डॉ. भूषण केळकर/ डॉ.मधुरा केळकर
घातांकीय तंत्रज्ञान म्हणजे एक्सपोनेन्शियल टेक्नॉलॉजी. तंत्रज्ञान लिनियर म्हणजे एकरेषीय असू शकतं किंवा एक्सपोनेन्शियल म्हणजे घातांकीय. यापुढच्या काळामध्ये तुम्ही कोणत्याही क्षेत्रात पदवी घेत असाल, तरी तंत्रज्ञानाचा रेटा हा घातांकीय असणार आहे आणि या प्रचंड वेगाला तोंड देण्यासाठी तयारी केली नाही तर घातांकीय तंत्रज्ञान आघात करेल म्हणून ‘आघातांकीय!’
‘पहिलं पाऊल’ हे सदर या आघातांकीय बदलांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी, कारियरवर आघात न होता उत्तम आणि फ्युचर-प्रूफ करिअर घडवण्यासाठी, पदवीदरम्यान व पुढेही काय तयारी करायची याबद्दल तर आहेच. परंतु त्याआधी हे बदल का आहेत आणि आपण विशेष प्रयत्न का करायचे आहेत ते समजण्याकडे आपण लक्ष देऊया, कारण ‘काय करायचं’ यापेक्षा सुद्धा ‘का करायचं’ हे समजणं माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचं आहे. याचं कारण असं की ‘काय करायचं’ यासाठी तुम्हाला गुगल किंवा चॅट जीपीटी उपलब्ध आहे, परंतु गुगल किंवा चॅट जीपीटी तुमच्या स्वप्नात येऊन ‘तुम्ही ते का करा’ हे सांगणार नाहीये. म्हणून आपला आजचा हा संवाद!
तुम्हाला आजच्या संवादात दोन महत्वाची कारणे सांगतो. पहिले कारण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा, त्यावर आधारित ‘इंडस्ट्री 4.0’ (आणि आता ‘इंडस्ट्री 5.0’) चा विलक्षण वेग आणि त्याची व्याप्ती. एक पुणेरी सल्ला म्हणून मी सांगतो की याविषयी माझ्या ‘इंडस्ट्री 4.0’ या मराठी पुस्तकामध्ये मी विस्ताराने लिहिलेले आहेच. आणि दुसरे कारण म्हणजे प्रचंड वाढलेली स्पर्धा !
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) २०२५ हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्तेचे (ए आय) वर्ष म्हणून जाहीर केले आहे. सुंदर पिचाईने असं जाहीर केलं की २०२४ मध्ये गुगलमध्ये २५ कोडींग आर्टिफिशियल इंटेलिजन्स केलेले आहे. ‘नो-कोड’सारख्या तंत्रज्ञानामुळे सामान्य प्रोग्रामिंगचे असंख्य जॉब्स हे नाहीसे होणार आहेत. आणि आपण या भ्रमात राहायला नको की हे फक्त उच्च तंत्रज्ञानाचा क्षेत्रात होईल. ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याच्यामुळे कला, वाणिज्य, शास्त्र, वैद्याकीय, स्थापत्य आणि सर्वच क्षेत्रांमध्ये कमी-अधिक वेगाने आणि कमी-अधिक फरकांनी आघातांकीय बदल घडतील.
आपल्याला पदवीदरम्यान सावध राहण्याचं दुसरं कारण म्हणजे सरळ रेषेत न वाढता घातांकीय पद्धतीने वाढणाऱ्या तंत्रज्ञानाच्या बरोबर प्रचंड वाढलेली स्पर्धा. आपली लोकसंख्या तर प्रचंड आहेच पण वय वर्ष ३५ च्या खाली ६५ टक्के जनता आहे. जपानचे सरासरी वय ५० वर्षं, जर्मनीचं ४६ वर्षं आणि भारताचे २९ वर्षं आहे! ‘डेमोग्राफिक डिव्हीडंड’ ही शक्ती असली, तरी प्रचंड स्पर्धा हा त्याचा अपरिहार्य परिपाक आहे. आज-काल ‘जेईई’ आणि ‘नीट’ यांच्या तयारीसाठी आठवीपासून फाउंडेशन क्लासेस सुरू आहेत. आम्हाला हेही खात्रीपूर्वक माहिती आहे की या क्लासेसच्या एंट्रन्ससाठी पण क्लासेस आहेत!! मला तर वाटतं यापुढे प्रेग्नेंसी किट बरोबरच स्पर्धा परीक्षांची कूपन्स मिळू लागतील!!
आपण सगळ्यांनी वाचलं असेल की प्रख्यात आयआयटी मुंबई मधल्या सुद्धा नोकरी योग्य असणाऱ्या पैकी २५ मुलांना यावर्षी नोकरी मिळालेली नाही. जणू हे कमी आहे म्हणून आयआयटी मुंबई मधील काही मुलांनी केवळ चार लाखाची पॅकेज स्वीकारली आहेत. हे भारतातील सर्वच पालकांसाठी धक्कादायक वर्तमान आहे.
‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ असं सांगतो की २०२५ मध्ये ८.६ कोटी नोकऱ्या या नाहीशा होतील. त्याचबरोबर तोच रिपोर्ट असं सांगतो की ९.७ कोटी नवीन जॉब्स असे तयार होतील की ज्यासाठी कुठलाही अभ्यासक्रम सध्या तयार नाही! फ्युचर-प्रूफ करिअर करण्याची ग्यानबाची मेख इथेच आहे!!
त्या ग्यानबाच्या मेखेबद्दल आपण लेखमालेतून संवाद साधत राहूच; परंतु तूर्त- तुम्हा सर्वांना नववर्षाच्या एकरेषीय नाही तर घातांकीय शुभेच्छा !!
(डॉ. भूषण केळकर AI तज्ज्ञ व करियर समुपदेशक आहेत)
bhooshankelkar@hotmail.com
(डॉ. मधुरा केळकर मानसशास्त्रज्ञ व करियर समुपदेशक आहेत)
mkelkar_2008 @yahoo. com