ऋषिकेश बडवे
मागील दोन लेखांमध्ये आपण अर्थशास्त्र विषयाचे पूर्व परीक्षेतील महत्त्व पाहिले. त्याच बरोबर अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी संदर्भ साहित्याबद्दल देखील चर्चा केली. आता आपण अर्थशास्त्रातील महत्त्वाच्या प्रकरणांबद्दल चर्चा करुयात.
मानवाला अर्थशास्त्राची ओळख ही फार जुनी आहे, अगदी कौटिल्यांचे अर्थशास्त्र इ.स.पू. ३०० पासून उपलब्ध आहे, असे असले तरी आधुनिक अर्थशास्त्राचे जनक अॅडम स्मिथ यांना मानले जाते, याचे कारण समजून घेण्यासाठी आपल्याला मध्ययुगीन युरोपातील परिस्थिती समजून घेणे भाग पडते. मध्ययुगीन युरोपात प्रबोधनामुळे आधुनिकतेची सुरुवात झाली. आधुनिकतेमुळे उत्पादन पद्धतीमध्ये देखील आमूलाग्र बदल घडून आले, उत्पादन प्रक्रिया कारखान्यांमध्ये स्थानांतरीत झाली, त्यामुळे कमालीचे सामाजिक आणि आर्थिक बदल घडून येऊ लागले, मजुरांचे जीवनमान खालावले, दु:ख, गरिबी यांचा प्रभाव सर्वत्र दिसू लागला. त्यामुळे आधुनिकतेमुळे आलेल्या या नवीन उत्पादन प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण होऊ लागले. अशातच काही लोक (Luddites) हे यांत्रिकीकरणाचा विरोध करू लागले (Machines are the causes of our miseries, so break the machines – हे त्यांचे ब्रीद वाक्य होते) अशा वातावरणात या नवीन पद्धतीला अधिकृत मान्यता मिळवून देऊन त्याचे फायदे समजवण्याचे काम अॅडम स्मिथ यांनी त्यांच्या ‘An Enquiry in to the nature and causes of Wealth of the Nation’ या ग्रंथातून केले, त्यामुळे त्यांना आधुनिक अर्थशास्त्राचे जनक म्हटले जाते. इथूनच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची सुरवात झालेली आपल्याला दिसून येते. त्यांच्या नंतर या क्षेत्रात डेव्हिड रिकाडरे, जॉन स्तुअर्त मिल इत्यादींनी भरीव योगदान दिले. हा दृष्टिकोन १९२९ च्या जागतिक महामंदी पर्यंत प्रभावी होता. परंतु या महामंदीमुळे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रावर टीका होऊन समग्रलक्षी अर्थशास्त्राचा दृष्टिकोन पुढे आला, आणि तो पुढे आणण्याचे काम जॉन मेनार्ड केन्स यांनी ‘General Theory of Employment, Interest and Money’ या आपल्या ग्रंथातून १९३६ साली केले.
यूपीएससी पूर्व परीक्षेचा विचार करायचा झाल्यास आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्रावर बहुतांश प्रश्न विचारले जातात. परंतु वर उल्लेख केलेला इतिहास लक्षात घेतला तर असे समजून येईल की, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या पायावर समग्रलक्षी अर्थशास्त्र अवलंबून आहे, त्यामुळे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पनांचा अभ्यास करणे गरजेचे ठरते व त्यासाठी NCERT चे इयत्ता १२ चे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे पाठय़पुस्तक उपयोगी ठरू शकते. परंतु ते समजून घेताना त्यातील गणितावर फार लक्ष दिले नाही तरी चालते. समग्रलक्षी अर्थशास्त्राची सुरवात NCERT चे इयत्ता १२ चेच समग्रलक्षी अर्थशास्त्र आणि इयत्ता ११ चे Indian Economic Development या पुस्तकांद्वारे करू शकतो आणि त्यातील गणितावर देखील फार लक्ष देण्याची गरज नसते. परंतु, पूर्व परीक्षेची व्याप्ती लक्षात घेतली तर ही पुस्तके फारच अपुरी आहेत. पूर्व परीक्षा टॅकल करण्यासाठी आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्रातील पुढील प्रकरणे अभ्यासणे गरजेचे आहे.
१. समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना (Some Basic Cincepts of Macro Economics) २. राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप (National Income Accounring), ३. चलनवाढ (Inflation) ४. सार्वजनिक वित्त (Public Finance) ५. भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास (Indian Economic Development) ६. बॅंकिंग (Banking); तसा बँकिंग हा वित्तीय व्यवस्थेचाच भाग आहे परंतु UPSC साठी या विषयाचा विस्तृत अभ्यास करणे गरजेचे आहे ७. वित्तीय व्यवस्था (Financial System) ८. सहकार (Cooperatives) ९. कर प्रणाली (Taxation System); कर प्रणाली हा सार्वजनिक वित्तमध्ये समाविष्ट होतो परंतु थोडासा क्लिष्ट असल्याकारणाने त्याचा वेगळा अभ्यास करणे संयुक्तिक ठरेल. १०. परकीय व्यापार आणि व्यवहार तोल (Foreign Trade and Balance of Payment) ११. दारिद्रय़ व बेरोजगारी इत्यादी. याचबरोबर चालू घडामोडी, सरकारी विविध योजना, अर्थसंकल्प आणि आर्थिक पहाणी आणि अहवाल यांचा देखील अभ्यास करणे गरजेचे ठरते. शेवटी, एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते ती म्हणजे, अर्थशास्त्र हा असा विषय आहे की यातील बहुतांश संकल्पना परस्परसंबंधांवर आधारित असतात अशा विषयाला पूर्व आणि मुख्य परीक्षेचे टॉपिक असे विभागून त्यांचा सुटय़ा व तुटक पद्धतीने अभ्यास करणे चुकीचे राहील, त्याऐवजी या सर्व टॉपिक्सचा एकात्मिक पद्धतीने केलेला अभ्यास फारच परिणामकारक ठरू शकेल.