डॉ. श्रीराम गीत
नमस्कार सर मी आज २७ वर्षांचा आहे. मी गणितात मास्टर्स केले आहे, शाळेत जॉब करत आहे. तसेच टय़ुशन क्लासेस सुद्धा घेत आहे. यामध्ये चांगला प्रोग्रेस देखील होत आहे. परंतु पुढचं शिक्षण घ्यायची इच्छा आहे. नेट-सेट/ पीएच.डी. करावे की एमपीएससी करावी समजत नाही. एमपीएससीमधून चांगली प्रतिष्ठा देणारी सरकारी नोकरी दिसते .पण गणित सोडायला मन होत नाही यामध्ये इंटरेस्ट आहे. परंतु कधी कधी विचार येतो की नेट-सेट पीएचडी केल्यानंतरही प्रायव्हेट जॉबच आहेत. काय करावे सूचत नाही आहे. गोंधळ होत आहे याबद्दल आपण मार्गदर्शन करावे.
– कुणाल ठाकरे
स्वत:चे चालले आहे ते चांगले आहे, पण ते मान्य होत नाही; कारण दुसरे किती मिळवतात इकडे लक्ष, ही जगातील सामान्य रीतच आहे. याच पद्धतीत तुम्ही विचार करत आहात. गणित हा आवडता विषय शिकवणे जमत आहे. हाती कमी पगाराची का होईना नोकरी आहे. क्लासेस हळूहळू वाढत जातील. त्या उत्पन्नाची खात्री मिळाल्यावर नोकरी सोडूनही देणे शक्य आहे. अन्यथा ज्या विषयाचा काडीचाही संबंध नाही अशा स्पर्धा परीक्षांच्या मागे जाताना शिकवण्याकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक राहील. स्पर्धा परीक्षेच्या परीक्षेनिमित्त मुलांना सुट्टी दिल्यास मुलेही नाही असे होईल. नेट-सेट किंवा पीएच.डी. करून कायम स्वरूपाची अनुदानित संस्थांत नोकरीची शक्यता मला दिसत नाही. योग्य तो विचार तुम्हालाच करायचा आहे.
मी आपल्या करिअर मंत्र सदराची नियमित वाचक आहे. माझा मुलगा यंदा सीबीएसई बोर्डामधून आठवीची परीक्षा देईल. त्याने पहिलीपासून सरासरी ९० गुण कायम ठेवले आहेत. माझ्या मुलाच्या शाळेत आठवीपर्यंतच मराठी विषय आहे. सीबीएसईचे मराठी अगदी बेसिक असल्यामुळे आता कुठे त्याचे मराठी थोडे बरे होत असताना नवव्या वर्गापासून तो विषय सुटणार आहे. आम्हा उभयतांना वाटते की त्याने किमान दहावीपर्यंत मराठी विषय अभ्यासावा. त्यासाठी त्याची सध्याची सीबीएसई शाळा बदलून नववी आणि दहावी स्टेट बोर्डामधून करणे योग्य राहील का? सध्या त्याचा कल मेडिकल किंवा प्रशासकीय सेवेत जाण्याचा दिसतो आहे. कृपया आम्हाला आपला योग्य सल्ला द्यावा.
– योगेश बनवाडे
त्याला स्टेट बोर्डला प्रवेश कसा मिळणार? कुठे मिळणार? मिळाला तर मित्रपरिवार आणि शाळा बदल मुलगा कसा सहन करणार? या साध्या प्रश्नावर तुम्हाला विचार करायचा आहे. मराठी वाचून दाखवणे, मराठी वाचून घेणे, मराठी डिक्टेशन घालणे यातून मराठी विषयाची त्याची जाण व आवड वाढू शकते. शाळा बदलली व मराठी विषय घेतला म्हणून मराठी चांगले होईल हा गैरसमज आहे. मराठीची आवड निर्माण होण्यासाठी मराठीतली गोष्टीची पुस्तके व मराठी वृत्तपत्र वाचन मुलाकडून रोज पंधरा मिनिटे करून घेणे हे तुमचे काम असेल. पुढे काय हा विचार दहावीनंतर सुरू होतो. त्याला अवकाश असल्यामुळे त्याबद्दल मी इथे उत्तर देत नाही.
माझी मुलगी प्रिया हिला दहावीत ९५ व बारावीत विज्ञान शाखेत ८४ गुण मिळाले. तिने सीईटी दिली आहे. तिला सीईटीत कमी मार्क्स पडण्याची भीती वाटतेय. त्यामुळे ती द्विधा मनस्थितीत आहे .तिला पुढे तिचे करियर सीएस इंजिनीअरींग मध्ये करायचे आहे . तिचे विचार पुढील प्रमाणे आहेत : १) एक वर्ष रिपीट करून चांगल्या कॉलेज मध्ये अॅडमिशन घेणे; २) यावर्षी कोणत्यातरी कॉलेजमध्ये अॅडमिशन घेऊन पुढे आयआयटीतून एम.टेक करावे. आम्ही तिला तिच्या कोणत्याही निर्णयात साथ द्यायला तयार आहोत. तरी तिने कोणता निर्णय घ्यावा ? कोणता निर्णय तिच्यासाठी योग्य असेल याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती.
– मनाली केके
आपल्या मुलीचे दहावीचे मार्क कृपया लवकरात लवकर तिने आणि आपण विसरून जाणे गरजेचे आहे. त्या मार्कात अडकल्यामुळे हे असे सगळे विचार तिच्या मनात येत आहेत. आपल्याला तिला या विचारातून बाहेर काढण्याची पहिली गरज आहे. गेल्या मंगळवारी ‘या ९० टक्क्याचे करायचे काय?’,हा माझा ‘स्पर्धेत धावण्यापूर्वी’ या सदरातील लेख वाचावा. त्यात दहावीनंतरच्या मुलांचे स्पर्धा परीक्षातील मार्कात काय होते ते आकडय़ातून स्पष्ट होईल. तसेच ‘नकार का होकार’,या नावाचा दुसरा लेख मे महिन्यातच आला आहे. परीक्षा रिपीट करायची का या विचारात अडकलेल्या पालक व विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन त्या लेखात केले आहे. तुमच्या प्रश्नाचे थेट उत्तर देतो. मुलीला शंभर मार्क जरी सीईटीत पडले तरी तिला चांगले कॉलेज मिळेल. मात्र कॉम्प्युटर सायन्स मिळेल याची कोणतीही खात्री नाही. तिने इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन हे विषय घेऊन बीई उत्तम मार्काने पूर्ण केले तर मिळणारी नोकरी शंभर टक्के आयटी कंपनीतलीच असणार आहे. तेव्हा साधासरळ मार्ग म्हणजे मिळेल ते कॉलेज, मिळेल तो कोर्स घेऊन चांगल्या मार्काने इंजिनिअरिंग पूर्ण करणे. तोवर एमटेक, आयआयटी वगैरे शब्द पूर्ण बाजूला ठेवावेत. तुमच्या प्रश्नाच्या निमित्ताने मी अन्य वाचकांसाठी एक माहिती देतो. उत्तम आयआयटीतील एमटेकसाठी संपूर्ण भारतात फक्त २०० जागा उपलब्ध असतात. आरक्षण सोडले तर जेमतेम शंभरच उरतात. गेट ही परीक्षा देणारे तीन लाख असतात. असो.