Sunny kumar a samosa seller who cracked NEET(UG): प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं आणि ते पूर्ण करण्यासाठी जो तो आपापल्या परीनं अथक मेहनत करत असतो. स्वप्नपूर्तीसाठी रात्रंदिवस एक करावा लागतो, असं म्हणतात. त्यातूनही गरिबी वाट्याला आली असेल, तर मग भुकेला काही मिळाले न मिळाले ते न पाहता कष्ट, मेहनत आणि प्रयत्न सुरूच ठेवावे लागतात, आणि हेच प्रयत्न आपल्याला यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कितीही अपयश आलं, संकटं आली तरी ती मागे टाकून सतत पुढे जाण्याची जिद्द आणि आशा असली की सगळं काही शक्य होतं. अशाच काहीशा संघर्षाला सामोर जात एका १८ वर्षांच्या समोसा विक्रेत्यानं आपल्या कष्टाचं चीज करून दाखवलं आहे. डॉक्टर व्हायचं स्वप्न मनात बाळगून या पठ्ठ्यानं पहिल्याच प्रयत्नात NEET(UG) 2024 च्या परीक्षेत यश मिळवलं.

सनी कुमारचा थक्क करणारा प्रवास (Who is Sunny Kumar)

नोएडा येथे समोसा विकून आपल्या पोटाची खळगी भरणारा सनी कुमार सध्या चर्चेत आहे. सनीनं NEET(UG) 2024 च्या परीक्षेत ७२० पैकी ६६४ गुण मिळवले आणि आपलं स्वप्न साकार केलं. नोएडामध्ये सनी कुमारचं समोशाचं एक छोटंसं दुकान आहे. तिथे तो रोज संध्याकाळी गरमागरम तेलात कुरकरीत समोसे बनवून विकतो.

समोरे विकून NEET मध्ये उत्कृष्ट गुण मिळविण्यासाठी सनी कुमारला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही त्यानं अभ्यास आणि व्यवसायासाठी करावं लागणारी कामं यामध्ये संतुलन राखलं.

समोसा विक्रेता ते अभ्यासाची कसरत (Samosa seller cracked NEET)

दिवसभर काम करून सनीला (Sunny Kumar) अभ्यासादरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सकाळी शाळेत गेल्यानंतर तो दुपारी २ पर्यंत फ्री व्हायचा. त्यानंतर सनी नोएडा सेक्टर १२ मध्ये रस्त्याच्या कडेला समोसा स्टॉल लावायचा. जिथे तो दिवसाचे पाच ते सहा तास अथकपणे काम करायचा. पूर्ण दिवस काम केल्यानंतर तो घरी परतायचा ते फक्त अभ्यास करण्यासाठी. रात्रभर जागून सनी अभ्यास करायचा.

सनीनं (samosa seller cracked NEET) ऑनलाइन क्लासेसद्वारे परीक्षेची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून दाखवलं. त्याची धडपड पाहून कोचिंग संस्थेनं त्याला सहा लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली आणि वैद्यकीय महाविद्यालयाचं शिकवणी शुल्क भरण्याचंही आश्वासन दिलं.

हेही वाचा… जिद्दीला सलाम! अपयशाची रांग असूनही केले अथक प्रयत्न अन् झाले जगातील सर्वात श्रीमंत IITian’sपैकी एक; जाणून घ्या विनोद खोसला यांची यशोगाथा

यादरम्यान एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सनी म्हणाला, “मला अद्याप महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळालेला नाही; पण मला भविष्यात चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे.”

भाड्याची खोली अन् आईचा पाठिंबा

‘Physicswallah’चे संस्थापक अलख पांडे यांनी भेट देऊन त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर सनीचं हे यश जगासमोर आलं. अलख पांडे यांनी सनीच्या भाड्यानं राहत असलेल्या घरालादेखील भेट दिली; जिथे तो त्याच्या कुटुंबासह राहतो.

घराच्या भिंतींवर अनेक अभ्यासाच्या नोट्स चिकटवलेल्या पाहून अलख पांडे यांना धक्काच बसला. अलख पांडे यांच्याशी संवाद साधताना सनी असंही म्हणाला की, त्याच्या वडिलांचा कोणताही पाठिंबा नसल्यामुळे त्याला समोसे विकावे लागतात. परंतु, त्याच्या आईनं त्याच्या स्वप्नाला नेहमीच पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा… Truck Driver Turned YouTuber: कर्ज घेऊन एकेकाळी चालवायचे घर अन् आता महिन्याला कमावतात १० लाख, वाचा युट्यूबर ट्रक चालकाचा रंजक प्रवास

सनीनं त्याला मिळणाऱ्या सर्व समर्थनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, सनीनं असंही सांगितलं, “मी खूप मेहनत केली आहे. पण, मला अशा प्रकारे व्हायरल व्हायचं नाही. मी काहीतरी मोठं यश मिळवल्यानंतर लोकांनी मला ओळखावं, असं मला वाटतं.”

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny kumar a samosa seller who cracked neet ug in first attempt wanted to become a doctor success story dvr