UPSC Essentials: स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लेखांची मालिका सुरू करत आहोत. यामध्ये नावाजलेले विद्वान विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. इतिहास, राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, कला संस्कृती व वारसा, पर्यावरण, भूगोल, विज्ञान व तंत्रज्ञान असे अनेक विषय आपण समजून घेणार आहोत. या तज्ज्ञांच्या विद्वत्तेचा लाभ घ्या आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हा. या लेखात, पौराणिक कथा आणि संस्कृती या विषयात पारंगत असलेले प्रख्यात लेखक देवदत्त पट्टनायक यांनी भारतीय समृद्ध व्यापाराचा इतिहास मांडला आहे. भारताचे उपखंडातील संस्कृतींशी जमीन आणि समुद्रमार्गे संबंध होते. खुष्कीच्या मार्गाने हिंदुकुश पर्वत ओलांडून भारताचा संबंध पर्शिया (आजचा इराण) आणि मध्य आशियाशी होता. समुद्रमार्गे पर्शिया, अरब आणि लाल समुद्राद्वारे रोमन साम्राज्याशी भारत जोडला गेला होता.
भारताचे पूर्व किनाऱ्यावरून श्रीलंका, थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया, आणि बर्मा यांच्याशी संबंध होते. तसेच पर्वतांमधून जाणाऱ्या मार्गाने भारत तिबेटशी जोडला गेला होता. भारतीयांनी मान्सूनच्या वाऱ्यांचा फायदा घेतला, त्यामुळे जहाजे सहा आठवड्यांत गंतव्यस्थानी पोहोचू शकत होती. हा प्रवास जमिनीवरून केल्यास सहा महिने लागत होते. या मार्गांद्वारे भारताने जगाला अनेक गोष्टी दिल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेसोपोटेमियाबरोबरचा व्यापार हडप्पा काळापर्यंत मागे जातो. इसवीसन पूर्व ३२६ कालखंडात अलेक्झांडरने भारतीय उपखंडाच्या वायव्य भागावर आक्रमण केल्यानंतर भूमार्ग खुले झाले. त्यावेळी घोड्यांच्या बदल्यात हत्ती निर्यात केले जात होते. पुढे कुशाण कालखंडात पर्शिया आणि रोमशी संबंध प्रस्थापित झाले. गुप्त कालखंडानंतर आग्नेय आशियाशी महत्त्वपूर्ण संबंध विकसित झाले. आग्नेय आशियात भारताला सुवर्णभूमी किंवा सोन्याची भूमी म्हणून संबोधले जात असे.

व्यापारी मार्ग (विकिपीडिया)

भारताने निर्यात केलेला माल

भारत निर्यात करत असलेल्या मालात वनस्पतीजन्य उत्पादनं (जसे की कापूस आणि मसाले), प्राणिज उत्पादनं (हस्तिदंत आणि पक्षी), खनिज उत्पादनं (रत्न आणि मौल्यवान धातू), वस्त्र (जसे कपडे आणि stirrup) तसेच बौद्धिक, साहित्यिक, गणितीय आणि वैज्ञानिक विचारांचा समावेश होता. सर्वाधिक निर्यात केलेल्या वस्तूंमध्ये कापूस, मसाले, आणि साखर (ऊसासह) यांचाही समावेश होता. क्रिस्टलाइज साखरेचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि जागतिक व्यापाराशी संबंधित काही मनोरंजक तथ्ये आहेत. उदाहरणार्थ, ‘चिनी. हा शब्द चीनशी संबंधित असून त्यांनी केलेल्या साखरेच्या व्यापारामुळे साखरेचे नाव चिनी पडले असावे, तर ‘मिसरी’ हे नाव त्याच्या इजिप्तकडे जाणाऱ्या मार्गावरून आले असावे. भारतीय कापड जगभरात लोकप्रिय होते. विणकामातील विविध शैली आणि चमकदार रंग तसेच भारतीय वनस्पतीजन्य रसायनांचा वापर करून कापडावर डाय करण्याच्या कलेत निपुण होते. ज्यात निळा रंग (इंडिगो) मोठ्या प्रमाणात वापरला जात असे. आग्नेय आशियातील बहुतेक देश भारतीय कापडाच्या बदल्यात मसाले देत असतं. त्यामुळे भारतीय वस्त्र हे एक प्रकारचे चलन म्हणूनही वापरले जात असे.

अधिक वाचा: ‘एक फुटी कौडी… ते नाणी’; भारतातील नाण्यांचा आकर्षक इतिहास काय सांगतो? । देवदत्त पट्टनाईक यांच्याबरोबर कला आणि संस्कृती

प्राणी, रत्न आणि गणितीय कल्पना

हत्ती, मोर आणि माकडांसारख्या प्राण्यांचाही व्यापार केला जात होता. पर्शियन राजांना भारतीय मोर, कुत्रे, म्हशी आणि हत्ती विशेष आवडत असत. कदाचित कोंबड्यांना भारतात पहिल्यांदा पाळले गेले. तसेच कोंबड्यांचे वशिंड असलेला बैल आणि पाण म्हैस यांना भारतातच प्रथम पाळीव केले असावे. भारत हा नारिंगी रंगाच्या कार्नेलियन दगडाचा स्रोतही होता, या दगडावर हडप्पा काळात नक्षी कोरण्यात आली होती. भारताने गुजरातमधून कार्नेलियन आणि अफगाणिस्तानातून निळ्या रंगाच्या लॅपिस लाझुलीसारखे रंगीत सेमी प्रेशियस स्टोन निर्यात केले. नंतर, अनेक शतकांपर्यंत भारत हा हिऱ्यांचा एकमेव स्रोत होता. दख्खनच्या पठारातील गोवळकोंडा खाणीतून जगातील काही उत्कृष्ट हिरे काढले गेले. याशिवाय, भारतातून स्टील पश्चिम आशियात पाठविले जात होते, जिथे त्याचे प्रसिद्ध दमास्कस स्टीलमध्ये रूपांतर केले जात असे.

भारताने जगाला stirrup-स्टर्पचा आधारही दिला, ज्यामुळे घोडदळाची कार्यक्षमता वाढली, कारण यामुळे घोडे स्वारांना अधिक स्थिरता मिळाली. घोड्याच्या नाळेच्या प्रारंभिक प्रतिमा भारतातील बौद्ध स्थळांवर सापडतात. गणितीय संकल्पना, विशेषतः अंक हे भारतातून जगभर पसरले. शून्याची जागा भरणारा घटक म्हणून वापर आणि दशांश पद्धतीचा प्रसार भारतातून अरबस्तानमार्गे युरोपात झाला. कॅलक्युलस, बीजगणित आणि त्रिकोणमिती यांसारख्या संकल्पनांचेही मूळ भारतात आढळते. भारतातून बहीखाते पद्धती आणि बँकिंग संकल्पनाही पसरली, जसे की गुजरातच्या किनाऱ्यावर आणि जैन व्यापाऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेली हुद्दी पद्धत (promissory notes) जगभरात पसरली.

अधिक वाचा: देवदत्त पट्टनाईक यांच्यासह कला आणि संस्कृतीचा अभ्यास | भारतातील प्रागैतिहासिक स्थळांचा आढावा !

साहित्यिक आणि सांस्कृतिक प्रभाव

भारतीय लिपी, ज्यामध्ये स्वर व्यंजनांभोवती वर्तुळाकार पद्धतीने मांडले जातात ती आग्नेय आशियामध्ये पसरली. इसवी सन ३०० ते १३०० दरम्यान लिहिलेली संस्कृत ही अफगाणिस्तानपासून व्हिएतनामपर्यंतच्या प्रदेशांमध्ये वापरली जाणारी साहित्यिक भाषा होती. अनेक भारतीय संकल्पनांचा प्रसार झाला. बौद्ध धर्म, विशेषतः महायान बौद्ध धर्म, ईशान्य भारतात पसरला, तर वज्रयान बौद्ध धर्म पूर्व भारतात उदयास आला आणि तिबेटमध्ये पसरला. थेरवाद बौद्ध धर्म दक्षिणेकडे पसरला आणि त्याने श्रीलंका गाठले आणि तेथून आग्नेय आशियाई देशांत पसरला. हिंदू धर्म, शंकराच्या हर आणि विष्णूच्या हरि रूपाची उपासना व्हिएतनामपर्यंत पोहोचली. चिनी नोंदींनुसार, इ.स. ३०० पर्यंत चंपा आणि फुनान (आजचा व्हिएतनाम आणि कंबोडिया) येथील लोकांमध्ये हिंदू नर्तक आणि हिंदू लिपी माहीत होती. गणेश, सरस्वती, आणि लक्ष्मी यांसारखे देव चीनपर्यंत पोहोचले आहेत. राजा-मंडल (राजांचे वर्तुळ) ही भारतीय संकल्पना कौटिल्याच्या अर्थशास्त्रात वर्णन केली गेली होती, जी कंबोडियातील आग्नेय आशियाई राजांना प्रिय होती. याशिवाय, मनुस्मृती, एक प्राचीन भारतीय कायदा संहिता, थायलंड आणि जावा येथील राजांमध्ये लोकप्रिय होती. रामायण आणि महाभारत यांसह बुद्धाची कथा भारतातून पसरली आणि इंडोनेशियातील बोरबोदूर आणि प्रम्बानन यांसारख्या ठिकाणी भिंतींवर कोरली गेली. या कथा व्हिएतनाममधील माई-सन मंदिर, कंबोडियातील अंगकोरवट, बर्मामधील बगानचे पॅगोडा शहर आणि थायलंडमधील अयुथाया येथेही सापडतात. हे भारताने जगाला दिलेले सांस्कृतिक देणं होते.

विषयाशी संबंधित प्रश्न

१. भारताचा अरब आणि रोमन यांच्याशी आलेल्या सांस्कृतिक संबंधात सागरी मार्गाने बजावलेल्या भूमिकेचे वर्णन करा.
२. कुशाण आणि गुप्त कालखंडात भारत आणि त्याच्या शेजारील संस्कृतींमध्ये व्यापारामार्फत कोणत्या मालाची देवाण घेवाण होत होती?
३. प्राचीन काळात व्यापाराने भारत आणि इतर संस्कृतींमधील सांस्कृतिक देवाणघेवाणीवर कसा परिणाम केला?
४. कोणत्या भारतीय देवता चीनमध्ये आढळल्या आणि यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाणीबद्दल काय संकेत मिळतात?
५. ‘सुवर्ण भूमी’ हा शब्द कोणत्या संदर्भात वापरला जातो आणि भारताच्या आग्नेय आशियाबरोबरच्या व्यापाराची संबंधांबद्दल तो काय दर्शवतो?

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc from elephants to ramayana what did india give to the world what does indias rich trade history tell us svs