मयुरीने इंजिनीयर होऊन छानशी नोकरी करावी अशी तिच्या आईची इच्छा होती. खराडीच्या आयटी कंपनीत नोकरीला लागल्यानंतर आतातरी तिचे प्राणिप्रेम कमी होईल म्हणून आईने नि:श्वास टाकला होता. पण वर्षभरातच तिने शेल्टरचा विषय काढला…
निपाणीला माझं माहेर. वडिलांचे दुकान. आम्ही चार बहिणी त्यातली मी धाकटी. तिघींच्या लग्नात मोठा खर्च झाल्यामुळे माझ्या लग्नाकरता वडिलांच्या हाती फारशी रक्कम नव्हती. भोरच्या शेतकरी जोशी मंडळींचं स्थळ माहितीच्या ओळखीतून सांगून आल्यावर वडिलांनी माझं लग्न लावून दिलं. वयाच्या विशीमध्ये मोठ्या गावातून छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबात मी येऊन दाखल झाले. पहाटेपासून रात्रीपर्यंत शेतीचा बारदाना म्हणजे काय ते मला पहिल्या आठवड्यातच कळले. सासरची मंडळी स्वभावाने खूपच चांगली असल्यामुळे नवीन घरी रुळण्यात अडचण आली नाही. तीन-चार महिन्यानंतर कष्टाचीही सवय झाली. माहेरी धाकटी म्हणून स्वयंपाक पाण्यात मदत करण्यापलीकडे संबंध येत नसे. इथे मात्र दोन गाई, एक म्हैस तीन कुत्री आणि तीन माणसे यासाठीची सारी तरतूद करणे यात दिवस कधी संपतो ते कळत नसे.
लहानपणी निपाणीला एकदा मला कुत्रा चावला होता तेव्हापासून कुत्र्यांची प्रचंड भीती मनात बसलेली. इथे तर घरी दारी शेतावर कुत्री सतत आसपास असत. तीही आकाराने दांडगी आणि जोरदार भुंकणारी. त्यांची भीती नसली तरी दहशत मात्र मनात असे. सकाळी उजाडले की घरचे कुत्रे माझ्याकडे कधी देतेस खायला म्हणून पहात उभे असे. उशीर झाला की त्याची जोरदार कुईकुई सुरू होई. या सगळ्याची हळूहळू छान सवय होत गेली पण मनातली भीती मात्र कधीच गेली नाही. मयुरी चा जन्म झाला आणि तिच्या खेळण्यातूनच घरातल्या व आसपासच्या सगळ्या प्राण्यांचा तिला लळा लागला. शाळेतून आली की विविध प्राण्यांमध्ये ती रमत असे. एखादी मांजरी व्यायली तर तिच्या पिल्लांमागे धावण्यात मयुरीचा अभ्यास बाजूला पडे. पण जात्याच हुशार असल्यामुळे पाहता पाहता शाळा संपून तिची बारावी पण संपली. प्राण्यांचा लळा लागल्यामुळे तिला व्हेटर्नरी डॉक्टर व्हायचे होते. मला ते ऐकूनच कसतरी झाले तर वडिलांना ती जनावरांची डॉक्टर होणार हे फारसे आवडले नव्हते. सुदैवाने तिला पुरेसे मार्क न मिळाल्यामुळे तो विषय संपला आणि सहजपणे कात्रजला इंजिनीअरिंगला प्रवेश मिळाला. आमच्या घरापासून जेमतेम तासाभराच्या अंतरावर कॉलेजचे होस्टेल असल्यामुळे दर आठवड्यात तिची घरी चक्कर होत असे. आईला तोंड दाखवून लगेच ती शेतावर पळे. आसपासच्या लहान मोठ्या पाळीव प्राण्यांशी भरपूर गप्पा गोष्टी करून आणि खेळून झाल्यावर ती घरी परते.
मुलीचे शिक्षण व नोकरी
मयुरी आम्हाला एकटीच मुलगी. माहेर आणि सासर दोन्ही ठिकाणची ओढाताण मी पाहिल्यामुळे तिने इंजिनीयर होऊन छानशी नोकरी करावी अशी स्वाभाविक माझी इच्छा होती. खराडीच्या आयटी कंपनीत ती नोकरीला लागल्यानंतर आता शहरी वातावरणात रुळली आणि आता तरी तिचे प्राणीप्रेम कमी होईल म्हणून मी नि:श्वास टाकला होता. पण वर्षभरातच तिने शेल्टरबद्दल वडिलांशी बोलणे केले. गमतीची गोष्ट म्हणजे ही बाब तिच्या वडिलांनी मला सांगितली. कारण तिचे प्राणिप्रेम मला फारसे आवडत नाही याची तिला चांगलीच कल्पना होती.एकदा मयुरी कडून युट्युब वरची एक लिंक माझ्याकडे आली आणि ती पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला. मयुरी आणि तिचा कंपनी मधला एक सहकारी या दोघांची अर्धा तासाची मुलाखत त्या यूट्युब चॅनलवर होती. तिच्या मनातल्या संकल्पनेतील अनाथ जखमी निराधार प्राण्यांसाठीचे शेल्टर कसे साकारले आहे याची मनाला, भावनेला साद घालणारी ती मुलाखत पाहून खरं तर मला गलबलून आले. मुलाखती दरम्यान शेल्टर मधल्या विविध प्राण्यांशी ज्या मायेने आपुलकीने ती दोघेजण बोलताना व्हिडिओत दाखवली होती ते सार माझी लेक म्हणून मला कौतुकास्पद वाटले. त्याच दिवशी मी ठरवलं की तिला कसलीही कल्पना न देता वारज्याला जायचं आणि शेल्टर पाहायच.
एका कामाच्या दिवशी मयुरी कंपनीत गेलेली असताना मी एका मैत्रिणीला घेऊन तिथे गेले. जवळपास १७-१८ प्राण्यांची उत्तम सोय असलेले ते निवारा केंद्र पाहून माझी मैत्रीण थक्क झाली होती. साऱ्या परिसराची स्वच्छता ही वाखाणण्याजोगी होती. सेंटर मधील निरोगी प्राणी दत्तक म्हणून हवा असेल तर काय करावे लागते याचे मोहक रंगीत माहिती पत्रक आमचे हाती पडले. आम्ही भोरहून आलो हे सांगितल्यानंतर तेथील कार्यकर्त्यांनी मयुरी तुमची कोण लागते म्हणून विचारले? मैत्रिणीने पटकन जेव्हा सांगितले यांची ती मुलगी, तेव्हा त्यांनाही आश्चर्य मिश्रित कौतुक वाटले. कुत्र्याची माझ्या मनातली भीती मात्र गेलेली नसली तरी आता माझ्या मनात प्राणिप्रेम मात्र उत्पन्न झाले आहे एवढे खरे. (क्रमश:)