UPSC– स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण विशेष लेखांची मालिका सुरू करत आहोत. यामध्ये नावाजलेले विद्वान विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. इतिहास, राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, कला संस्कृती व वारसा, पर्यावरण, भूगोल, विज्ञान व तंत्रज्ञान अशा अनेक विषयांना आपण समजून घेणार आहोत. या तज्ज्ञांच्या विद्वत्तेचा लाभ घ्या आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हा. आजच्या विशेष लेखामध्ये पुराणशास्त्र आणि संस्कृती या विषयामधले तज्ज्ञ देवदत्त पट्टनायक भारताच्या ९ क्षितिजांचा आढावा घेत असून इतिहास, स्थापत्यशैली आणि संस्कृतीच्या संपन्न वारसा उलगडत आहेत. आपण वर्तमानातून भूतकाळाकडे प्रवास करणार आहोत. त्यामुळे या क्षितिजांच्या पटलावरील पहिला टप्पा सध्या आपण जगत असलेल्या २१ व्या शतकातील आहे. सध्या मुंबई आणि दिल्ली यासारख्या शहरांमध्ये दिसणाऱ्या काचेच्या आणि काँक्रीटच्या गगनचुंबी इमारतींच्या माध्यमातून आपण तो पाहू आणि अनुभवू शकतो. या आधुनिक गगनचुंबी इमारती भारतदेखील सिंगापूर, लंडन आणि मॅनहॅटनमध्ये आढळणाऱ्या कॉर्पोरेशन्स आणि समूहांच्या आंतरराष्ट्रीय समुदायाचा भाग असल्याचे दर्शवतात. या इमारतींच्या शैलीतून कार्यक्षमता, परिणामकारकता आणि आर्थिक उत्पादकतेबद्दल घेतलेली काळजी प्रकट होत असली तरी, त्यात सांस्कृतिक पैलूंना कमी महत्त्व दिल्याचे लक्षात येते.
यानंतर भारतीय क्षितिजांच्या इतिहासातील दुसरा टप्पा हा स्वातंत्र्योत्तर कालखंडातील आहे, या कालखंडात सोव्हिएत- शैलीतील गृहनिर्माण सोसायटींच्या इमारतींच्या रचनेला प्राधान्य देण्यात आल्याचे दिसते. या स्थापत्य शैलीने स्वतंत्र भारतातील सरकारी वसाहतींना आकार दिला. या मागील मुख्य उद्दिष्ट समतावादी समाज निर्माण करण्याचे होते. सुरुवातीला १९५७ साली अस्तित्त्वात आलेल्या दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटीसारख्या संस्थांनी दिल्लीतील सुमारे एक तृतीयांश घरबांधणीचे काम केले. या घरांचे निर्माण हा शहरीकरणाचा भाग म्हणून पाहिला गेला. शहरीकरणाची पायाभरणी काळजीपूर्वक केली जात होती.
त्यापूर्वी, तिसरे क्षितिज म्हणून उदयास आली ती, इंडो सारसेनिक स्थापत्य शैली. या स्थापत्य शैलीत प्रामुख्याने १९ व्या शतकातील ब्रिटिश वास्तू घडवल्या गेल्या, या शैलीतील संरचनेत प्रामुख्याने घड्याळाचे टॉवर, टेहळणी मनोरे, न्यायालये आणि रेल्वे स्थानके यांचा समावेश होता. या रचनांनी औद्योगिकीकरण आणि ब्रिटिश साम्राज्य नियंत्रणाच्या नवीन युगाचे संकेत दिले.
तसेच, १९३० च्या दशकात, मुंबईच्या किनारपट्टीवर आर्ट डेको म्हणून ओळखली जाणारी एक आधुनिक आंतरराष्ट्रीय चळवळ प्रत्यक्षात दिसू लागली. मुंबई शहरातील कार्यालयीन इमारती, निवासस्थानं आणि चित्रपटगृहांमध्ये ही शैली ठळकपणे वापरली जात होती. फाउंटनहेड या पुस्तकातील एखाद्या दृश्याप्रमाणे, गोलाकार कोपरे जहाजाला असतात त्याप्रमाणे पोर्थोल खिडक्या (गोलाकार) , शिप डेक शैलीतील रेलिंग आणि एकाच रंगात असणारे फ्रोझन फाउंटन या वैशिष्ट्यांमुळे या शैलीतील इमारतींना ओळखणे सहज शक्य आहे. भारतावर युरोपियनांचा प्रभाव म्हणून या शैलीची गणना आपण क्षितिज ३.५ म्हणून करू शकतो.
“२१ व्या शतकातील काचेच्या आणि काँक्रीटच्या गगनचुंबी इमारती, इंडो-सारसेनिक स्थापत्य, आर्ट डेको स्ट्रक्चर्स, टर्को पर्शियन युगातील इस्लामिक वास्तुकला, राजपूत स्थापत्य शैली ही काही स्थापत्यशास्त्रातील चमत्कारांची उदाहरणे आहेत.”
याशिवाय चौथे क्षितिज किंवा टप्पा हा मराठा कालखंडातील आहे. किल्ले आणि मंदिरे या कालखंडाचे प्रतिनिधित्व करतात, या मराठाकालीन वास्तुरचनेत प्रामुख्याने आढळणारी वैशिष्ट्ये म्हणजे कमान, घुमट आणि मिनार हे मराठा स्थापत्य शैलीवर पर्शियन स्थापत्यकलेचा प्रभाव दर्शवतात. १७००-१८०० या कालखंडात प्रचंड मोठी तटबंदी हे मराठा स्थापत्य रचनेचे वैशिष्ट्य होते, याच कालखंडात मराठ्यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार दिल्लीच्याही पलीकडे उत्तरेकडे केला होता.
त्यापूर्वी टर्को पर्शियन या इस्लामिक स्थापत्य शैलीने पाचव्या क्षितिजाचे प्रतिनिधित्त्व केले. १२ व्या शतकाच्याबरोबरीने सुरु झालेला कालखंड मशिद, दर्गा, थडगे आणि राजवाडे यांच्यावरील घुमट, मिनार आणि कमानींच्या माध्यमातून दिसणाऱ्या पर्शियन प्रभावासाठी ओळखला जात होता. या स्थापत्य शैलीने मानवी प्रतिमांचा वापर टाळला आणि कॅलिग्राफी म्हणून अरबी लिपी वापरली.
याच सुमारास राजपूत वास्तुशैलीचाही विकास झाला. अद्वितीय घुमटाकार छप्पर किंवा छत्री, भिंतीतून बाहेर डोकावणाऱ्या वैशिष्टयपूर्ण खिडक्या (झरोके) ही राजपूत वास्तुकलेची काही वैशिष्ट्ये आहेत. १५०० नंतर हीच शैली मुघलांनी अंगिकारली, त्यानंतर या शैलीत काही महत्त्वपूर्ण बदल झाल्याचेही आढळून येते.
अधिक वाचा: यूपीएससी सूत्र : इजिप्शियन स्मशानभूमीतील भारतीय माकडे अन् भारताचे शेजारी प्रथम धोरण, वाचा सविस्तर..
इसवी सन ५०० पासून, पटलावर सहाव्या क्षितिजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंदिरांचे वर्चस्व होते. दक्षिणेकडील मंदिरे (द्रविड शैलीतील) त्यांच्या अतिभव्य प्रवेशद्वारासाठी (गोपुर) आणि पिरॅमिड सारख्या रचनेसाठी ओळखली जाऊ शकतात.
दुसरीकडे, उत्तर भारतातील मंदिरे (नागर शैली), त्यांच्या घंटाकार आणि पर्वतीय आकारासाठी तसेच वक्ररेषांनी युक्त शिखरांसाठी ओळखली जातात. हिंदू मंदिरे भव्य असली तरी आपल्याला पलिताना आणि माऊंट अबू येथील पर्वतांवर मुकुटाप्रमाणे आरूढ जैन, मंदिरांनाही विसरून चालणार नाही.
स्थापत्यशैलीच्या इतिहासातील सातव्या क्षितिजादरम्यान म्हणजेच इसवी सनपूर्व ३०० (तिसऱ्या शतकापासून) ते इसवी सन ३०० (तिसरे शतक) या कालखंडादरम्यान बौद्ध आणि जैनांचे दगडी खांब, घुमटाकार स्तूप, लेणी आणि मंदिरे (चैत्य) यांचे वर्चस्व होते. प्रामुख्याने या रचना बौद्धांच्या होत्या, या कालखंडात हिंदूंनी स्थापत्यशास्त्राच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करण्यास सुरुवात केलेली नव्हती.
त्यापूर्वी एक हजार वर्षांचा कालखंड असा होता जेव्हा उत्तर भारताबद्दल बोलण्यासारखे फारसे काही नव्हते. अर्थात महाकाव्यांमध्ये हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ या सारख्या भव्य शहरांचे वर्णन असले तरी घरे सेंद्रिय पदार्थांनी (नाशवंत वस्तूंपासून- चिखल आणि पेंढा) तयार केलेली होती, त्यामुळे ती टिकू शकली नाहीत.
इसवी सनपूर्व १००० वर्षांपासून दख्खन प्रदेशात, डोल्मन्स होती – (महाश्मयुगीन स्मारके) हेच आठवे क्षितिज आहे. डोल्मन्स हे दफनभूमीचे स्थळ म्हणून ओळखले जात होते, या दफनभूमीत प्रतिष्ठित लोकांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात किंवा ते दफन केले जात असत. डोल्मन्सची रचना दगडी स्लॅब्सच्या माध्यमातून तयार होते, दोन किंवा अधिक उभ्या स्लॅब्जवर मोठा पसरट दगडी स्लॅब ठेवण्यात येतो, ही रचना काही वेळेस दगडांच्या वर्तुळाने वेढलेली असते.
अखेरीस, ४,५०० वर्षांपूर्वी, इसवी सनपूर्व २५०० मध्ये, भारताच्या वायव्य भागात हडप्पा संस्कृतीची मातीच्या विटांपासून तयार करण्यात आलेली तटबंदीची शहरे अस्तित्त्वात आली. हे नववे क्षितिज होते. येथे उल्लेखनीय बाब म्हणजे इजिप्तच्या पिरॅमिड्स किंवा मेसोपोटेमियाच्या झिग्गुराट्ससारख्या मोठ्या, प्रभावशाली संरचना येथे नाहीत, कदाचित तुलनेने हा समाज समतावादी असल्यामुळे हे घडले असेल. सर्वसामान्य जनतेला घाबरवण्यासाठी राजवाडे आणि थडग्यांचे स्थापत्य वापरण्याची गरज उच्चभ्रू वर्गाला तेव्हा वाटली नाही.
विषयाशी संबंधित प्रश्न:
इंडो-सारसेनिक स्थापत्य म्हणजे काय? त्याची वैशिष्ट्ये सूचीबद्ध करा.
राजपूत वास्तुकलेची प्रमुख वैशिष्ट्ये सांगा.
मंदिर वास्तुकलेतील नागरा आणि द्रविड शैलीतील फरक स्पष्ट करा.