Success Story: ‘इच्छा तेथे मार्ग’ ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेलच. जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असे म्हटले जाते. त्या अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टीला शक्य करण्याचा मार्ग तुम्हाला सापडला म्हणजेच तुम्ही यशस्वी झालात. याबाबतचे उदाहरण द्यायचे झाले, तर आयएएस मनोज कुमार राय यांचे देता येईल. राय यांनी समोरील अडचणींमधून एक मार्ग शोधून काढला आणि नवी सुरुवात केली. त्यांचा प्रेरणादायी प्रवास आज सगळ्यांसाठी मोलाचा ठरतो आहे. चला तर मग जाणून घेऊ आयएएस मनोज कुमार यांची गोष्ट.
आयएएस मनोज कुमार राय यांचा जन्म बिहारमधील सुपौल दुर्गम खेडेगावात झाला. मनोज राय यांचे आयएएस अधिकारी होण्यापूर्वीचे जीवन दारिद्र्य व संकटांनी भरलेले होते. मनोज यांनी स्वत:सह कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीत होऊन, आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी अनेक प्रयत्न केले. ते ग्रामीण जीवनातील साधेपणातून, दिल्लीच्या गजबजलेल्या महानगरापर्यंत स्वतःला घेऊन आले. त्यांनी शहरात आल्यावर उपजीविकेच्या शोधात विविध व्यवसायांमध्ये प्रवेश केला. त्यांनी गाडीवर अंडी विकण्यापासून ते रखवालदार, फरशी पुसण्यापर्यंतची अनेक कामे केली.
त्यानंतर जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या कॉरिडॉरमध्ये प्रवेश घेऊन, त्यांनी स्वतःच्या शैक्षणिक आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू केला. काम व अभ्यास यामध्ये समतोल साधत, मनोज यांनी स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्याच्या प्रवासाला सुरुवात केली. श्री अरबिंदो कॉलेजमध्ये त्यांनी पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यांचा दिवस अथक परिश्रम करण्यात, उत्पादने विकण्यात आणि वस्तूंचे वितरण करण्यात जायचा. पण, तरीही त्यांचा संकल्प अढळ राहिला. वाटेत आलेल्या प्रत्येक संकटाला तोंड देता देता मनोज यांचा स्वप्नपूर्तीचा निश्चय अधिकच दृढ होत गेला आणि अखेर त्यांनी स्वतःला यूपीएससी (UPSC) परीक्षेच्या तयारीमध्ये झोकून दिले.
अयशस्वी प्रयत्नांपासून ते भाषिक अडथळ्यांपर्यंत त्यांच्यासमोर अनेक संकट आली. तरीही प्रत्येक धक्क्याने खचण्याऐवजी ते नेहमीपेक्षा अधिक दृढनिश्चयी होत गेले. मनोज यांनी त्यांच्या कमकुवतपणाला संधी म्हणून स्वीकारले. त्यांनी स्वतःच्या कौशल्यांचा आदर करीत स्वतःचे ज्ञान वाढविण्यावर अधिक भर दिला. अखेर मनोज यांच्या चिकाटी अन् कष्टाला यशाचे फळ लाभले आणि ते आयएएस अधिकारी झाले. त्यांना मिळालेल्या यशाचा मुकुट त्यांच्या डोक्यावर होता; पण आपल्यासभोवताली गरिबीच्या खातेऱ्यात अडकलेल्या लोकांना, त्यातून बाहेर काढण्याचे विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. मग त्या दृष्टीने काम करण्याकडे ते वळले आणि नागरी सेवा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या तरुण पिढीला विनामूल्य प्रशिक्षण देऊ लागले. आयएएस मनोज कुमार राय यांची गोष्ट कोणतेही स्वप्न आवाक्याबाहेर नाही या अढळ विश्वासावर आधारलेली आहे, असे म्हणायला हरकत नाही.