प्रवीण चौगले
प्रस्तुत लेखामध्ये यूपीएससी पूर्व परीक्षा करिता महत्त्वपूर्ण असणाऱ्या पर्यावरण परिस्थितिकी या घटकाविषयी जाणून घेणार आहोत. गेल्या काही वर्षांपासून नागरी सेवा परीक्षेत काही मोठे बदल झाले आहेत. पर्यावरण, पर्यावरणशास्त्र आणि जैवविविधता या विषयांना परीक्षेच्या अभ्यासक्रमात महत्त्वाचे स्थान देण्यात आले, हा एक दृश्यमान बदल दिसून येतो.
पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षांच्या दृष्टिकोनातून पर्यावरण आणि परिस्थितीकी हा एक महत्त्वाचा विषय आहे. या विषयावर सामान्य अध्ययन पेपर १ मध्ये दरवर्षी १५ ते २० प्रश्न विचारले जातात. यूपीएससी पूर्व परीक्षेकरिता या अभ्यास घटकांमध्ये ढोबळमानाने पर्यावरण परिस्थितिकी, जैवविविधता, शाश्वत विकास, वातावरण बदल इत्यादीशी संबंधित मुद्दय़ांचा समावेश होतो. यूपीएससीने या घटकाच्या तयारी करिता कोणत्याही प्रकारच्या विशेष ज्ञानाची आवश्यकता नसल्याचे अभ्यासक्रमामध्ये नमूद केले आहे.
पर्यावरणामध्ये जैविक व मानव प्राणी, वनस्पती यांच्याशी निगडित असलेल्या सर्वच घटकांचा समावेश होतो तर परिस्थितीकीमध्ये जैविक व अजैविक घटकांमधील परस्परसंबंधांचा अभ्यास केला जातो. या अभ्यासघटकाची व्याप्ती अधिक आहे. पर्यावरणाचे सर्व पैलू समजून घेण्यासाठी जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, भूगोल, संसाधन व्यवस्थापन, अर्थशास्त्र, अभियांत्रिकी, सामाजिक शास्त्र व लोकसंख्या यांच्याशी संबंधित विषय समजून घेणे गरजेचे ठरते.
सजीव आणि पर्यावरण यांच्या परस्पर संबंधांचे अध्ययन परिस्थितिकीशी निगडित आहे. प्राणी किंवा वनस्पतीचे नैसर्गिक समूह व त्यांचे घटक ज्या तत्त्वानुसार काम करतात ते सर्वसामान्य तत्व दाखवून देण्याचे परिस्थितीकीचे कार्य आहे. एखाद्या विशिष्ट प्रदेशातील विशिष्ट वनस्पती किंवा प्राण्यांच्या क्रियांचा अर्थ समजण्यासाठी परिस्थितिकीचा उपयोग होऊ शकतो. हवा, पाणी, माती, वन्यजीवन यांच्या संवर्धनासाठी परिस्थितिकीची समज उपयोगी पडते.
जैवविविधता
यामध्ये इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झव्र्हेशन ऑफ नेचर अॅण्ड नॅचरल रिसोर्सेस ( कवउठ), राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण, जैवविविधतेशी संबंधित आंतरसरकारी संस्था, मानवाला जगण्यासाठी जैवविविधता का महत्त्वाची आहे, रेड डेटा बुक आणि जैवविविधता हॉटस्पॉट्सचा अभ्यास करावा.
प्रदूषण
या अभ्यास घटकामध्ये पर्यावरणीय प्रदूषण हा महत्त्वाचा टॉपिक आहे. यामध्ये प्रदूषण, प्रदूषणाची कारणे, उपाय, प्रदूषण रोखण्याकरता वेळोवेळी करण्यात आलेले कायदे, संस्था याबाबत जाणून घ्यावे. तसेच पर्यावरणीय प्रदूषण संबंधीच्या COD,BOD,Bioremediation घ्याव्यात. आम्लवर्षां, हरितगृह वायू (GHG), फोटोकेमिकल स्मॉग, अल्गल ब्लूम आणि ओझोन छिद्र इ. संकल्पना समजून घ्याव्यात.
शाश्वत विकास
जैवतंत्रज्ञान (जैव-खते, जैव-कीटकनाशके), अक्षय ऊर्जा, बायोमास गॅसिफिकेशन इ. संकल्पना अभ्यासाव्यात.
हवामान बदल
हवामान बदलावरील युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन (UNFCCC), क्योटो प्रोटोकॉल, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, हवामान बदल शिखर परिषदा आणि शिखर परिषदेच्या उद्दिष्टांचा अभ्यास करा. युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेजर्टिफिकेशन आणि पृथ्वी शिखर परिषद.
संवर्धन
राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव संरक्षण, बायोस्फीअर रिझर्व, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त पाणथळ जागा आणि भारतातील बायोस्फीअर रिझव्र्ह, पर्यावरणीयदृष्टय़ा संवेदनशील क्षेत्रे, पश्चिम घाट, हिमालय तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कायदे, नियामक संस्था आणि धोरणे, वन हक्क कायदा, पर्यावरण संरक्षण कायदा
या घटकांवर २०२२ च्या मुख्य परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न पुढील प्रमाणे :
प्रश्न. वन्यजीव संरक्षणाबाबत भारतीय कायद्यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
१.वन्यप्राणी ही शासनाची एकमेव मालमत्ता आहे.
२.जेव्हा एखादा वन्य प्राणी संरक्षित घोषित केला जातो, तेव्हा तो प्राणी संरक्षित क्षेत्रात किंवा बाहेर आढळला तरी त्याला समान संरक्षण मिळण्याचा हक्क आहे.
३.संरक्षित वन्य प्राणी मानवी जीवनासाठी धोकादायक बनण्याची भीती त्याला पकडण्यासाठी किंवा मारण्यासाठी पुरेसे कारण आहे.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
a) १ आणि २ b) फक्त २
c) १ आणि ३ d) फक्त ३
प्रश्न. WHO च्या संदर्भात खालील हवेच्या गुणवत्तेविषयी मार्गदर्शक तत्त्वांशी संबंधित विधाने विचारात घ्या.
१. PM२.५ चा २४ तास सरासरी १५ ug/ m³ पेक्षा जास्त नसावा आणि PM२.५ चा वार्षिक सरासरी ५ µg/ m³ पेक्षा जास्त नसावा.
२.एका वर्षांत, ओझोन प्रदूषणाची उच्च पातळी खराब हवामानाच्या काळात होते.
३. PM१० फुफ्फुसातील अडथळा भेदून रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतो.
४.हवेतील ओझोनच्या अतिरेकामुळे दमा होऊ शकतो.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
a) १, ३ आणि ४
b) फक्त १ आणि ४
c) २, ३ आणि ४
d) १ आणि २
या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून एक बाब स्पष्ट होते, ती म्हणजे या घटकाचे समकालीन स्वरूप होय. याकरिता अभ्यासक्रमात समाविष्ट सर्व घटकांचा चालू घडमोडींच्या अनुषंगाने मागोवा घेणे श्रेयस्कर ठरते. पर्यावरण विषयक कार्यरत असणाऱ्या विविध आंतरराष्ट्रीय परिषदा यांच्या विषयीची माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक ठरते. पारंपरिक घटकांचे अध्ययन करणे आवश्यक ठरते.
पर्यावरण परिस्थितिकी या घटकाच्या तयारीकरता ‘पर्यावरण व परिस्थितीकी’ (अतुल कोटलवार, इंद्रजीत यादव) हा संदर्भ ग्रंथ उपयुक्त आहे. यासोबतच पर्यावरण क्षेत्रातील समकालीन घडामोडींकरिता द हिंदू, युनिक मंथन, डाऊन टू अर्थ आदींचे नियमितपणे वाचन करून नोट्स तयार कराव्यात. तसेच केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालय आणि पर्यावरण क्षेत्रात कार्यरत आंतरराष्ट्रीय संस्थांच्या संकेतस्थळे नियमित पाहावीत.