Aalim Hakim celebrity hairdresser Success story : असं म्हणतात कोणतेही स्वप्न लहान नसते. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर लोक आयुष्यात मोठे नाव कमावू शकतात. आज आपण लोकप्रिय हेअरस्टायलिश अलीम हकीमविषयी जाणून घेणार आहोत. अॅनिमलमधील रणबीर कपूरचा लूक असो किंवा वॉरमधील हृतिक रोशनचा लूक, अगदी एमएस धोनीचा विंटेज लांब केसांचा लूक असो, त्याने प्रत्येकवेळी त्याची जादू दाखवली आहे. त्याने बॉलीवूड, साउथच्या सिनेस्टारपासून अनेक क्रिकेट खेळाडूंच्या अप्रतिम अशा हेअरस्टाइल केल्या आहेत. अलीम हा ग्लॅमर विश्वातील सर्वात लोकप्रिय असा हेअर स्टायलिस्टपैकी एक आहे. अलीमची हेअरस्टाइलची फी एक लाखापासून सुरू होते. पण, अलीमला हे सर्वकाही इतक्या सहजपणे मिळाले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलीम हकीमचा संघर्ष, वयाच्या नवव्या वर्षी वडील वारले

अलीमला इथेपर्यंत पोहचायला प्रचंड संघर्ष करावा लागला. त्याचा जन्म एका लोकप्रिय हेअर स्टायलिशच्या घरी झाला होता. हेअर स्टाइलिंगचा वारसा त्याला त्याच्या वडिलांकडून मिळाला. त्याचे वडील हकीम कैरानवी हे त्या काळचे लोकप्रिय हेअर स्टायलिश होते. दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, सुनील दत्त, शशी कपूर इत्यादी त्यांचे त्याकाळचे ग्राहक होते.
हकीम कैरानवी यांचा वयाच्या ३९ व्या वर्षी मृत्यू झाला तेव्हा अलीम फक्त ९ वर्षांचा होता. त्यावेळी त्याच्या वडिलांनी स्वत:चा एक ब्रॅण्ड निर्माण केला होता. अलीमची इच्छा होती की वडिलांचा हा वारसा पुढे न्यावा. अलीमचे वडील वारले तेव्हा त्यांच्या बँक अकाउंटमध्ये फक्त १३ रुपये होते. मनीष पॉलच्या पॉडकास्टमध्ये अलीम सांगतो, “मला माझ्या वडिलांचा वारसा पुढे न्यायचा होता. ते जिथे थांबले, तिथून मला सुरुवात करायची होती, पण ते हकीम होते.”

वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी अलीमच्या खांद्यावर आली. त्याने त्याच्या घराच्या बाल्कनीमध्ये सलून उघडले. तिथे तो त्याच्या मित्रांची हेअर स्टाइल करायचा. त्यावेळी इतर अनेक फॅन्सी सलून होते.
याविषयी अलीम सांगतो, “मी घरी जायचो आणि काम करायचो. माझ्या घराच्या बाल्कनीत माझी कामाची जागा होती. तिथे एक छोटा पंखा होता. मी थोडे पैसे जमवले आणि सेकंड हँड एसी खरेदी केला. त्यावेळी सेकंड हँड एसीसुद्धा ३० हजार रुपयांचा होता, त्यामुळे महिन्याला २००० ते ३००० हजार रुपये इएमआय (EMI) भरायचो. जेव्हा मी इएमआय पूर्ण भरले तेव्हा मला वाटले की मी एक श्रीमंत माणूस आहे. माझ्याकडे एसी असलेले दुकान आहे. १९९० च्या दशकात माझ्यासाठी ती अभिमानाची गोष्ट होती.”

मेहनतीच्या जोरावर कमावले नाव

कॉलेजमध्ये असताना जेव्हा कोणाला डॉक्टर किंवा इंजिनिअर बनायचे होते, तेव्हा अलीमला हेअर स्टायलिश बनायचे होते. त्यावेळी अनेक जण त्याची चेष्टा करत म्हणायचे, “तुला न्हावी बनायचं आहे? तुला लोकांच्या केसांना शाम्पू करायचा आहे का?”
जेव्हा L’Oreal ने अलीचे टॅलेंट पाहिले तेव्हा त्यांनी त्याला शिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय हेअरस्टायलिशला मदत करण्यासाठी परदेशात पाठवले. जेव्हा तो परत आला तेव्हा तो टेक्निकली खूप काही शिकला होता आणि त्यानंतर त्याचे ग्राहक वाढले.

अलीमला हेअरस्टायलिशकडे नकारात्मक दृष्टीने पाहणाऱ्या लोकांची मानसिकता बदलायची होती. ९० च्या दशकात अलीमने स्वत:ची ओळख निर्माण केली. अनेक कलाकार त्याच्याकडे येऊ लागले. सलमान खान, फरदीन खान, सैफ अली खान, सुनील शेट्टी आणि अजय देवगण त्याचे नेहमीचे ग्राहक झाले. अलीम बॉलीवूडपर्यंतच थांबला नाही, तो रजनीकांत, प्रभास, ज्युनियर एनटीआर, राम चरण, महेश बाबू आणि इतर बऱ्याच साउथ इंडियन सिनेस्टारची हेअर स्टाइल करतो; तसेच धोनी, विराट कोहलीसारख्या दिग्गज क्रिकेटर्सचीसुद्धा हेअर स्टाइल करतो.

अलीमने अनेकांचे लूक बदलले. त्याच्या या कलेने प्रत्येक वेळी सेलिब्रिटी एका वेगळ्या अंदाजात चाहत्यांसमोर दिसले. त्याची मेहनत, कधीही हार न मानण्याची जिद्द आणि कामात सातत्य, यामुळे तो लोकप्रिय हेअरस्टायलिस्ट बनला आहे.
ब्रुट इंडियाशी बोलताना, अलीमने साधारण केस कापण्यासाठी किती फी घेतो, याविषयी सांगितले. तो म्हणाला, “माझी फी अगदी साधी सोपी आहे, जी प्रत्येकाला माहीत आहे की मी किती घेतो; जी कमीत कमी एक लाख रुपयांपासून सुरू होते.”

ग्लॅमरच्या दुनियेत हजारो हेअर स्टायलिस्ट आहेत, पण त्यात अलीम हकीमसारखा कोणी नाही. त्याने लोकांचा न्हावीबद्दलचा दृष्टिकोन बदलला आणि मेहनतीच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.