success story: पुण्यातील सौरभ गाडगीळ हे प्रसिद्ध पीएन गाडगीळ ज्वेलर्सचे प्रमुख आहेत. भारतातील अब्जाधीशांमध्ये आता हे नवे नाव जोडले गेले आहे. आपली कंपनी शेअर बाजारात सूचिबद्ध झाल्यानंतर अवघ्या महिन्याभरात सौरभ यांनी ही कामगिरी केली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, IPO पासून सौरभ गाडगीळ यांची एकूण संपत्ती $१.१ बिलियनपेक्षा जास्त झाली आहे. आज आम्ही याच सौरभ गाडगीळ यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.
सौरभ गाडगीळ यांचे बालपण
सौरभ गाडगीळ यांचा जन्म पुण्यामध्ये झाला. ४७ वर्षीय सौरभ गाडगीळ यांना एक दशकापूर्वी पुण्यातील कौटुंबिक व्यवसायाचा वारसा मिळाला होता. ते ज्वेलर्स-व्यावसायिक विद्याधर गाडगीळ यांचा मुलगा आणि पीएन गाडगीळ ज्वेलर्सच्या पुणे युनिटचे संस्थापक दाजीकाका यांचे नातू आहेत. सौरभ गाडगीळ हे सहाव्या पिढीतील ज्वेलर्स आहेत. कौटुंबिक व्यवसायाला त्यांनी नवी दिशा दाखवली आहे. पीएन गाडगीळ ज्वेलर्सच्या शेअर्समध्ये गेल्या महिन्यात कंपनीच्या IPO नंतर ६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सौरभ गाडगीळ यांचे शिक्षण
सुरुवातीच्या शिक्षणानंतर सौरभ गाडगीळ यांनी १९९८ मध्ये बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे येथून बॅचलर ऑफ कॉमर्स (BCom) पदवी घेतली. नंतर त्यांनी टेक्सास, ऑस्टिन, टेक्सास (यूएसए) विद्यापीठातून यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये पीएचडी पूर्ण केली. तसेच त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये इंटर्नशिपही केली. या ठिकाणी सौरभ यांनी कौटुंबिक व्यवसायाविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी सोन्याच्या बाजाराचा बारकाईने अभ्यास केला. सौरभ यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक कामाव्यतिरिक्त ते एक कुशल बुद्धिबळपटूदेखील आहेत. त्यांनी अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.
१८३२ मध्ये झाली व्यवसायाची स्थापना
पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेड ही भारतातील सर्वात जुन्या ज्वेलरी कंपन्यांपैकी एक आहे. याची स्थापना गणेश नारायण गाडगीळ यांनी १८३२ मध्ये केली होती. सुरुवातीला गणेश गाडगीळ सांगलीतील फूटपाथवर सोन्याचे दागिने विकायचे. नंतर त्यांनी पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सची स्थापना केली. आज पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सची महाराष्ट्र आणि गोव्यात ३९ रिटेल स्टोअर्स आहेत. तसेच कॅलिफोर्नियातही एक दुकान आहे.