या लेखात आपण ‘अर्थव्यवस्था’ या विषयातील ‘बँकिंग’ या घटकाविषयी जाणून घेणार आहोत. यूपीएससी पूर्वपरीक्षेत अर्थव्यवस्था या विषयातील जे प्रश्न विचारले जातात त्यात बँकिंग या घटकांवर नियमित प्रश्न विचारले जातात. बँकिंग या घटकात सर्वाधिक प्रश्न हे ‘आरबीआय’वर विचारलेले आहे. बँकिंग संबंधी संकल्पना व त्यासंबंधीचे तथ्य इथे समजून घेणे अपेक्षित आहे. भारतातील विविध बँक, त्यांची स्थापना, उद्देश, मौद्रिक धोरण इत्यादी बाबी यात समाविष्ट आहेत.

२०२४ यूपीएससी पूर्वपरीक्षेत विचारलेला प्रश्न बघा –

● प्र. परदेशी बँकांशी व्यवहार करताना भारतीय रिझर्व्ह बँकेने लादलेल्या नियम/नियमांच्या संदर्भात, खालील विधाने विचारात घ्या:

१. भारतातील पूर्ण मालकीच्या बँकिंग उपकंपन्यांसाठी किमान भांडवलाची आवश्यकता नाही.

२. भारतातील पूर्ण मालकीच्या बँकिंग उपकंपन्यांसाठी, बोर्ड सदस्यांपैकी किमान ५० सदस्य भारतीय नागरिक असले पाहिजेत.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

अ) फक्त १ ब) फक्त २ क) १ आणि २ ड) वरीलपैकी नाही

वरील प्रश्नातील विधान १ अयोग्य आहे कारण भारतातील पूर्ण मालकीच्या बँकिंग उपकंपन्यांसाठी सुरुवातीचे किमान पेड-अप मतदान इक्विटी भांडवल ५ अब्ज असावे लागते. तर विधान २ योग्य आहे कारण भारतात स्थापन झालेल्या परदेशी बँकेच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीचे संचालक मंडळ स्थानिक संस्थेच्या सर्वोत्तम हितासाठी कार्य करते याची खात्री करण्यासाठी, इतर देशांमधील सर्वोत्तम पद्धतींनुसार, ‘आरबीआय’ असा आदेश देऊ शकते की संचालकांपैकी किमान ५० टक्के संचालक हे भारतात राहणारे भारतीय नागरिक असले पाहिजेत.

● प्र. खालील विधाने विचारात घ्या:

विधान १: सिंडिकेटेड कर्ज अनेक कर्जदारांमध्ये कर्जदार डिफॉल्टचा धोका पसरवते.

विधान २: सिंडिकेटेड कर्ज हे निश्चित रक्कम/एकरकमी निधी असू शकते, परंतु क्रेडिट लाइन असू शकत नाही.

वरील विधानांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते बरोबर आहे?

अ) विधान-१ आणि विधान-२ दोन्ही बरोबर आहेत आणि विधान-२ हे विधान-१ चे स्पष्टीकरण आहे.

ब) विधान-१ आणि विधान-२ दोन्ही बरोबर आहेत, परंतु विधान-२ विधान-१ चे स्पष्टीकरण नाही.

क) विधान-१ बरोबर आहे, परंतु विधान-२ चुकीचे आहे.

ड) विधान-१ चुकीचे आहे, परंतु विधान-२ बरोबर आहे.

हा प्रश्न सोडविताना ‘सिंडिकेटेड कर्ज’ म्हणजे नेमके काय? ते माहीत असणे आवश्यक आहे. एखादी संकल्पना समजून घेताना ती संकल्पना सर्वांगाने समजून घेणे अपेक्षित असते.

‘सिंडिकेटेड कर्ज’ – कर्जदाराला दोन किंवा अधिक बँकांकडून सिंडिकेटेड कर्ज दिले जाते, ज्यांना सहभागी म्हणून ओळखले जाते आणि ते एकाच कर्ज कराराद्वारे नियंत्रित केले जाते. हे कर्ज सामान्यत: सिंडिकेट सदस्याच्या वतीने एका बँकेद्वारे, एजन्सी बँकेद्वारे दिले जाते. सिंडिकेटेड कर्जात प्रामुख्याने कर्जदाराच्या डिफॉल्टचा धोका अनेक कर्जदार, बँका किंवा संस्थात्मक गुंतवणूकदारांमध्ये, जसे की पेन्शन फंड आणि हेज फंडमध्ये वितरित करण्याचा उद्देश असतो. त्यामुळे विधान १ योग्य आहे.

कर्जामध्ये निश्चित रक्कम, क्रेडिट लाइन किंवा दोघांचे संयोजन असू शकते. म्हणून, विधान २ बरोबर नाही.

● प्र. डिजिटल रुपयाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:

१. हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने त्यांच्या चलनविषयक धोरणाशी सुसंगतपणे जारी केलेले एक सार्वभौम चलन आहे.

२. ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताळेबंदावर एक दायित्व म्हणून दिसते.

३. त्याच्या रचनेनुसार ते महागाईपासून सुरक्षित आहे.

४. ते व्यावसायिक बँकांच्या पैशांच्या आणि रोख रकमेच्या तुलनेत मुक्तपणे परिवर्तनीय आहे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

अ) फक्त १ आणि २

ब) फक्त १ आणि ३

क) फक्त २ आणि ४

ड) १,२ आणि ४

● प्र. सेंट्रल बँकेच्या डिजिटल चलनांच्या संदर्भात, खालील विधाने विचारात घ्या :

१. अमेरिकन डॉलर किंवा स्विफ्ट प्रणालीचा वापर न करता डिजिटल चलनात पेमेंट करणे शक्य आहे.

२. डिजिटल चलन खर्च करण्यासाठी वेळेची चौकट अशा प्रोग्राम केलेल्या अटीसह वितरित केले जाऊ शकते.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

अ) फक्त १ ब) फक्त २ क) दोन्ही १ आणि २ ड) दोन्हीही १ किंवा २ नाही

२०२४ व २०२३ च्या पूर्वपरीक्षेत ‘ई-रूपी’ (सेंट्रल बँक डिजिटल चलन) यावर प्रश्न विचारलेला आहे.

ई-रुपी हे भारतीय रिझर्व्ह बँकद्वारे सेंट्रल बँक डिजिटल चलन म्हणून जारी केलेल्या भारतीय रुपयाचे डिजिटल रूप आहे. ई-रुपी एक कायदेशीर निविदा असून भौतिक रोख रकमेसारखेच चालते, ज्यामुळे डिजिटल स्वरूपात व्यवहार आणि मूल्य साठवणूक करता येते.

ई-रुपी वैशिष्ट्ये –

१. ही कायदेशीर निविदा आहे.

२. चलनाचे डिजिटल स्वरूप आहे.

३. केंद्रीकृत प्राधिकरण आहे.

४. भौतिक चलनाप्रमाणेच विनिमयाचे माध्यम आहे.

५. यात ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

६. भौतिक रोख रकमेवर अवलंबून राहत नाही.

गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका बघितल्यास त्यात क्रेडिट रेटिंग संस्था व आरबीआय यांचा संबंध, बँक्स बोर्ड ब्युरो व बँकेतील विविध नियुक्ती, बचतगट व त्यासंबंधी कर्ज योजना इ. बाबींवरही प्रश्न विचारले आहे. अर्थव्यवस्था हा एक संकल्पना प्रधान विषय असून त्यातील संकल्पनांवर चांगले काम करा. विषय समजून घ्या. जेणेकरून या घटकात अचूकता साध्य होईल.

sushilbari10 @gmail. com