प्रथमेश आडविलकर

सर्वसाधारणपणे परदेशातील सर्वच विद्यापीठांचे कॅम्पस हे ग्रंथालय, विद्यार्थी निवासव्यवस्था, आरोग्य सुविधा, प्रयोगशाळा, वाहतूक आणि विद्यार्थी संघटना इत्यादी सोयींनी सज्ज असतात, सुरक्षित असतात. त्यामुळे, उच्चशिक्षणासाठी परदेशात जात असताना योग्य अभ्यासक्रम व योग्य विद्यापीठाची निवड करणे ही निश्चितच कसोटीची बाब आहे. बऱ्याचदा, विद्यार्थी व पालकवर्गाकडून सर्वसाधारणपणे विद्यापीठाचे नाव किंवा ते कोणत्या विषयांसाठी प्रसिद्ध आहे किंवा इतर काही बहिस्थ: संदर्भाने विद्यापीठ निवडले जाते. मात्र, तसे न करता, त्याव्यतिरिक्त इतर काही निकषदेखील लक्षात घेणे इष्ट ठरेल.

विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा आणि आंतरराष्ट्रीय क्रमवारी

विद्यापीठाचा जागतिक स्तरावर किंवा अमेरिकेतील किंवा संबंधित देशातील रँकिंग तपासणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग, टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग आणि युएस एज्युकेशन यांसारख्या रँकिंग प्रणाली उपयोगाच्या पडू शकतात. या सर्वच कंपन्यांच्या वेबसाईटवर विद्यापीठांचे वर्गीकरण अभ्यासक्रम, ठिकाण, विषय किंवा उपविषय, विभाग अशा वेगवेगळ्या प्रकारे करता येते. तसेच विद्यापीठ किंवा विषय निवडताना तिथल्या अभ्यासक्रमाची गुणवत्ता आणि अभ्यासक्रमातील वैशिष्ट्ये काय आहेत हे विद्यार्थी-पालकांनी तपासायला हवे.

प्लेसमेंट्स

आजघडीला भारतात अनेक नामवंत महाविद्यालये व विद्यापीठे, ठराविक विषयांतील पदवीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कँपस मुलाखतीस सामोरे जाण्याची संधी उपलब्ध करून देतात. त्यामध्ये निवडले गेल्यास विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळते. परदेशी विद्यापीठांकडूनसुद्धा थोड्याफार फरकाने अशाच प्रकारे ‘प्लेसमेंट्स प्रोग्रॅम्स’ राबवले जातात. प्लेसमेंट्सच्या निमित्ताने जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांशी संलग्न असणाऱ्या विद्यापीठांची निवड विद्यार्थी व पालकवर्गाने करावयास हवी.

उद्याोजकीय रोजगार कौशल्ये

भारतीय शिक्षण पद्धतीत खरेतर दुर्लक्षित केला गेलेला हा घटक, भारतीय विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी परदेशी विद्यापीठ निवडताना महत्वाचा मानावयास हवा. साधारणपणे सर्वच परदेशी विद्यापीठे त्यांच्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार कौशल्ये मिळावीत म्हणून प्रयत्नशील असतात. याशिवाय, बरीचशी विद्यापीठे यासाठी कार्यशाळा, इंटर्नशिप्स, समर प्रोग्रॅम्स यांसारखे वेगवेगळे उपक्रमसुद्धा राबवत असतात. अशा विविध उपक्रमांबाबत सजग असलेल्या विद्यापीठांना विद्यार्थी-पालकांनीप्राधान्य द्यावे. तसेच, विद्यापीठ उद्याोग व संशोधन क्षेत्रात किती सक्रिय आहे, तेथे विद्यार्थ्यांसाठी संशोधन प्रकल्प, इंटर्नशिप आणि उद्याोगांसोबत भागीदारीच्या संधी किती आहेत, यांसारखेही निकष विद्यापीठ निवडताना वापरता येतील.

विद्यापीठातील वरिष्ठ विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

विद्यापीठाची वेबसाईट, फेसबुक पेज, युट्युब, इंस्टाग्राम किंवा इतर समाज माध्यमांमध्ये परदेशी विद्यापीठातील विद्यार्थी त्यांच्या विद्यापीठातील अभ्यासक्रम, अभ्यासेतर उपक्रम, संशोधन व तत्सम गोष्टींबाबत आपली मते नोंदवीत असतात. प्रत्येक विद्यापीठाच्या ‘फेसबुक पेज’वरदेखील अशी उपयुक्त बरीचशी माहिती मिळू शकते. या साऱ्या माहितीचे योग्य विश्लेषण करून विद्यापीठ निवडीचा विचार करता येईल.

शिक्षण शुल्क आणि ट्युशन वेव्हर किंवा शिष्यवृत्तीची उपलब्धता

परदेशी विद्यापीठे बऱ्याचदा प्रत्येक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती आणि ट्यूशन वेव्हर किंवा दोन्हीपैकी एक बहाल करतात. काही विद्यापीठे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलती देतात. यांमुळे विद्यार्थ्यांचे तिथल्या शिक्षणाचा खर्च बऱ्याच अंशाने कमी होतो. शिक्षणाच्या या एकूण खर्चाचा अंदाज घेऊन विद्यार्थ्याला ज्या विद्यापीठात शिष्यवृत्ती, ट्युशन वेव्हर किंवा इतर आर्थिक मदत मिळत असेल तर अशा विद्यापीठाला विद्यार्थी-पालकांनी प्राधान्य द्यावे.

निष्कर्ष

वरील सर्व निकष पाहिल्यावर हे लक्षात येते की विद्यापीठ निवडताना केवळ त्याच्या प्रसिद्धीवर न जाता त्या विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा, विषय-विभाग-प्राध्यापक यांच्याबद्दल केलेले संशोधन, आर्थिक मदत मिळण्याची असलेली शक्यता, संशोधन आणि नोकरीच्या संधी आणि विद्यार्थी-पालकांच्या वैयक्तिक गरजा विचारात घेणे आवश्यक आहे. संशोधन करून मिळवलेली योग्य माहिती आणि पूर्व नियोजनाने विद्यार्थ्यांसाठी योग्य असे विद्यापीठ निवडणे नक्कीच शक्य होईल.

विद्यार्थ्यांसाठी आयव्ही लीग म्हणजे काय?

विद्यार्थी आयव्ही लीग विद्यापीठांच्या निवडीचाही विचार करू शकतात. आयव्ही लीग म्हणजे अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट मानल्या गेलेल्या ठराविक विद्यापीठांचा गट. यामध्ये सुप्रसिद्ध असे हार्वर्ड, येल, ब्राऊन, कॉर्नेल, कोलंबिया, पेनसिल्वानिया, प्रिन्स्टन यांसारख्या प्रतिथयश अशा विद्यापीठांचा समावेश आहे. या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवणे प्रचंड स्पर्धात्मक असते. जगभरातील उत्तमोत्तम विद्यार्थ्यांचे पहिले प्राधान्य या विद्यापीठांना असते. आयव्ही लीग विद्यापीठामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी उत्कृष्ट असायला हवी. theusscholar@gmail.com