संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेतल्या व्यक्तिमत्व चाचणी/मुलाखत या टप्प्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करणारं हे सदर आहे. व्यक्तिमत्व चाचणीसाठी उमेदवार जातो त्यावेळी व्यक्तिमत्व चाचणी घेणाऱ्या बोर्डकडे असलेल्या अर्जात उमेदवाराबद्दल सविस्तर माहिती असते. हा अर्ज अतिशय काळजीपूर्वक भरावा लागतो, कारण यात लिहिलेल्या कोणत्याही लहान गोष्टीवर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. या फॉर्मचा एक महत्वाचा भाग म्हणजे वेगवेगळ्या सेवांचे प्राधान्यक्रम लिहिणे. हे प्राधान्यक्रम लिहिण्यासाठी त्या सेवांबद्दल माहिती असणं खूप आवश्यक आहे. गेले काही लेख आपण या वेगवेगळ्या सेवांची माहिती घेत आहोत. या सेवांचे ग्रुप ए आणि बी असे दोन प्रकार आहेत. आतापर्यंत आपण १४ प्रकारच्या ग्रुप ए गटातल्या सेवांची माहिती घेतली आहे. बाकीच्या काही सेवांबद्दल आज माहिती घेऊया.

भारतीय डिफेन्स इस्टेट सर्व्हिस

भारतीय डिफेन्स इस्टेट सर्व्हिस ( DES) ही ग्रुप अ सेवा असून पूर्वीच्या लष्करी जमीन आणि छावणी सेवेपासून आजच्या IDES पर्यंत विकसित झाली आहे. अखंड भारतातील विस्तीर्ण जमिनींचे संरक्षण आणि अधिसूचित छावणी क्षेत्राचे प्रशासन समाविष्ट आहे. महानगरपालिका क्षेत्रात ज्या प्रमाणे आयुक्त विकासाची कामे करण्यासाठी प्रशासन करतात, त्याच स्वरूपाचे काम छावणी भागात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आयडीईएस अधिकारी करतात. संरक्षण जमिनीचे सर्वेक्षण आणि नोंदी व्यवस्थापन ही महत्त्वाची जबाबदारी आयडीईएस सेवेतील अधिकाऱ्यांवर असते. या सेवेचे नेतृत्व महासंचालक डिफेन्स इस्टेट करतात आणि भारताच्या संरक्षण सचिवांच्या माध्यमातून संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत या सेवेचे अधिकारी काम करतात.

इंडियन इन्फर्मेशन सर्व्हिस (आयआयएस) या सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांना आकाशवाणी, दूरदर्शन, प्रेस इन्फर्मेशन ब्युरो, एफटीआयआय पुणे, नॅशनल फिल्म अर्काइव्ह पुणे, निवडणूक आयोग दिल्ली, राष्ट्रपती कार्यालय दिल्ली अशा अनेक ठिकाणी काम करण्याची संधी मिळते . तसंच केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या मंत्रालयांच्या कामकाजाची प्रसिद्धी आणि माहिती प्रसारण या स्वरूपाचं काम करण्याची संधी पण मिळते. या सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन दिल्ली इथे होतं.

इंडियन ट्रेड सर्व्हिस

इंडियन ट्रेड सर्व्हिस (आयटीएस) ही एच.सी. माथूर कमिटीच्या शिफारसीवरून भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी आणि वाणिज्यविषयक धोरणाच्या आखणी आणि अंमलबजावणीसाठी भारताची पहिली आयटीएस तुकडी १९८६ साली नियुक्त करण्यात आली. देशाची व्यापारासंबंधी धोरणं ठरवताना आवश्यक असणाऱ्या वाटाघाटी करणे, दोन देशांमधले व्यापारसंबंध, अनेक देशांमधले व्यापारसंबंध याबद्दल भारताची भूमिका ठरवणे, त्यासंबंधी वाटाघाटी करणे हा त्यांच्या कामाचा महत्त्वाचा भाग असतो. ह्या सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड , दिल्ली आणि कोलकाता इथे होतं.

इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिस

इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिस (आयसीएलएस) २००९ मध्ये सुरू करण्यात आलेली भारत सरकारची कायदेविषयक अ दर्जाची सेवा. ही पूर्वी इंडियन कंपनी लॉ सर्व्हिस म्हणून ओळखली जायची. या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण हरियाणा राज्यातील माणेसर येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स या संस्थेत दिले जाते. देशातील खासगी उद्याोग क्षेत्रांच्या कार्यप्रणाली वर निगराणी ठेवणे, देशभर कंपनी कायद्याची योग्य ती अंमलबजावणी करणे संपूर्ण देशात उद्याम कायदे प्रत्यक्ष अमलात आणून त्यात योग्य ती सुसूत्रता आणणे या जबाबदाऱ्या कउछर अधिकाऱ्यांना सोपविण्यात येतात.

ग्रुप बी गटात , दिल्ली, अंदमान निकोबार, लक्षद्वीप, दमण दीव दादरा नगर हवेली नागरी सेवा (DANICS) आणि दिल्ली, अंदमान निकोबार, लक्षद्वीप, दमण दीव दादरा नगर हवेली पोलीस सेवा (DANIPS) या दोन महत्वाच्या सेवा आहेत. या दोन सेवामधून आयएएस, आयपीएससाठी नॉमिनेशन होण्याची संधी मिळू शकते. राज्यातील उपजिल्हाधिकारी किंवा पोलीस उप अधीक्षक सारख्या DANICS आणि DANIPS या सेवा आहेत. दिल्ली सरकारच्या इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन मध्ये DANICS सेवेतील अधिकाऱ्याचे प्रशिक्षण होते तर DANIPS. सेवेतील अधिकाऱ्याना पोलीस ट्रेनिंग कॉलेज झरोदाकलांन, दिल्ली येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात येते.

पाँडेचरी नागरी सेवा आणि पाँडेचरी पोलीस सेवा या पॉंडेचरी केंद्र शासित प्रदेशातील सेवा असून सुरुवात उपजिल्हाधिकारी/ पोलीस उपअधीक्षक या पदावर होते. आंध्रप्रदेश राज्यातील पूर्व गोदावरी जिल्हा सरहद्दीवर यानम हा पाँडेचरी केंद्र शासित प्रदेशाचा भाग आहे. आर्म्ड फोर्सेस हेडक्वार्टर्स सर्व्हिसेस ( AFHQCS) सेक्शन ऑफिसर्स ग्रुप ब सेवा १९६८ साली या सेवेची स्थापना झाली. भारतीय संरक्षण दलाच्या तिन्ही दलांना प्रशासकीय कामकाजसाठी या सेवेतील अधिकारी प्रामुख्याने मदत करतात.संरक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या DRDO, DGQA, DGNCC या संस्थांना ही AFHQCS सेवेतील अधिकारी मदत करतात. प्रामुख्याने दिल्लीस्थित संरक्षण दलाच्या मुख्यालयात या सेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती होते.

आजपर्यंतच्या लेखांत आपण विविध सेवांविषयी आणि त्यांच्या प्रधान्यक्रमाविषयी माहिती घेतली. यापुढील लेखात केंद्र लोकसेवा आयोगाच्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या वैयक्तिक चाचणी/ मुलाखतीच्या प्रत्यक्ष तयारीविषयी जाणून घेणार आहोत.

– mmbips@gmail. com

– supsdk@gmail. com

Story img Loader