UPSC- स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण विशेष लेखांची मालिका सुरू करत आहोत. यामध्ये नावाजलेले विद्वान विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. इतिहास, राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, कला संस्कृती व वारसा, पर्यावरण, भूगोल, विज्ञान व तंत्रज्ञान असे अनेक विषय आपण समजून घेणार आहोत. या तज्ज्ञांच्या विद्वत्तेचा लाभ घ्या आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हा. आजच्या विशेष लेखामध्ये पुराणशास्त्र आणि संस्कृती या विषयामधील तज्ज्ञ देवदत्त पट्टनायक ‘संस्कृती (कल्चर) आणि सभ्यता (सिव्हिलायझेशन)’ या संकल्पना उलगडून सांगत आहेत, सर्व प्रकारच्या सभ्यता या संस्कृती असतात, परंतु सर्व संस्कृती या सभ्यता असतातच असे नाही, हे त्यांनी अधोरेखित केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण जे काही आहोत ती म्हणजे संस्कृती आणि आपल्याकडे जे आहे ती म्हणजे सभ्यता अशी या दोन्ही शब्दांची ढोबळ व्याख्या करता येऊ शकते. ही व्याख्या असे सुचवते की, संस्कृती ही संकल्पना मानवी मानसिकतेशी आणि मूल्यांशी संबंधित आहे, तर सभ्यता ही संकल्पना अधिक भौतिक, वस्तूनिष्ठ, तंत्रज्ञान, कला आणि स्थापत्य यांच्याशी निगडित आहे. त्यामुळेच यांपैकी एक तरी संकल्पना दुसरीशिवाय तग धरू शकते का? हा प्रश्न निर्माण होतो.

हे दोन्ही शब्द अनेकदा एकाच अर्थाने वापरले जातात. परंतु संस्कृती हा शब्द मानवनिर्मित बाबींसाठी वापरला जातो. वनस्पती आणि प्राण्यांना संस्कृती नसते परंतु ती मानवाला असते. ज्यावेळेस आपले माकडापासून मानवात रूपांतर झाले तेव्हापासून आपण हत्यारं वापरायला, गुहांच्या भिंतींवर चित्र काढण्यास सुरुवात केली. यातूनच संस्कृतीचा जन्म झाला. असा कुठलाही मनुष्य नाही ज्याला संस्कृती नसेल.

संस्कृती आणि मिथकशास्त्र

ज्यावेळी आपण एखाद्या संस्कृतीचा अभ्यास करतो, त्यावेळी त्या संस्कृतीतील लोकांचे अन्न, वस्त्र आणि निवारा याचबरोबर त्यांच्या श्रद्धा, विधी आणि प्रथा यांचा एकत्रित अभ्यास करून त्यांच्या जगण्याच्या संकल्पना कशा आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करतो. मिथकांच्या माध्यमातून त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तपासतो.

अधिक वाचा: देवदत्त पट्टनायक यांच्यासह कला आणि संस्कृती (चा अभ्यास)। भारतीय स्थापत्यकलेतील ९ प्रभावी क्षितिजे

मानव म्हणून आपल्याला अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य त्या साधनसंपत्तीची गरज असते. हिंदू पौराणिक कथांमध्ये या साधनसंपत्तीचे प्रतीक देवी लक्ष्मीला मानले जाते.

आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला शक्तीची गरज असते, ही शक्ती आपल्याला तंत्रज्ञान आणि साधनांच्या स्वरूपात प्राप्त होते, शिवाय या साधन संपत्तीचे योग्य पद्धतीने वितरण आणि पुढच्या पिढीला वारसा रूपात सोपवण्यासाठी नियमन करण्यासाठी नियमांची देखील आवश्यकता असते. देवी दुर्गा त्या शक्तीचेच प्रतिनिधित्त्व करते.

ज्यावेळी आपल्याकडे साधनसंपत्ती मुबलक असते आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी योग्य व्यवस्था असते. त्यावेळी आपण आपल्या अभिव्यक्तीला संगीत, नृत्य, कला आणि संस्कृती यांच्या माध्यमातून वाट करून देतो. आपण आपले ज्ञान पुढच्या पिढीला देतो. हे सर्व सरस्वती देवीच्या रूपाशी जोडलेले आहे.

म्हणूनच संस्कृती कुठलीही असो कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साधनसंपत्ती, शक्ती आणि ज्ञान निर्माण करते.

सभ्यता, एक जटिल संस्कृती

दुसऱ्या बाजूला सभ्यता ही अशी जटिल संस्कृती आहे, ज्यात समाजातील प्रतिष्ठाक्रम, जटिल व्यवस्था आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजातील अतिरिक्त बाबींच्या माध्यमातून सार्वजनिक वास्तू आणि स्मारकांची उभारणी केली जाते.

एका शतकापूर्वी, युरोपियन लोकांनी सभ्यता हा शब्द स्वतःची एक संस्कृती म्हणून ओळख करून देण्यासाठी वापरला होता, ज्यात श्रेणीबद्ध रचना, शहरे आणि स्मारके होती. परंतु ही व्याख्या करत असताना त्यांनी स्वतःला सुसंस्कृत आणि इतरांना असंस्कृत मानले.

सभ्यतेची ही व्याख्या आज विश्वसनीय मानली जात नाही. एकेकाळी या व्याख्येमुळे असे मानले गेले की, ज्यांनी वसाहत निर्माण केल्या आणि समाजात वर्गविग्रह निर्माण केले त्यांच्याकडे सभ्यता होती. त्यामुळे संस्कृती आणि सभ्यता या दोन्ही या एकाच रचनेचा भाग मानल्या गेल्या, इतकंच नाही तर उच्च-नीच आदी भेदांनाही मान्यता दिली गेली.

त्यामुळे हीच व्याख्या लागू करायची झाली तर आदिवासींना संस्कृती आहे परंतु सभ्यता नाही. आणि हे असे म्हणणे आदिवासींसाठी अपमानास्पद आहे. त्यामुळे या जुन्या व्याख्यांच्या ग्राह्यतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची गरज आहे.

नवीन व्याख्येची गरज

कदाचित, आपल्याला नवीन व्याख्येची गरज आहे. प्रत्येक मानवाला संस्कृती ही असतेच. ही संस्कृती तिच्याशी संलग्न व्यक्तींची काळजी घेते. सभ्यता ही इतर संस्कृतींशी व्यापाराच्या माध्यमातून जोडली जाते. उदाहरणार्थ, अश्मयुगीन संस्कृती ही कांस्य युगात परिवर्तित झाली आणि त्यांनी व्यापाराला सुरुवात केली. डोंगराळ भागातील धातू आणि दगड यांची देवाणघेवाण नदी खोऱ्यातील कृषी वसाहतींशी झाली.

हडप्पा सभ्यतेचा व्यापारी संबंध हा ४५०० वर्षांपूर्वी आज इराक आणि इराण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाशी होता. हडप्पा सभ्यतेतील लोकांनी समुद्रमार्गे सुती कापड, तिळाचे तेल, हस्तिदंत, कार्नेलियनचे मणी, अगेट आणि इतर मौल्यवान खनिजे- दगड, जिवंत कोंबड्या, पाणम्हशी, कुत्रे निर्यात केले. त्या बदल्यात बिटूमन (bitumen), अत्तर, चांदी, तांब, आणि लोकरीचे कापड स्वीकारले.

इथे संस्कृती आणि सभ्यता हे एकमेकांपासून वेगळे कसे हे समजून घेण्यासाठी जारवा जमातीचे उदाहरण महत्त्वाचे ठरू शकते. जारवा ही आदिवासी जमात व्यापार करत नाही. ते नेहमीच एकाकी राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे संस्कृती आहे पण सभ्यता नाही. ते मानव आहेत. ते हत्यारं वापरतात आणि प्रथा परंपरा पाळतात म्हणून त्यांना संस्कृतीही आहे.

“त्यामुळेच सभ्यतेचा आवाका संस्कृतीपेक्षा मोजमापाने मोठा आहे. ती एका समुहापुरतीच मर्यादित नाही तर ती समूहाबाहेरील लोकांच्या गरजाही लक्षात घेते.

अधिक वाचा: प्राचीन भारताची सिंधू संस्कृती निरक्षर होती का?

तसेच, सभ्यतेच्या संदर्भात केवळ दोन संस्कृतींमध्ये केवळ वस्तूंची देवाणघेवाण होत नाही, तर विचारांचीही देवाणघेवाण होते आणि संस्कृती परिवर्तन होते. व्यापार करण्यासाठी तुम्हाला वस्तू आणि विनिमय करण्याची मानसिकता आवश्यक असते.

सभ्यता म्हणजेच जे आपल्याकडे आहे ते, जे वस्तूंच्या माध्यमातून ठळकपणे दिसून येते. या वस्तूंच्या विनिमयाची मानसिकता म्हणजे संस्कृती जे आपण असतो ते. अर्थात सर्वच संस्कृतींमध्ये ही देवाण घेवाणीची मानसिकता नसते. ज्यांच्याकडे ही मानसिकता असते अशा समाजांमध्ये सभ्यता निर्माण होते. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर सभ्यतेमध्ये संस्कृती असतेच पण सर्वच संस्कृती या सभ्यता असतातच असं नाही.

भारतीय संस्कृतीतील विविधता

भारतीय संस्कृतीचा विचार करताना केवळ उत्तर भारतापुरता मर्यादित विचार करण्याची आवश्यकता नाही. इसवी सनाच्या २५०० वर्षांपूर्वी भारताच्या वायव्य भागात हडप्पा सभ्यता लाल आणि काळ्या मातीच्या भांड्यांसह भरभराटीला आली होती. तर इ.स.पूर्व १५०० च्या सुमारास वैदिक संस्कृती राखाडी रंगाच्या मृद भांड्यांसह गंगेच्या मैदानात भरभराटीस आली. त्याच बरोबरीने उर्वरित भारतातही अनेक गोष्टी घडत होत्या.

दख्खनच्या प्रदेशात महाश्मयुगीन स्मारके उभारणारे, राखेचे डोंगर (ॲशमाउंड्स) राखणारे आणि तांब्याच्या कलाकृतींचा साठा करणारे समुदाय होते. आपण त्यांच्याकडे कसे पाहतो? या समुदायांना आपण संस्कृती म्हणणार की सभ्यता? संस्कृती असं निश्चितपणे म्हणू शकतो, कारण ते मानवनिर्मित आहेत. परंतु आपल्याला त्या संस्कृतीत व्यापाराचे पुरावे सापडत नसल्याने त्यांना सभ्यता म्हणू शकत नाही.

तसेच, महाराष्ट्राच्या रत्नागिरी किनारपट्टीवर १०,००० वर्षे जुनी कातळ शिल्पे सापडली आहेत. यांची निर्मिती नक्कीच सुसंस्कृत लोकांनी केली. परंतु ते व्यापार करत होते की नाही हे माहिती नाही. त्यामुळे त्यांची संस्कृती ही सभ्यता होती की नाही हे निश्चित सांगता येत नाही.

(देवदत्त पट्टनायक हे मिथकशास्त्राचे प्रसिद्ध अभ्यासक आहेत, त्यांनी प्राचीन कला, संस्कृती आणि वारसा या विषयांवर विपुल लेखन केले आहे)

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc art and culture with devdutt pattanayak what exactly does culture and civilization mean svs
Show comments