Success Story: फणींद्र सामा हे भारतीय स्टार्टअप इकोसिस्टममधील एक मोठे नाव आहे. हे तरुण उद्योजक रेडबस या बस तिकीट प्लॅटफॉर्मचा सह-संस्थापक आहेत. फणींद्र सामा यांनी जेव्हा बसचे तिकीट प्लॅटफॉर्म रेडबस सुरू करण्याचा विचार केला होता, तेव्हा त्यांच्याकडे यासाठी केवळ पाच लाख रुपये होते, पण त्यांनी हार मानली नाही. त्या गुंतवणुकीतून त्यांनी प्लॅटफॉर्म सुरू केला आणि हळूहळू त्यांच्या कमाला यश मिळत गेले आता त्यांच्या कंपनीची किंमत ६,९८५ कोटी रुपये आहे.
फणींद्र सामा यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते एक नोकरी करत होते, पण त्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, फणींद्र यांना त्यांच्याकडे कमी रक्कम असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण, तरीही त्या व्यक्तीने हार मानली नाही आणि तीन मित्रांना हाताशी घेऊन त्यांनी एक मोठा व्यवसाय उभा केला.
कॉलेजमधील मित्रांसह सुरू केला व्यवसाय
फणींद्र सामा यांनी कॉलेजमधील मित्र सुधाकर पसुपुनुरी आणि चरण पद्माराजू यांच्यासह ‘रेड बस’च्या व्यवसायाचा पाया रचला. रेडबस सुरू करण्यापूर्वी तिघे मित्र वेगवेगळ्या कंपनीत काम करत होते. नोकरी करत असताना फणींद्र सामा यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला होता. मात्र, यासाठी त्यांना कोणाची तरी पार्टनरशीप हवी होती, म्हणून त्यांनी आपल्या दोन मित्रांना या व्यवसायाबद्दल माहिती दिली. त्यांच्या मित्रांनाही या व्यवसायाची कल्पना आवडली. २००६ मध्ये त्यांनी सुधाकर पसुपुनुरी आणि चरण पद्माराजू यांनी मिळून रेडबस सुरू केली.
हा व्यवसाय सुरू करण्यामागे कारण काय?
फणींद्र सामा यांना सणासुदीच्या काळात आपल्या शहरात जाण्यासाठी बसच्या तिकिटासाठी खूप संघर्ष करावा लागला. कितीतरी मेहनतीनंतर त्यांना तिकीट मिळालं, याचवेळी त्यांना बिझनेसची कल्पना सुचली होती.
फणींद्र सामा यांच्या या व्यावसायिक कल्पनेने भारतातील बस तिकीट प्रक्रियेत चांगला बदल घडवून आणला. २००७ मध्ये रेडबसला $१ दशलक्षचा पहिला निधी मिळाला. मोठ्या गुंतवणूकदारांच्या आणि निधीच्या मदतीने, रेडबस काही वर्षांतच ऑनलाइन तिकीट बाजारात अव्वल ठरले.