Success Story: आज आम्ही तुम्हाला अशा एका उद्योजकाची यशोगाथा सांगणार आहोत, ज्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर फणींद्र साम यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली; परंतु त्यांना स्वतःचा व्यवसाय उभारण्याची इच्छा होती. मात्र, त्यांच्याकडे मर्यादित भांडवल होते. त्यामुळे त्यांनी त्यांचा महाविद्यालयीन मित्र सुधाकर पसुपुनुरी आणि चरण पद्माराजू यांच्यासोबत पाच लाख रुपयांची गुंतवणूक करून व्यवसाय सुरू केला. हा प्रवास सोपा नव्हता; पण ठाम विश्वास आणि टीमवर्कच्या जोरावर त्यांनी ते शक्य करून दाखवले.
RedBus ची कल्पना
RedBus ची कल्पना फणींद्र साम यांच्या वैयक्तिक अनुभवातून आली. सणासुदीच्या वेळी बसचे तिकीट घरी बुक करताना त्यांना आणि इतर लोकांना जो त्रास होतो, तो लक्षात घेतल्यावर त्यांना ही युक्ती सुचली. ही प्रक्रिया ऑनलाइन आणि सोपी करण्याची कल्पना त्यांनी त्यांच्या मित्रांसोबत शेअर केली. २००७ मध्ये फणींद्र यांचे दोन मित्र आणि त्यांनी मिळून रेडबस प्लॅटफॉर्म सुरू केला. सुरुवातीच्या काळात त्यांना काही अडचणी आल्या. परंतु हळूहळू या प्लॅटफॉर्मची लोकप्रियता वाढली आणि लोकांनी काही क्लिकमध्ये तिकीट बुक करायला सुरुवात केली.
५ लाख ते ७ कोटी रुपयांचा प्रवास
redBus ने भारतीय बाजारपेठेत बस तिकीट आरक्षणाला वेगळी दिशा दाखवली आहे. पूर्वी लोकांना तिकीट काढण्यासाठी तासन् तास रांगेत उभे राहावे लागत होते. आता रेडबसने ही आरक्षण सुविधा ऑनलाइन केली. त्यामुळेच रेडबसचा प्लॅटफॉर्म भारतीयांमध्ये अधिकाधिक लोकप्रिय झाला. २००७ मध्ये त्याला पहिला निधी मिळाला; ज्यामुळे कंपनीचा विस्तार होऊ शकला. २०१३ मध्ये इबीबो ग्रुपने ८२८ कोटी रुपयांना रेडबस विकत घेतले. त्यानंतरही फणींद्र समा यांनी कंपनीच्या विस्तारात मोलाची भूमिका बजावली आणि ती आंतरराष्ट्रीय स्तरावर नेली.
फणींद्र साम यांचा हा प्रेरणादायी प्रवास आज अनेक भारतीयांसाठी आदर्श ठरला आहे. स्वप्ने पूर्ण करण्यासाठी साधनांपेक्षा योग्य वृत्ती आणि मेहनत महत्त्वाची आहे हेच यातून दिसून येते.