Success Story: मुंबईत स्वप्न साकारण्यासाठी आलेली कोणतीच व्यक्ती रिकाम्या हाताने परत जात नाही. कित्येक दिग्गज कलाकारांपासून उद्योजकांपर्यंत अनेकांनी मुंबईतून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. आज आम्ही अशाच एका उद्योजकाचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहोत, ज्यांनी मुंबईत येऊन मेहनतीच्या जोरावर करोडोंचा व्यवसाय सुरू केला.
रिअल इस्टेट उद्योजक सुभाष रुणवाल हे १९६४ मध्ये केवळ १०० रुपये घेऊन मुंबईत आले होते आणि आता ते तब्बल ११,५०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह अब्जाधीश झाले आहेत. इतकचं नव्हे तर सुभाष रुणवाल हे बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचे शेजारीदेखील आहेत.
सुभाष रुणवाल यांच्या आयुष्यातील सुरुवातीचा काळ (Success Story)
सुभाष रुणवाल यांनी पुण्यातून कॉमर्स शाखेत पदवीचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर १९६४ मध्ये ते त्यांचे अकाउंटंट होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईमध्ये नोकरीच्या शोधात आले. त्यावेळी ते फक्त १०० रुपये घेऊन आले होते. १९६७ मध्ये त्यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांना अमेरिकेतील अर्न्स्ट अँड यंगकडून उत्तम पगारासह नोकरीची ऑफर मिळाली. मात्र, परदेशात गेल्यावर तिकडचे वातावरण, संस्कृती आणि जीवनशैलीमुळे त्यांनी काही महिन्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १९७८ मध्ये त्यांनी रिअल इस्टेट व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्यांनी दीड वर्षे कंपनीत काम केले.
सुभाष रुणवाल यांचे पूण झाले स्वप्न (Success Story)
सुभाष रुणवाल यांनी पहिली गुंतवणूक ठाण्यातील १०,००० चौरस फूट आकाराच्या २२ एकर जमिनीत केली होती. या जागेवर त्यांनी कीर्तिकर अपार्टमेंट नावाची गृहनिर्माण संस्था बांधण्यास सुरुवात केली. त्यांच्या कामामुळे ते कमी किमतीच्या गृहनिर्माण विभागातील विकासक म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आले. १९८१ मध्ये त्यांनी १६ टॉवर क्लस्टर बांधून आपला व्यवसाय आणखी वाढवला.
त्यानंतर सुभाष रुणवाल यांनी मालमत्ता व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यांच्या व्यवसायात दोन मुलं सहभागी झाले, त्यानंतर रुणवाल ग्रुपने निवासी प्रकल्पांव्यतिरिक्त मॉल बांधण्यास सुरुवात केली. त्यांच्या पहिल्या मॉलचे उद्घाटन २००२ मध्ये अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केले होते. तसेच त्यांनी घाटकोपरमध्ये १.२ दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळ असलेला आर-सिटी मॉलदेखील बांधला. मध्यमवर्गीय लोकांना परवडणारी घरं बांधण्यात रुणवाल कंपनीचा उद्योग क्षेत्रात मोठा वाटा आहे.