स्पर्धा परीक्षा देण्याकडे आज लाखो तरुण-तरुणींचा कल दिसतो. मात्र, यासाठी नक्की किती आणि कसा अभ्यास केला पाहिजे, त्या वेळचा ताण कसा हाताळायचा किंवा तंदुरुस्ती कशी राखायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वत:ला पडताळून कसे पाहायचे. याविषयी सांगत आहेत, सध्या सेवेत असलेले आयएएस आणि आयपीएस अधिकारी… दर पंधरा दिवसांनी.
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी तीन महत्त्वाचे गुण विकसित करायला सांगेल. एक म्हणजे शिस्त, दुसरे म्हणजे वेळेचे व्यवस्थापन आणि तिसरे म्हणजे अभ्यासासह एकूणच नियोजन. या तिन्ही गुणांमुळे यश नक्कीच मिळते. सांगताहेत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल.
हेही वाचा >>> UPSC-MPSC : राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियान नेमके काय? या अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या इतर उपयोजना कोणत्या?
१) आपण स्पर्धा परीक्षांकडे वळण्याच्या निर्णयामागची भूमिका काय होती ?
मी बारावीनंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला म्हणजे एनडीएमध्ये यूपीएससीच्याच माध्यमातून प्रवेश मिळवला होता. त्याचे पहिले सहा महिने उत्तमरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले. नंतर मात्र, त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्याकाळी मी तणावात होतो. माझ्या कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे मी तणावातून बाहेर पडू शकलो. एनडीएतील घटना मागे सोडता आल्यामुळे मला पुढे प्रगती साधता आली. त्यानंतर मी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. नंतर दोन वर्षे नोकरी केली. दरम्यानच्या काळात माझा लहान भाऊ यूपीएससीची तयारी करत होता. त्याच्यामुळे तसेच माझ्या वडिलांमुळे भारतीय प्रशासन सेवेत जाण्याची प्रेरणा मला मिळाली.
आयएएस अधिकारी म्हणून राष्ट्र उभारणीसाठी किती मोठे काम करता येते हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले. त्यानुसार, मी २०१४ यूपीएससीची तयारी सुरू केली. टीएन शेषन, ओ.पी. चोधरी आणि एस. जयशंकर यांसारख्या अनेक दिग्गज अधिकाऱ्यांनी केलेले कार्य आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे मी आकर्षित झालो. त्यांच्या सारखा अधिकारी बनण्याचे माझे स्वप्न होते. आणि २०१६ मध्ये मी परीक्षा उत्तीर्ण झालो.
२) स्पर्धा परीक्षेसाठी कशापद्धतीने तयारी केली ?
यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी अनेक पैलू आहेत. प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कठोर परिश्रम. माझी दिनचर्या शिस्तबद्ध पद्धतीने आखली होती, आणि त्याचे आचरणही मी तितक्याच कठोरपणे करत असे. दिवसातून सहा ते आठ तास सातत्याने अभ्यास करत होतो. याव्यतिरिक्त, या परीक्षेच्या अभ्यासाठी माझ्याकडे सर्व साहित्य आहे ना याच्याकडे लक्ष दिले. त्यानुसार, या अभ्यासक्रमाच्या नोटस मी तयार केल्या. वेळेचे योग्य नियोजन करण्याचा स्वभाव माझ्यामध्ये लहानपणापासून होता. मी माझ्या अभ्यासाचे नियोजन महिनाभर आधीच करत असे. या परीक्षेची रचना समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी अभ्यासक्रम आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका बारकाईने पाहिल्या. अभ्यासाचा प्राधान्यक्रम ठरवला. त्यानुसार कोणत्या विषयाला किती तास द्यायचे हे निश्चित केले. एनसीईआरटीची पुस्तक वाचणे यूपीएससी परीक्षेसाठी फायदेशीर ठरते.
हेही वाचा >>> UPSC-MPSC : भारतात कृषी उत्पादनाच्या वाढीसाठी राबविण्यात आलेल्या महत्त्वाच्या योजना कोणत्या?
३) अभ्यासा दरम्यान येणारा ताण-तणाव कशा पद्धतीने हाताळला ?
ताणतणाव हा नेहमी अतिविचार आणि गोंधळलेल्या मनस्थितीत येत असतो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना, अनेकजण गोंधळतात अभ्यास आणि पुढील भविष्याबद्दल काळजी करायला लागतात, त्यातून अधिक ताण येतो. मी जेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो. त्यावेळी मी केवळ वर्तमानाचा विचार करून आपले काम करत होतो. भविष्य आणि भूतकाळाचा कधीच विचार केला नाही. तसेच सतत सकारात्मक विचार आणि सकारात्मक लोकांबरोबर मी माझा वेळ घालवत असे. तसेच पुरेसा वेळ विश्रांती घेत मी अभ्यास करत होतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा ताण मला अभ्यासा दरम्यान जाणवला नाही. या काळात कुटुंबीयांचा आपल्या पालकांचा पाठिंबाही महत्त्वाचा असतो. नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा. जुन्या अपयशाच्या घटना मागे सोडून पुढे जाता आले पाहिजे.
४) शारीरिक तंदुरुस्तीसाठी किती आणि कसा वेळ दिला ?
स्पर्धा परीक्षांदरम्यान शारीरिक तंदुरुस्तीला महत्त्व हे दिलेच पाहिजे. मी यूपीएससीचा अभ्यास करताना दररोज एक तास चालण्यासाठी देत असे. परंतु, तरीही माझे वजन वाढले होते. परीक्षेच्या कालावधीत माझ्या आहाराकडे नीट लक्ष दिले नव्हते, त्याची परिणती वजन वाढण्यात झाली होती. त्यामुळे मला यूपीएससीच्या तयारी दरम्यान शारीरिक तंदुरुस्ती राखता आली नव्हती. या गोष्टीची मला नेहमी खंत वाटते. म्हणूनच आता जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांनी दिवसातून एक तास कोणत्याही खेळ खेळावा ज्यातून शारीरिक मेहनत होईल. त्याचप्रमाणे आपल्या आहाराकडे देखील आवर्जून लक्ष द्यावे, असा सल्ला मी देईन.
५) आयएएस अधिकारी होणे शक्य नसते तर, तुमचा प्लॅन बी काय होता ?
आयएएस अधिकार होणे मला शक्य झाले नसते तर, मी उद्याोजक बनण्याचे निश्चित केले होते. मला नेहमी सर्जनशील गोष्टी करायला आवडतात. त्यामुळे उद्याोजक बनणे माझ्यासाठी खूप योग्य ठरले असते. मी शिक्षण क्षेत्रात काहीतरी ठोस केले असते. देशातील शैक्षणिक दर्जा सुधरविण्यात खूप वाव आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्र असो वा तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करणे असो या क्षेत्रात मला योगदान द्यायला आवडले असते.
६) आता जे स्पर्धा परीक्षा देत आहेत किंवा परीक्षेची तयारी करीत आहेत, त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल?
स्पर्धा परीक्षांची तयारी करताना तुम्हाला बारावीला किती टक्के होते, पदवी तुम्ही किती उत्तमरीत्या पास झालात. हे विसरून अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. मला बारावीत केवळ ५७ टक्के गुण होते. त्याचा परिणाम माझ्या या तयारीवर कुठेच झाला नाही. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी तीन महत्त्वाचे गुण विकसित करायला सांगेल. पहिला म्हणजे शिस्त आणि अभ्यासामध्ये स्वत:ला झोकून द्यावे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना शिस्तबद्ध दिनचर्या असणे गरजेचे आहे. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कोणत्याही परीक्षार्थीचे संपूर्ण लक्ष परीक्षेच्या तयारीवर असले पाहिजे. जर तुम्ही परीक्षेत यश मिळवण्यावर १०० लक्ष केंद्रित केले असेल तर तुम्ही परीक्षेत यशस्वी व्हाल हे निश्चित आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे वेळेचे व्यवस्थापन करता आले पाहिजे. दिवसातील सहा ते आठ तासाचा वेळ अभ्यासासाठी योग्य पद्धतीने वापरला पाहिजे, त्याशिवाय तुम्ही यूपीएससी सारखी परीक्षा उत्तीर्ण होण्याची अपेक्षा करू शकत नाही. तर, तिसरी गोष्ट म्हणजे योग्य नियोजन केले पाहिजे. ते नियोजन दररोज अंमलात आणायला हवे. त्यासह, स्वत:चे मूल्यमापन कसे करायचे हेही कळले पाहिजे. या मूल्यमापनामुळे तुम्हाला परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप मदत होईल.
हे नक्की करा…
● मोबाइल फोनपासून जितके दूर राहाल तितके आनंदी आणि सुखी राहाल. समाजमाध्यमांचा वापर टाळा.
● स्वत:वर विश्वास ठेवा. तुमचा आत्मविश्वास दुसरे कोणीतरी येऊन वाढवू शकत नाही. त्यामुळे तुम्हालाच स्वत:वर विश्वास ठेऊन पुढे जाणे गरजेचे असते.
● पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास झाली नाही तर दोष इतरांवर टाकू नका आणि मग नव्या जोशाने तयारीला लागा.
● जमल्यास प्रत्येकाने वेगवेगळे स्टडी ग्रुप तयार करावेत. त्यात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केल्याने एकाच विषयाचे अनेक पैलू समजण्यास मदत होते.
शब्दांकन : पूर्वा भालेकर