Success Story: बिहारमधील दरभंगा येथील रहिवासी श्रवण कुमार रॉय यांनी हे सिद्ध केले आहे की, जर योग्य नियोजन व मेहनत केली, तर शेतीशी संबंधित व्यवसायातही चांगला नफा मिळवता येतो. २०१९ मध्ये श्रवण हे अदानी ग्रुपमध्ये वार्षिक आठ लाख पगारावर काम करीत होते; परंतु त्याच वेळी श्रवण यांच्या मनात गावी जाऊन शेती करण्याचा विचार मनात आला. त्यांनी याविषयी आपल्या पत्नीसमोर मन मोकळे केले, ज्यावर त्यांच्या पत्नीने नाराजी व्यक्त केली. परंतु, त्यावेळी श्रवण यांनी, “पत्नीला आता कमावतो त्याहून जास्त कमाई करून दाखवेन”, असे आश्वासन दिले.
त्यानंतर गावी परतल्यानंतर श्रवण यांनी मखानाचा व्यवसाय सुरू केला; पण त्याच वेळी कोरोना महामारी आली. लॉकडाऊनदरम्यान, श्रवणला त्याच्या बचतीवर अवलंबून राहावे लागले आणि त्याला नातेवाईक, मित्रांकडून टोमणे ऐकावे लागले. पण, श्रवण यांनी हार मानली नाही. आज श्रवण यांची कंपनी वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये मखानावर आधारित स्नॅक्स बनवत आहे. त्यांच्या प्रोसेसिंग युनिटमध्ये मखाना पॅकिंगचे काम सुरू आहे. श्रवणने मखाना पीठदेखील विकसित केले, जे कुकीज, इडली, डोसा व कुल्फी यांसारख्या पदार्थांमध्ये वापरले जाते.
श्रवण यांनी त्यांच्या मखाना उत्पादनांमध्ये २२ प्रकारची उत्पादने विकसित केली आहेत. त्यामध्ये मखाना कुकीज विशेष लोकप्रिय आहेत.
मखाना व्यवसायाची संकल्पना कशी सुचली?
श्रवण त्याच्या कुटुंबात व्यवसाय करण्याची परंपरा कधीच नव्हती. २०१० मध्ये त्यांच्या कॉलेजच्या काळात, त्यांनी एक प्रकल्प म्हणून मखाना पॉपिंग मशीन डिझाईन केली होती. त्यावेळी दक्षिण भारतात मखाना लोकप्रिय नव्हता. त्यांनी या मशीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर अनेक लोकांनी त्याला मखानाबद्दल माहिती विचारण्यास सुरुवात केली. येथूनच त्यांना मखाना व्यवसायाची संकल्पना सुचली.
१७ हजारांनी व्यवसाय सुरू केला
श्रवण यांनी १७ हजार रुपयांच्या अल्प रकमेतून मखाना व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल १.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मखानाच्या आरोग्यदायी फायद्यांमुळे त्यांच्या उत्पादनांची मागणी सातत्याने वाढत आहे. श्रवण त्यांची उत्पादने ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे विकतात.