UPSC– स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लेखांची मालिका आम्ही सुरू करत आहोत. यामध्ये नावाजलेले विद्वान विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. इतिहास, राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, कला संस्कृती व वारसा, पर्यावरण, भूगोल, विज्ञान व तंत्रज्ञान असे अनेक विषय आपण समजून घेणार आहोत. या तज्ज्ञांच्या विद्वत्तेचा लाभ घ्या आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हा. या लेखात, मिथकशास्त्रात पारंगत असलेले प्रसिद्ध लेखक देवदत्त पट्टनायक मौर्य स्तंभांपासून ते चोलांच्या कांस्य नटराजापर्यंतच्या शिल्पांचा इतिहास उलगडून सांगत आहेत.
शिल्पकला वास्तुकलेपेक्षा वेगळी कशी आहे?
स्थापत्यशास्त्र हे निवासस्थानांशी संबंधित आहे. त्यात प्रामुख्याने गृहरचना, वाडे, कबरी, मंदिरं, मशिदी, स्मारकं इत्यादींचा समावेश होतो. तर दुसरीकडे शिल्प ही अधिक सौंदर्यात्मक किंवा धार्मिक असतात. ती तयार करण्यामागे विशिष्ट वापराचे असे काही खास कारणही नसते.
शिल्पांमध्ये मुख्यत्त्वे करून मानव, प्राणी, वनस्पती किंवा अलौकिक प्राणी हे एकटे उभे किंवा भिंतीमधून बाहेर डोकावत असतात. इतिहासातील सर्वात प्राचीन शिल्पांचा कालखंड हा सिंधू संस्कृतीशी संबंधित आहे (इसवी सनपूर्व २५००-१९००). या शिल्पांमध्ये मृण्मय मूर्ती, स्त्री मूर्ती, सालंकृत मूर्ती (कदाचित विधींसाठी वापरल्या जात असाव्यात), कांस्य मूर्तीचा (१०.५ सेमी लांब) समावेश होतो. कांस्य मूर्ती ही मूर्ती डान्सिंग गर्ल या नावाने ओळखली जाते. लॉस्ट वॅक्स पद्धत वापरून ही मूर्ती तयार करण्यात आली होती. दगडापासून तयार केलेली प्रिस्ट किंगची मूर्तीही प्रसिद्ध आहे. ही मूर्ती सॉफ्ट स्टोन किंवा स्टीटाइटपासून तयार केलेली आहे.
अधिक वाचा: देवदत्त पट्टनायक यांच्यासह कला आणि संस्कृतीचा अभ्यास | मातीची भांडी संस्कृतीची झलक कशी देतात?
मौर्य स्तंभापासून स्तूपांपर्यंत
भारतीय इतिहासात इसवी सनपूर्व १९०० ते ३०० या कालखंडात फारशी शिल्पं आढळत नाही. वैदिकजनांनी शिल्प तयार केली नाहीत. किमान त्यांनी टिकाऊ सामुग्री वापरली नाही. मौर्य साम्राज्यादरम्यान (इसवी सनपूर्व ३२०-१८५), स्तंभांच्यावर शिल्प तयार करण्यात आली. हे समजून घेण्यासाठी अशोकाचे स्तंभ हे उत्तम उदाहरण ठरू शकतात. त्याच्या सारनाथ स्तंभशीर्षावर चार सिंह, धम्मचक्र, आणि स्तंभशीर्षाच्या पट्टीवर सिंह, हत्ती, बैल आणि घोडा हे चार प्राणी आहेत. “अशोकाच्या काळात अनेक स्तूप बांधले गेले, तर नंतरच्या कालखंडात म्हणजेच शुंग आणि सातवाहनांच्या कालखंडात स्तूपाच्या वेदिकेचा विस्तार झाला.” सांची आणि भारहूतच्या स्तूपाच्या वेदिकेवर इसवी सनपूर्व पहिल्या शतकातील कोरीव काम केल्याचे आढळते. या कोरीव कामात गौतम बुद्धांच्या जीवनातील प्रसंग कोरलेले आहेत. यावर ग्रीक आणि पर्शियन कलाकारांचा प्रभाव दिसून येतो.
गौतम बुद्धांच्या शिल्पाचा उगम
इसवी सनाच्या पहिल्या शतकात कुशाण साम्राज्याच्या कालखंडात पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यात गांधार शैली तर गंगेच्या मैदानात मथुरा कला आणि भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील कृष्णा आणि गोदावरीच्या खोऱ्यात अमरावती कला विकसित झाली. सिंधू, गंगा, गोदावरी आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यातील ही प्रमुख व्यापारी केंद्रे होती.
प्रारंभिक कलेमध्ये बुद्धाचे रूप प्रतिकात्मक स्वरूपात येते. गौतम बुद्धांची पहिली प्रतिमा गांधार शैलीत की मथुरा शैलीत तयार झाली यावर एकमत नाही. कुशाण राजांनी या प्रतिमा निर्मितीला राजाश्रय दिला. आपल्याला कनिष्काचे शिल्प सापडते. या प्रतिमेनेच बहुधा कर्नाटक येथील सन्नती या स्थळावर अशोकाचेच भारतातील सर्वात जुने चित्रण शिल्पावर कोरण्याची प्रेरणा दिली असावी. गांधार कलेत शिस्ट स्टोन किंवा स्टको प्लास्टर वापर करण्यात आले होते. उत्कृष्ट रोमन ग्रेस, ड्रेपरी आणि निंबस (डोक्याच्या मागे सूर्य) ही या कलेत दिसणारी वैशिष्ट्ये आहेत. रोमन साम्राज्यात ख्रिश्चन धर्माच्या उदयानंतर भारतात स्थलांतरित झालेल्या मूर्तिपूजक कारागिरांचा गांधार कलेवर प्रभाव पडला असावा. मथुरेत रत्नजडित यक्ष आणि यक्षीच्या प्रतिमा आहेत. या प्रतिमा कुस्तीपटूंच्या शरीरयष्टीची आठवण करून देतात.
बौद्ध, जैन आणि हिंदू देवतांच्या प्रतिमा
या काळात बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये बदल दर्शविणाऱ्या सर्वात जुन्या बोधिसत्त्वाच्या प्रतिमा तसेच हिंदू देवतांच्या, विशेषतः कृष्ण-वासुदेव आणि नागदेवतांच्या सुरुवातीच्या प्रतिमा दिसतात. एकट्या मथुरेत आपल्याला सर्वात जुनी जैन शिल्पं सापडतात. काही प्रतिमांमध्ये जैन तपस्वी एकटे उभे असतात. बाजूला यक्ष आणि यक्षी नसतात. अशा प्रकारच्या प्रतिमा या अमरावती शैलीच्या आहेत. ही शैली आंध्र स्कूल ऑफ आर्ट म्हणूनही ओळखली जाते. या प्रकारच्या शैलीत संगमरवरासारख्या दिसणाऱ्या चुनखडीच्या दगडाचा वापर केला जात होता. ही शिल्प सालंकृत आहेत. या कलेचा प्रसार हा श्रीलंकेत झाला. त्यानंतर १२ च्या शतकापर्यंत तिथेच विकसित झाली. गुप्तकालखंडापासून दख्खनच्या प्रदेशात लेणींच्या भिंतीवर बौद्ध, जैन आणि हिंदू देवतांच्या प्रतिमा दिसू लागल्या. उदयगिरी, वेरूळ आणि एलिफंटा (घारापुरी) इत्यादी ठिकाणी आपल्याला बुद्ध, बोधिसत्व, तारा, नाग, शिव, विष्णू, कुबेर आणि अनेक जैन तीर्थंकरांच्या प्रतिमा दिसतात ज्यात यक्ष आणि यक्षी त्यांच्या बाजूला असतात. ऐहोळे, बदामी आणि पट्टडकल येथे दख्खन चालुक्यांच्या काळात (६वे-१२ वे शतक) हे चित्रण अधिक ठळक झाले. याठिकाणी शिव आणि विष्णूंच्या प्रतिमा या बसाल्ट आणि ग्रॅनाइट खडकात तयार केलेल्या आहेत. इसवी सन ८०० नंतर ओडिशा, उत्तराखंड, आंध्र आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या डोंगरांमध्ये मुक्त मंदिरे उदयास आली, या मंदिरांमध्येही शिल्प सापडली आहेत.
अधिक वाचा: देवदत्त पट्टनाईक यांच्यासह कला आणि संस्कृतीचा अभ्यास | भारतातील प्रागैतिहासिक स्थळांचा आढावा !
चोल काळातील कांस्य नटराज
१० व्या शतकात चोल कालखंडात, कांस्य नटराज मूर्ती आढळून येतात. ही शिल्प लॉस्ट वॅक्स पद्धतीचा वापर करवून तयार करण्यात आली होती. अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की यासाठीचे तांबे श्रीलंकेतून आले होते आणि त्यामुळेच चोलांनी श्रीलंकेशी सतत युद्ध केले, पूर्वी श्रीलंकेला थंबापन्नी, तांब्याची भूमी म्हटले जात असे.
मुस्लीम शासकांनी शिल्पांना संरक्षण दिले नाही कारण ते इस्लामी श्रद्धेच्या विरुद्ध होते. पण हिंदू आणि जैन मंदिरांमध्ये दगड आणि धातूची शिल्प वाढली. जेव्हा युरोपियन आले, तेव्हा त्यांनी युरोपियन शैलीची शिल्प आणली (होती). या शिल्पांमध्ये मानवी शरीरातील स्नायूंना अधिक उठाव दिला, ज्यात काही प्रमाणात अलंकरण आढळते. ही शैली भारतीय शैलीपेक्षा खूप वेगळ्या स्वरूपाची होती, ज्यात गुळगुळीत आकृतिबंध, पारदर्शक कापड आणि दागिने दिसत होते. ही शिल्प काळाच्या ओघात टिकून राहिली, परंतु काय टिकून राहू शकले नाही हेही पाहणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ आदिवासी समाजाने मातीच्या मूर्ती तयार केल्या. यासाठी बंगालच्या प्रसिद्ध मातीपासून तयार केलेल्या बांकुरा घोड्याच्या प्रतिमा हे उत्तम उदाहरण ठरू शकते. ते पूजेसाठी वापरले जात होते. आज ज्या प्रमाणे गणेश चतुर्थीसाठी किंवा दुर्गा पूजेसाठी नदीतील मातीच्या प्रतिमा तयार करतात आणि नंतर त्यांचे नदीतच विसर्जन करतात, त्यामुळे त्यांचा मागे कुठलाही मागमूस राहत नाही.
विषयाशी संबंधित प्रश्न
गांधार कलेच्या ठळक वैशिष्ट्यांची उदाहरणांसह चर्चा करा आणि विस्तृत करा.
हडप्पा संस्कृतीतील प्राचीन शिल्प त्या काळातील कलात्मक तंत्रे आणि सांस्कृतिक पद्धतींबद्दल काय सांगतात?
बुद्धाच्या पहिल्या शिल्पाकृतीशी संबंधित वाद काय आहे? कुशाण राजांच्या संरक्षणाचा, विशेषत: कनिष्काचा, सुरुवातीच्या बौद्ध प्रतिमांवर कसा प्रभाव पडला?
कुशाण कालखंडातील विविध कला प्रकारांची भरभराट त्या काळातील समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परिदृश्य प्रतिबिंबित करते. हे त्या काळातील समाज आणि संस्कृतीमध्ये कोणते अंतर्दृष्टी प्रदान करते?