऊनच्या काळात सुपरमार्केटमध्ये फळे नसतानाही समीरची विक्री सुरूच होती. या कालावधीत त्याने ऑनलाइन ऑर्डरद्वारे १३ लाख रुपये कमावले. समीरचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी खूप प्रेरणादायी आहे.