यूपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी नीतिशास्त्र हा अभ्यासाचा एक भाग आहे. नीतिशास्त्राचा अभ्यास करताना लोभ आणि गरज या संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहेत. मागील लेखामध्ये लोभ आणि गरज या संकल्पना पाहिल्या होत्या. या लेखामध्ये लोभ आणि गरज यातील फरक एका घटनेच्या आधारे समजून घेणार आहोत. या घटनेमधून व्यक्तिमत्त्वाचे पैलू, लोभी, स्वार्थीपणा व गरजवंत यांतील फरक लक्षात येईल.
काय आहे नमित आणि स्वार्थाची गोष्ट…
नमित आणि स्वार्थ एकमेकांना ओळखत असतात. पण, त्यांच्यात काही खास अशी मैत्री नव्हती. पाच वर्षं काहीच संपर्क नसताना एक दिवस स्वार्थचा नमितला फोन आला. अर्धा तास गप्पा झाल्या तरी पाच वर्षांनी का फोन केला याचं काही कारण कळत नव्हतं. स्वार्थ केवळ स्वतःच्या करिअरविषयी बोलत होता. बोलता बोलता तो म्हणाला की, गेल्या वर्षी माझा अपघात झाला होता. आता मी व्यवस्थित आहे. माझ्या संकटाच्या काळात माझ्या मित्रांनी मला खूप मदत केली; अगदी आर्थिक मदतही केली. आता मी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आर्थिक ताण खूप होता; पण देवाच्या कृपेने सगळं ठीक सुरू आहे.
एक दिवस नमित पुस्तक लिहिण्यात मग्न होता. तेवढ्यात स्वार्थचा त्याला मेसेज आला. ”नमित, तू मला दोन लाख रुपये पाठवू शकतोस का? माझ्यावर कर्जाचा भार आहे. तुझ्या मदतीने तो हलका होईल.” या मेसेजमुळे नमित गोंधळून गेला. पण, त्यानं होकार दिला. थोड्या वेळातच स्वार्थचा फोन आला, ”शक्य असेल तेवढ्या लवकर देशील का? तुझी खूप मदत झाली. मी अशी मदत मागितली म्हणून तू विचित्र वाटून घेऊ नकोस. माझा अपघात झाल्यापासून मी गाडी चालवू शकत नाही. पण, माझी पत्नी गाडी चालवते. काल मी तिला तुझ्याविषयी सांगितलं.” अशा संवादामुळे नमितला जाणवलं की, स्वार्थ आपल्याला फक्त ओळखीची व्यक्ती मानत नाही, तर मित्रत्वाच्या भावनेनं आपल्याकडे बघतो आहे.
नमितचा स्वभाव उदार होता. त्यानं लगेच चेकबुक काढलं. इतक्यात त्याला स्वार्थच्या पत्नीचा फोन आला. ”नमितजी, मी स्वार्थची पत्नी बोलते आहे. आम्ही नवीन घर घेतलेलं, त्याचं कर्ज कोटींमध्ये आहे. आम्हाला पैशांची गरज आहे. तुम्ही खूप चांगले आणि दयाळू आहात. तुम्ही आम्हाला मदत करताय, ही मोठी गोष्ट आहे.” बोलणं झाल्यावर फोन ठेवत असताना नमितच्या कानावर एक संवाद आला. ”मॅडम, तुम्ही नंबरप्लेट नसलेली बेंझ का चालवत आहात? ही नवीन गाडी आहे का?” या संवादामुळे नमित गोंधळून गेला. तो स्वतःशीच विचार करू लागला की, स्वार्थला पैशांची गरज असताना त्याला नवीन गाडी घेण कसं परवडेल?” या परिस्थितीत नमितनं कसं वागणं आवश्यक आहे?
प्रश्न :
१. वरील घटनेत मुख्य समस्या काय आहे आणि नैतिक वर्तन कोणते आहे? ते ओळखा.
२. वरील घटनेत नमितकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत आणि त्याने कोणते पर्याय स्वीकारले पाहिजेत ?
विचार प्रक्रिया
भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेणे चूक आहे. योग्य निर्णय घेण्यासाठी सारासार विचार करणे आवश्यक असते. बुद्धीचा वापर केल्यास तुम्हाला हेतू, परिणाम यांचा अंदाज येतो. सतत कर्ज घेणे किंवा दुसऱ्यांकडे पैसे मागणे ही सवय झालेली आहे का? कर्ज घेण्याची खरंच आवश्यकता आहे का? किंवा कर्ज घेण्याचा मोह आहे? कर्ज घेतल्यावर त्याची परतफेड करण्यात येणार आहे का? असे काही प्रश्न नमित आणि तुमच्याही मनात आले पाहिजेत.
सध्या एक गोष्ट प्रकर्षाने दिसते की, कर्ज घेणे ही सवय झालेली आहे. कर्ज घेण्यासाठी कारणे शोधली जातात. छोट्या-मोठ्या गोष्टींकरिता पैसे मागणे, कर्ज घेणे अशा कृती लोक करतात. पण, यामध्ये खरेच कर्ज घेण्याची गरज किती आहे, हे बघितले पाहिजे. कर्ज घेणे ही सवय झाली आहे का? की आर्थिक व्यवस्थापनाचे गणित चुकते आहे? याचा विचार करून योग्य समुपदेशन केले गेले पाहिजे. समुपदेशन करून काही उपयोग झाला नाही किंवा ती व्यक्ती बदलत नसेल, तर मात्र मदत करताना अधिक विचार करा. सतत मदत करणेही चुकीचे ठरू शकते. त्या व्यक्तीला किती गरज आहे, परिस्थिती काय आहे, समस्या काय आहे यांची व्यवस्थित चौकशी करा आणि मगच मदत करण्याचा विचार करा.
ही घटना तार्किक विचार करण्यास प्रवृत्त करते. पैशांचा लोभ आहे की खरेच गरज आहे, याचा योग्य विचार होणे आवश्यक आहे. नमित पुढील कृती काय करू शकतो याचा तर्काने विचार केला पाहिजे.
१. मदत करण्यास नकार :
नमितचा स्वार्थच्या पत्नीशी संवाद
झाल्यानंतर ऐकलेल्या वाक्यांच्या आधारे तो मदत करण्यास नकार देऊ शकतो. पुन्हा फोन आल्यास उत्तर देऊ शकतो. स्वार्थला समज देऊ शकतो.
२. प्रश्न न विचारता मदत करणे :
स्वार्थने जे सांगितले आहे; त्यावर विश्वास ठेवून, त्याला मदत करणे हा चांगुलपणा आहे. पण, हा चांगुलपणा इथे दाखवणे योग्य आहे का? किंवा या चांगुलपणाची आवश्यकता आहे का?
३. प्रत्यक्ष भेटून संवाद साधणे :
स्वार्थ व त्याची पत्नी नमितशी फोन, मेसेजद्वारे संवाद साधत आहेत. नमितने प्रत्यक्ष भेटून संवाद साधणे आवश्यक आहे. शांतपणे बोलून, परिस्थिती समजून घेऊन, मग नमितने निर्णय घ्यावा.
नमितने अजून कोणती कृती करावी, याचे आणखी पर्याय सुचवू शकता. नमितने कोणत्या पर्यायाचे अनुसरण करावे, हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.