Success Story: जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती आपल्यासह अनेक सुख, दुःख, आव्हांनी भरलेले आयुष्य घेऊन येते. हळूहळू आपल्याला आपल्या आवडी-निवडी कळू लागतात. काहीजण आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि जबाबदाऱ्यांमुळे आपली आवड बाजूला ठेऊन पडेल ते काम करतात. पण सगळेच दिवस सारखे नसतात. आज आम्ही अशाच एका यशस्वी युट्यूबरचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहोत.
हा प्रेरणादायी प्रवास राजेश रवानी यांचा असून राजेश रवानी यांनी २० वर्षांहून अधिक काळ ट्रक चालकाचे काम केले आहे. पण, त्यांच्या जेवण बनवण्याच्या आवडीमुळे त्यांना ‘R Rajesh Vlogs’ नावाचे YouTube चॅनेल सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. सध्या त्यांच्या YouTube चॅनेलचे १.८९ मिलियन सब्सक्राइबर्स आहेत आणि ते महिन्याला लाखो रुपये कमावतात.
झारखंडमध्ये जन्मलेले राजेश यांना बालपणापासून आर्थिक समस्येचा सामना करावा लागत होता. त्यांचे वडीलही एक ड्रायव्हर होते. कुटुंबात ते एकटेच कमावते होते, त्यामुळे अनेकदा त्यांना कर्ज घेतलेल्या पैशांवर अवलंबून राहावे लागत होते.
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये राजेश यांनी त्यांच्या गंभीर अपघाताबद्दल सांगितले. हाताला एकदा गंभीर दुखापत झाली होती, तरीही त्यांनी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आणि आपले नवीन घर पूर्ण करण्यासाठी गाडी चालवणे चालू ठेवले.
जेवण बनवण्याच्या आवडीमुळे बदलले आयुष्य
पण दिवस बदलतात; राजेश यांच्या आवडीमुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. या मुलाखतीत राजेश यांनी त्यांच्या आर्थिक परिस्थितीविषयी माहिती दिली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, ट्रक चालवण्याच्या कामातून ते दरमहा २५,००० ते ३०,००० रुपये कमावतात. तसेच आता YouTube चॅनेल हे त्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत बनले आहे, यूट्यूबच्या माध्यमातून आता ते दरमहा चार-पाच लाख रुपये कमावतात, ज्यात त्यांचा सर्वोत्तम महिना १० लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
राजेशने त्यांचे यूट्यूब चॅनेल सुरू झाल्याचा क्षण सांगितला. त्यांचा पहिला व्हायरल व्हिडीओ जिथे त्यांनी आपला चेहरा न दाखवता बनवला होता. पण, त्यांना त्यांच्या दर्शकांनी चेहरा उघड करण्यास सांगितले. त्यांच्या या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाल्या होत्या.
कुटुंबाची मिळाली साथ
ट्रक ड्रायव्हिंग आणि यूट्यूब करिअरचा समतोल राखणे त्यांच्यासाठी खूप आव्हानात्मक होते, परंतु राजेश रवानी यांच्या कुटुंबीयांनी त्यांना पाठिंबा दिला. आपल्या आवडीमुळे आणि मेहनतीच्या जोरावर राजेश यांना हे यश मिळाले आहे.
© IE Online Media Services (P) Ltd