स्पर्धा परीक्षा देणे ही मोठी जोखीम असते. जर निवड झाली नाही तर पुढे काय हा मोठा प्रश्न उभा राहत असतो. त्यामुळे यूपीएससीची तयारी करत असताना ‘प्लॅन बी’ हा नेहमी तयार ठेवा. यूपीएससीची तयारी करत असताना हातामध्ये नोकरी असणे आवश्यकच आहे, हा सल्ला दिला आहे ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी…
पुणे येथील जुन्नर तालुक्यातील एका खेडेगावात माझा जन्म झाला. माझे आई-वडील दोघेही जुन्नरमध्ये शिक्षक होते. नांदेडमधील महाविद्यालयातून अभियंत्रिकी क्षेत्रात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पदवीचे शिक्षण घेत असताना पुढे एखादा लघु उद्योग स्थापन करण्याचा किंवा पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याचे पर्याय माझ्या समोर होते. परंतु या पर्यायांमध्ये फारसा जोर नव्हता. लोकांसाठी काहीतरी करावे असे नेहमी डोक्यात होते. हाच विचार घेऊन पुढे स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरविले होते. दरम्यान, महाविद्यालयातील माझे एक प्राध्यापक देखील यूपीएससीची तयारी करत होते. त्यांच्याकडून यूपीएससीच्या अभ्यासक्रमाची माहिती मिळाली आणि यूपीएससी अभ्यासक्रमाकडे वळालो.
पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संगमनेरमधील महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक म्हणून रूजू झालो. या कामातून यूपीएससीच्या अभ्यासाला वेळ मिळत होता. तसेच शिक्षण क्षेत्र असल्याने यूपीएससीच्या अभ्यासासाठी देखील मदत होत होती. इतर ठिकाणी काम करत असतो, तर अभ्यासाला पुरेसा वेळ मिळाला नसता. त्यावेळी इंटरनेट नव्हते. ग्रामीण भागात वाचनालये नव्हती. साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करताना मिळणाऱ्या वेतनातून स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके, मासिके खरेदी करायचो. मासिकांमध्ये यशस्वी अधिकाऱ्यांच्या मुलाखती वाचायला मिळायच्या. ते कोणती पुस्तके वाचायचे, ते कसा अभ्यास करायचे याची माहिती त्यातून मिळत होती. त्यांनी जी पुस्तके यूपीएससीच्या अभ्यासक्रमासाठी वापरली. ती पुस्तके विकत घेऊन अभ्यास करायचो. माझ्या आई-वडिलांचा यूपीएससी करत असताना पदोपदी पाठिंबा मिळाला होता.
हेही वाचा >>> JEE Main Result 2024: जेईई मेनचा निकाल किती वाजता? कसे मोजले जातील गुण, स्कोअरकार्ड कसे डाउनलोड कराल?
अभ्यासासाठी वेळेचे योग्य नियोजन कराल
तुम्हाला दिवसभरात जितका वेळ शक्य असेल. तितका वेळ अभ्यासासाठी द्या. मी किमान १२ ते १४ तास दिवसातून अभ्यास करायचो. अनेकदा १७ तास देखील अभ्यासासाठी दिले होते. यूपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात मला यश संपादन करता आले.
तणावाकडे कसे पाहता हे महत्त्वाचे
ताण-तणाव हा प्रत्येक क्षेत्रात असतो. काही क्षेत्रामध्ये तो कमी असतो. तर काही क्षेत्रात तो जास्त असतो. त्यामुळे स्पर्धा परीक्षा म्हटली तर तणाव येत असतो. स्पर्धा परीक्षेत यश मिळेलच अशी खात्री नसते. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणे ही मोठी जोखीम असते. जर निवड झाली नाही तर पुढे काय हा मोठा प्रश्न उभा राहत असतो. परंतु या तणावाकडे आपण कसे पाहतो हे महत्त्वाचे आहे.
महिलांनी स्पर्धा परीक्षा आवर्जून द्याव्यात.
प्रसिद्धी मिळते किंवा पैसा मिळतो म्हणून हे करिअर निवडले का असा विचार करणे सोडून द्यावे. त्याऐवजी तुम्हाला या क्षेत्रात येऊन काय करायचे आहे आणि हे क्षेत्र का निवडले आहे हे स्पष्ट असणे अपेक्षित आहे. त्यातून तुम्हाला समाधान मिळायला हवे. महिलांनी स्पर्धा परीक्षाची तयारी आवर्जून करावी. महिला या पुरुषांपेक्षा पुढे असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे.
पर्याय शोधले पाहिजेत
यूपीएससीची तयारी करत असताना ‘प्लॅन बी’ हा नेहमी तयार ठेवा. यूपीएससीची तयारी करत असताना हातामध्ये नोकरी असणे आवश्यक आहे. यूपीएसएसमध्ये निवड झाली नसती तर माझा ‘प्लॅन बी’ तयार होता. साहाय्यक प्राध्यापक म्हणून दोन ते तीन वर्ष मी काम केले होते. त्या दरम्यान मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची देखील परीक्षा दिली होती. त्यामध्ये माझी साहाय्यक निबंधक म्हणून निवड झाली होती. साहाय्यक प्राध्यापकाच्या नोकरीमध्ये राजीनामा दिल्यानंतर मी सहकार विभागात साहाय्यक निबंधक म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. हे काम करत असताना माझी यूपीएससीत निवड झाली. सध्या इंटरनेटच्या विश्वात मुलांना अनेक वेगळ्या संधी उपलब्ध आहेत. तुम्हाला लोकांसाठी, देशासाठी काहीतरी करायचे आहे. परंतु स्पर्धा परीक्षेत अपयश आल्यास खचून न जाता पर्याय शोधले पाहिजेत. इंटरनेटमुळे माहिती मिळत असते. तुम्हाला देशासाठी काहीतरी करायचे आहे असे वाटत असल्यास नव उद्याोग उभारून अप्रत्यक्षपणे देशाला मदत करू शकता. तरुणांना नोकऱ्या देऊ शकता.
करिअर म्हणजे नेमके काय हे ओळखा
● स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून एमपीएस, यूपीएसची परीक्षा देणे हे एकमेव करिअर नाही. बरीच अशी मुले आहेत ज्यांची आयएएस, आयपीएस पदासाठी निवड झाली होती. परंतु त्यांना काम आवडले नाही किंवा इतर कारणांमुळे त्यांनी ते सोडून दिले. त्यांना जे आवडते त्यामध्ये त्यांनी काम सुरू केले आणि ते आता यशस्वी होत आहेत, अशी अनेक उदाहरणे आहेत.
● आयुष्यात काय पाहिजे याचा मार्ग म्हणजे करिअर होय. त्यामुळे तुमच्या आयुष्यात करिअर विषयी अनेक मार्ग असू शकतात.
● पूर्वी वकील, डॉक्टर, अभियंता, सनदी लेखापाल झाल्यास यश मिळाले असे मानले जात होते. परंतु माहिती तंत्रज्ञानामुळे आता अधिक संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे करिअर म्हणजे काय हे ओळखता आले पाहिजे.
शब्दांकन किशोर कोकणे