UPSC– स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण विशेष लेखांची मालिका सुरू करत आहोत. यामध्ये नावाजलेले विद्वान विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. इतिहास, राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, कला संस्कृती व वारसा, पर्यावरण, भूगोल, विज्ञान व तंत्रज्ञान असे अनेक विषय आपण समजून घेणार आहोत. या तज्ज्ञांच्या विद्वत्तेचा लाभ घ्या आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हा. या लेखात, मिथकशास्त्रात पारंगत असलेले प्रख्यात लेखक देवदत्त पट्टनायक मातीच्या भांड्यांच्या माध्यमातून इतिहासाची झलक कशी मिळते याची सविस्तर माहिती देत आहेत. सुरुवातीला मानवाकडे भांडी नव्हती. त्यामुळे त्याला प्रभावीपणे अन्नाचा साठा करता आला नाही. परंतु भांड्यांचा शोध लागल्यावर मनुष्य अन्न आणि पाणी स्वतःबरोबर घेऊन जाऊ शकत होता, त्यामुळे भांडी पूजनीय ठरली. मातीच्या भांड्यांच्या आधी मानवाने टोपल्यांचा शोध लावला. गवताच्या टोपल्यांना मातीचे लेपन करून सुरुवातीची भांडी तयार केली जात होती. त्यानंतर मातीचे लेपन केलेल्या टोपलीला भाजले जात होते. या प्रक्रियेमुळे मातीच्या आतील गवताची टोपली जळून जात असे. नंतरच्या कालखंडात कुंभाराच्या चाकाचा शोध लागला आणि मातीच्या भांड्यांच्या गुणवत्तेत सुधारणा झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अधिक वाचा : देवदत्त पट्टनायक यांच्यासह कला आणि संस्कृतीचा अभ्यास। भारतीय स्थापत्यकलेतील ९ प्रभावी क्षितिजे

हडप्पाकालीन भांडी

इसवी सनपूर्व ७००० वर्षांपूर्वी मेहरगढमध्ये मातीचे लेपन केलेल्या गवताच्या टोपल्या तयार केल्या जात होत्या. परंतु इसवी सनपूर्व ३००० वर्षांपूर्वी परिस्थिती बदलली. या संस्कृतीतील लोकांनी चाकावर तयार केलेल्या मातीच्या भांड्यांचा वापर करण्यास सुरुवात केली. शहरीकरणाच्या पूर्वीच्या टप्प्यात वायव्य भारतात भांडी अनेक रंगांचा वापर करून रंगवली जात होती. परंतु कालांतराने हे रंग वापरणे बंद झाले. हडप्पा संस्कृतीच्या नागरीकरणाच्या टप्प्यात काळी आणि लाल भांडी वापरली जात होती. लाल पृष्ठभागावर काळया रंगात नक्षीकाम हे हडप्पाकालीन मृदभांड्यांचे वैशिष्ट्य आहे. मातीच्या भांड्यांवरील चित्रे अद्वितीय आहेत. या चित्रांमध्ये/ नक्षीकामामध्ये पिंपळाची पाने, माशांच्या आकृत्या/ खवल्यांचे नक्षीकाम, एकमेकांमध्ये गुंतलेली वर्तुळं, मोर इत्यादींचा समावेश होतो. इतर प्रकारच्या भांड्यांमध्ये लहान ‘कुल्हड’ (मातीचा कप) सारख्या भांड्यांचा समावेश होत होता. तसेच १ मीटर उंच ‘ब्लॅक स्लिप्ड’ जार (पृष्ठभागावर काळ्या रंगाचा थर असलेलं भांड) सारखी भांडी सागरी व्यापारामार्फत विविध वस्तू ओमानला पोहोचवण्यासाठी वापरली जात होती.

‘वेगळ्या प्रकारच्या हडप्पाकालीन मातीच्या भांड्यांमध्ये छिद्र असलेली भांडी, झाकण असलेली एस-आकाराची भांडी आणि डिश- ऑन- स्टॅण्ड यांचा समावेश होता. यांचा संबंध विशिष्ट प्रकारच्या स्वयंपाक आणि विधींशी असल्याचे सूचित होते’.

हडप्पामध्ये लहान आकाराची भांडी सापडली आहेत, ज्यांचा वापर सौंदर्यप्रसाधने ठेवण्यासाठी केला जात असावा. हडप्पाच्या भांड्यांमध्ये मणी आणि दागिन्यांचा साठाही केला जात होता याचेही पुरावे सापडतात. शिवाय, हडप्पाच्या स्मशानभूमीत मृतांसह पुरलेली भांडी आढळतात. हडप्पा या संस्कृतीचा ऱ्हास झाल्यावर काही मोठ्या भांड्यांमध्ये मृतदेह किंवा अंत्यसंस्कार केलेल्यांची हाडेही ठेवण्यात आली होती.

मृदभांड्यांमध्ये आढळणारी विविधता

हडप्पाच्या काळातही मृदभांड्यांच्या प्रकारात/ आकारात विविधता पाहायला मिळते. गुजरातमध्ये (सोरथ हडप्पा झोन) सापडणारी भांडी कपाच्या आकाराची होती. त्यांचा वापर बाजरीची लापशी (आंबील) शिजवण्यासाठी केला जात असे. यात कान (हँडल) असणारी भांडीदेखील होती. सिंधू प्रदेशातील (क्लासिक हडप्पा झोन) भांडी ‘हंडी’ किंवा भारतीय स्वयंपाकाला साजेशी होती.

हडप्पा कालखंडानंतरही गेरू आणि नंतर (ब्लॅक ऑन रेड) काळ्यावर लाल रंग असलेली मृद भांडी प्रचलित होती, त्यांचा आढळ दक्षिणेकडे दिसून आला.  काही अभ्यासकांच्या मते हे हडप्पाहून दक्षिणेकडे होणारे स्थलांतर सूचित करते. हा सिद्धांत वादग्रस्त आहे. ही मातीची भांडी आजही भारताच्या बहुतांश भागात सापडतात.

अधिक वाचा : Vasco da Gama ‘या’ गुजराती तांडेलाने ‘वास्को द गामा’ला भारतात आणले; इतिहास नेमके काय सांगतो? 

याउलट गंगेच्या खोऱ्यातून ब्लॅक अॅण्ड रेड (काळी आणि लाल) रंगाची भांडी काही शतकापासून नामशेष झालेली आहेत. वैदिक कालखंडात (इसवी सनपूर्व १०००- ६००) गंगा- यमुना दोआबामध्ये मातीच्या भांड्यांच्या रचनेत बदल झालेला दिसतो. या कालखंडात कुंभाराच्या चाकावर तयार करण्यात आलेल्या राखाडी रंगाची (पेंडेड ग्रे वेअर) भांडी होती. यानंतर महाजनपदांच्या कालखंडात (इसवी सनपूर्व ७००- ४००) आपल्याकडे बारीक गाळाच्या मातीपासून जलद गतीने फिरणाऱ्या चाकावर तयार केलेली काळ्या रंगाची तकाकी असलेली उत्तरेकडे तयार केलेली भांडी (नॉर्दर्न पॉलिश ब्लॅक वेअर) होती.  या मृद भांड्यांची गणना चैनीच्या वस्तूंमध्ये केली जाते. भांड्यांची अतिशय कमी असलेली जाडी कारागिरांचे अप्रतिम कौशल्य सिद्ध करते. या भांड्यांच्या पृष्ठभागावर फेरस ऑक्साईडचा थर दिला जात होता, जो भाजल्यावर काळ्या रंगात परिवर्तित होतो. तसेच, चकचकीत पोर्सेलीनची भांडी चीनमधून समुद्रमार्गे आणि मध्य आशियाई भूमार्गावरून सुमारे इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकात भारतात आली. हा नवीन संस्कृतीशी आलेला संबंध दर्शवणारा पुरावा आहे.

भांडी आणि विधी

हिंदू धार्मिक विधींमध्ये हिंदू देवी- देवतांचे प्रतीक म्हणून पूर्णकुंभाची (या कुंभात जल, धान्य/ अंकुरलेले धान्य, आंब्याची डहाळी त्यावर नारळ असतो) पूजा केली जाते. अशा प्रकारच्या प्रतिमा प्राचीन हिंदू, बौद्ध आणि जैन शिल्पांमध्येही आढळून आल्या आहेत. ब्रह्म्यासारखे देव आणि साधू संत यांच्या हातात कुंभ दाखवलं जातं. या भांड्याला तोटी असते, या प्रकारच्या कुंभाला ‘कमंडलू’ असं म्हणतात. मातीचे मोठे भांडे ‘घट’  पाण्याचा साठा करण्यासाठी वापरतात, देवी लक्ष्मीच्या हातातही घट दाखवला जातो. या घटाचा उपयोग नवरात्रीत देवीचे प्रतिक म्हणून केला जातो. या घटाचा वापर लग्न विधींमध्येही केला जात होतो आणि दक्षिण भारतात मंदिर उत्सवात स्त्रिया या घटाचा  वापर करतात. घट किंवा कलश प्रजनन आणि मातृत्वाचे प्रतीक आहेत आणि त्यामुळे अनेक प्रजनन संस्कारांचा अविभाज्य भाग आहेत. मातीचे भांडे/घट अंत्यसंस्कार विधींचा देखील एक भाग आहेत. या भांड्यात अग्नी आणि जल ठेवले जाते. वैदिक अंत्यसंस्कारांचा भाग म्हणून चिता पेटवण्यापूर्वी पाण्याचे भांडे/ घट फोडला जातो.

भारतीय भांडे अतिशय अद्वितीय आहे. लोटा किंवा कलश या नावाने ओळखल्या जाणाऱ्या याला कडी आणि मान आहे. लोटा हा हडप्पा संस्कृतीच्या काळापासून सापडला आहे. रिम किंवा भांड्याच्या मुखावरील किनारीमुळे पाणी सांडत नाही आणि द्रव ओतणे सोपे करते. भांडे गोलाकार असल्यामुळे गुरुत्वाकर्षणाचे केंद्र जमिनीकडे जास्त असते. पर्शियन ‘सुरई’ भारतीय ‘कलशा’च्या तुलनेत अधिक उंच असते आणि या भांड्याला रिम नसते. रोमन अॅम्फोरामध्ये सामान्यत: साइड हॅन्डल्स असतात.

अशा प्रकारे, मातीच्या भांड्यांचा अभ्यास त्याची निर्मिती आणि वापर करण्याची पद्धत आणि त्यावर रंगवलेल्या कलाकृती आपल्याला भारतीय संस्कृतीबद्दल बरेच काही सांगून जातात.

विषयाशी संबंधित प्रश्न –

भारतातील मातीच्या भांड्यांचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व काय आहे?

मातीच्या भांड्यांचा विकास हा मानवी संस्कृतीतील प्रगती कशी दर्शवतो?

अद्वितीय हडप्पा कुंभारकामाच्या प्रमुख वैशिष्ट्यांची चर्चा करा.

भारतातील विधी आणि समारंभांशी मातीची भांडी कशी जोडली गेली आहेत ?

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc current affairsupsc essentialsart culture study of art and culture with devdutt pattanaik how do pottery provide a glimpse of culture svs