डॉ. भूषण केळकर, डॉ. मधुरा केळकर
आम्ही जेव्हा इंजिनीअरिंग किंवा अन्य कॉलेजेसमध्ये सुद्धा मुलाखतींसाठी सराव घेतो त्यावेळेला बरेचदा हा प्रश्न विचारतो की तुमची जी विद्याशाखा आहे त्यातील निदान तीन ते चार प्रख्यात देशी आणि परदेशी कंपन्यांची नावे आम्हाला सांगा, तेव्हा दुर्दैवाने मुलांना जेमतेम एक किंवा दोनच्या पलीकडे जाता सुद्धा येत नाही!!

हे तर उघड आहे की तीन किंवा चार वर्षानंतर, तुमची पदवी झाल्यानंतर तुम्हाला जॉब मिळण्यासाठी या कंपन्यांची माहिती असणे आवश्यक आहे. किंबहुना त्याची माहिती असल्यानुसार तुम्हाला काही निर्णय हे तुमच्या शिक्षणामध्ये घेता पण येतील, उदाहरणार्थ तुम्हाला एखाद्या कंपनीत रुजू होण्याची इच्छा असेल तर त्या कंपनीची खासियत असणारे विषय आणि त्यानुसार वैकल्पिक विषय तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमामध्ये निवडता येतील किंवा त्याचा अभ्यास तुम्ही बाहेरून करू शकाल. तर मूळ मुद्दा हा की आपण ज्या शाखेत शिक्षण घेतो आहोत आणि विशेषत: त्यातल्या आवडत्या उपशाखेमध्ये कार्यरत असणाऱ्या कंपन्या या आपले लक्ष्य असणार आहेत !!

मग अशा कंपन्याना अर्ज करतानाच / मुलाखत देताना मुळात आपण काय-काय बघावं : तर कंपनीच स्थैर्य किती, कंपनीचा मार्केट शेअर किती, कंपनीमध्ये माझ्या आवडत्या विषयाला वाव किती, कंपनीमध्ये असणारे, आधी रुजू झालेले माझे सीनियर्स या कंपनीविषयी काय बोलतात, कंपनीची यापुढील वाटचाल आणि प्रगती आणि त्याची व्याप्ती कशी असेल इत्यादी बद्दल अभ्यास आणि अंदाज.

जेव्हा आपल्याला कंपनीमध्ये नोकरी मिळते त्यावेळी त्या कंपनीची निवड करताना आपण विचारात घ्यायचे निकष हे अनेकविध असायला पाहिजेत आणि केवळ पगारावरून आपण एखादी कंपनी निवडावी असे नक्कीच नव्हे!

त्या निकषांमध्ये पहिला येईल तो म्हणजे की आपली स्वत:ची करिअरमधली वृद्धी त्या कंपनीत होईल का? त्या वृद्धीमध्ये सुद्धा दोन भाग करता येतील – एक म्हणजे ज्या भूमिकेसाठी तुम्हाला कंपनीने निवडला आहे ती भूमिका तुम्हाला करिअर वृद्धिंगत ठेवायला मदत करेल का. आणि दुसरं म्हणजे त्या भूमिकेमध्ये आपण सातत्यपूर्ण शिकत राहण्याची प्रक्रिया होणार आहे का, का एकजिनसी कामच आपण करत राहणार आहोत आणि जे आपल्याला येत आहे तेवढेच फक्त करणार आहोत, की काही नवीन शिकायला मिळणार आहे?

नवीन शिकायला मिळणे याच्यातला अजून एक भाग म्हणजे काही कंपन्यांच्यामध्ये तुम्हाला पुढचं औपचारिक शिक्षण घेण्यासाठी – समजा पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी झ्र काहीकाही कंपन्यांच्या मध्ये धोरण असतात. उदाहरणार्थ ते तुम्हाला कुठल्यातरी पदव्युत्तर शिक्षणासाठी स्पॉन्सरशिप देऊ शकतात. अशा कंपनीचा पगार जरी कमी असेल तरीसुद्धा त्याचा आपण अधिक प्रामुख्याने विचार करायला हवा!

कंपनीमध्ये जॉईन होताना तिसरा भाग म्हणजे जसा ‘‘फिक्सड-पे’’ हा पगाराचा भाग असतो तसंच ‘‘व्हेरिएबल-पे’’ : म्हणजे तुमच्या कामगिरीच्या पातळीनुसार मिळणारा कमी-अधिक पगाराचा भाग पण असतो. आणि तो सुद्धा किती आहे हा आपण तपासून घ्यायला हवा. बरेच वेळेला ज्यांच्याकडे कामाचा उत्साह आहे अशी लोकं व्हेरिएबल-पे हा भाग फिक्सड-पे पेक्षा जास्ती मिळवून दाखवतात, पण तशी संधी कंपनीत असेल तर!!

याचबरोबर भारतामध्ये आता रुजलेला आणि वाढत चाललेला अजून एक भाग लक्षात घ्यायला हवा तो म्हणजे स्टार्टअप मध्ये असणारे ज्याला ‘स्टॉक-ऑप्शन्स’ म्हणतात तसे मिळणारे समभाग!

कंपन्यांच्या मध्ये विशेषत: स्टार्टअप मध्ये समभाग हे तुम्हाला विलक्षण उत्तम परतावा देऊन जाऊ शकतात आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही कमी वयामध्ये कंपनीत रुजू होत असाल, तर त्यावेळेला ह्या प्रकारची थोडी रिस्क घ्यायला हरकत नाही!! विशेषत: अजून कुटुंब, घर, कर्जपरतफेडीचे हप्त्याची चिंता व दडपण नसताना!

कोणत्याही देशाचं आर्थिक आरोग्य जसं ‘सकल राष्ट्रीय उत्पादन’ यावर ठरतं तसंच नोकरी किंवा कंपनी निवडताना सुद्धा तसंच ‘सकल वैयक्तिक उत्पन्न’ हे लक्षात घेणं गरजेचं आहे, फक्त पगार नव्हे!!

bhooshankelkar@hotmail.com

mkelkar_2008 @yahoo. com