महेश भागवत, सुप्रिया देवस्थळी
दर गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या या सदरात महेश भागवत आणि सुप्रिया देवस्थळी ही लेखकद्वयी व्यक्तिमत्व चाचणी संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. संघ लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्व चाचणीला समोर ठेवूनच हे सदर लिहिलं जाणार असलं तरी इथल्या अनेक मुद्द्यांचा इतर मुलाखतींसाठी पण निश्चितच उपयोग होईल.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेमधून आयएएस / आयपीएस / आयएफएस होणं हे आजही महाराष्ट्रातल्या अनेक तरुण-तरुणीचं स्वप्नं आहे. लोकसेवेची सर्वोच्च संधी देणाऱ्या या परीक्षेत यशवंत होणे हे नुसत्या तरुणांचच नव्हे तर अनेक आई-वडिलांचे देखील स्वप्न असतं. खरंतर महाराष्ट्राने १९८० च्या दशकात इंजिनीअरिंग आणि मेडिकल या क्षेत्रांत आघाडी घेतली होती. अभियांत्रिकी किंवा मेडिकल कॉलेजेसची महाराष्ट्रातली संख्या खूप मोठी आहे. नोकरी किंवा करिअरसाठी इतर अनेक संधी आता उपलब्ध असल्या तरीही आयएएस, आयपीएस किंवा आयएफएस होण्याची महत्वाकांक्षा बाळगणारे तरुण तरुणीही खूप आहेत. या परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारे खासगी क्लासेस पूर्वी दिल्लीपुरते मर्यादित होते. आता महाराष्ट्रातही असे अनेक क्लासेस खास करून पुणे शहरात सुरू झाले आहेत. इंटरनेटवरही युट्यूब/ इंस्टाग्राम/ टेलिग्राम चॅनेल, व्हाट्सएपच्या ग्रुपच्या माध्यमातून परीक्षेच्या सर्वच टप्प्यांबद्दल मार्गदर्शन उपलब्ध आहे. एका दृष्टीने बघायला गेलं तर मार्गदर्शनाचा अतिरेक झालाय असंही वाटू शकतं. मग या सगळ्या महासागरातून कुठचे मोती घ्यायचे असा उमेदवाराचा गोंधळ होणं साहजिक आहे. विशेषत: या परीक्षेत अंतिम म्हणजे व्यक्तिमत्व चाचणीच्या टप्प्यावर उमेदवार जेव्हा पोहोचतो तेव्हा त्याच्या हातात मर्यादित वेळ असतो आणि या टप्प्यावर निवडीची शक्यता खूप जास्त असते म्हणून त्याला कुठलाही धोका पत्करायचा नसतो.
व्यक्तिमत्व चाचणी महत्त्वाची का?
व्यक्तिमत्व चाचणी ( personality test ) ही इतकी का महत्त्वाची ते आपण थोडक्यात समजून घेऊया. ज्या परीक्षेला आपण सर्रास आयएएस, आयपीएस, आयएफएसची परीक्षा म्हणतो ती खरंतर संघ लोकसेवा आयोग (Union Public Service Commission ) यांच्यातर्फे घेतली जाणारी नागरी सेवा परीक्षा (Civil Services Examination ) असते. या परीक्षेच्या माध्यमातून फक्त IAS / IPS/ IFS नाही तर इतर अनेक सेवांसाठी ( Civil Services ) उमेदवारांची निवड होत असते. यात Indian Railway Management Service , Indian Revenue Service – Income Tax , Indian Revenue Service – Customs GST, Indian Audit and Accounts Service अशा २०-२२ प्रकारच्या सर्व्हिसेसचा समावेश असतो. या परीक्षेतून किती उमेदवारांची निवड होते? तर साधारणत: १००० च्या आसपास. ही संख्या दरवर्षी थोडीफार बदलत असते. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात संघ लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर त्या वर्षीच्या पूर्व परीक्षेची जाहिरात उपलब्ध होते त्यात परीक्षेचा अभ्यासक्रम, जागा, किमान अर्हता, उपलब्ध जागा इत्यादी माहिती सविस्तर दिली जाते. आता या परीक्षेचं स्वरूप काय असतं ते पाहूया.
तीन टप्प्यांवरील दिव्य
परीक्षा तीन टप्प्यात होते. पूर्व परीक्षा (objective multiple choice questions), मुख्य परीक्षा (लेखी) आणि व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा. पूर्व परीक्षा साधारणत: मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी होते (२०२५ ची पूर्व परीक्षा २५ मे ला होणार आहे ). पूर्व परीक्षेचा निकाल परीक्षा झाल्यानंतर एखाद्या महिन्यात जाहीर होतो. हा टप्पा पार करणाऱ्या उमेदवारांची मुख्य परीक्षा साधारणत: सप्टेंबर/ ऑक्टोबर महिन्यात होते. ह्या परीक्षेचा निकाल साधारणत: डिसेंबर महिन्यात लागतो. हा टप्पा पार केलेल्या उमेदवारांच्या व्यक्तिमत्व चाचणी जानेवारी पासून ते साधारणत: एप्रिल महिन्यापर्यंत चालते. सर्वात महत्वाचा मुद्दा असा की या तीन टप्प्यांपैकी कुठच्याही टप्प्यावर उमेदवार यशस्वी झाला नाही तर त्याला सगळी परीक्षा पुन्हा द्यावी लागते. यातली पूर्व परीक्षा (preliminary examination) जी असते ती प्रामुख्याने multiple choice questions आणि गाळणी (elimination) स्वरूपाची असते. ह्याचा अर्थ काय? जास्तीत जास्त उमेदवार हा टप्पा पार करू शकत नाहीत. साधारणत: १२ ते १३ लाख उमेदवार पूर्वपरीक्षा देतात आणि त्यातले फक्त १३ ते १४,००० उमेदवार मुख्य ( main ) परीक्षेसाठी पात्र होतात. म्हणजे साधारणत: १ उमेदवार पूर्व परीक्षेचा टप्पा पार करतात. पूर्व परीक्षा ही qualifying स्वरूपाची असते. म्हणजे या परीक्षेचे कट ऑफ मार्क्स असतात. त्या कट ऑफ इतके मार्क्स मिळाले की उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र होतो. पूर्व परीक्षेत मिळालेले मार्क्स अंतिम निवडीसाठी मोजले जात नाहीत. जे १३/१४ हजार उमेदवार मुख्य परीक्षेला बसतात त्यातले साधारणत: अडीच ते तीन हजार उमेदवार व्यक्तिमत्व चाचणी साठी पात्र ठरतात. म्हणजे साधारणत: २०. मुख्य परीक्षा ही १७५० मार्कांची असते आणि यात मिळणारे मार्क्स आणि व्यक्तिमत्व चाचणीत मिळणारे मार्क्स याआधारे अंतिम निकाल लागतो. जे अडीच ते तीन हजार उमेदवार व्यक्तिमत्व चाचणी देतात त्यातले साधारणत: १००० उमेदवार अंतिमत: निवडले जातात. हे सगळे आकडे जे लिहिले आहेत ते थोडेफार मागे पुढे होत असतात. पण परीक्षेची एकूण प्रक्रिया किती कठीण आहे याचा अंदाज यावा यासाठी ही आकडेवारी लिहिली आहे.
सामान्य ज्ञानाचा कस
अडीच ते तीन हजार उमेदवार व्यक्तिमत्व चाचणी देतात आणि त्यातले हजार उमेदवार निवडले जातात. म्हणजे परीक्षेच्या या टप्प्यावर यशाचं प्रमाण सर्वात जास्त आहे. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या दिव्यातून पार पडलेले उमेदवारच व्यक्तिमत्व चाचणीसाठी पात्र होतात. त्यामुळेही या टप्प्यावर निवडीचं प्रमाण जास्त असणं साहजिक आहे. ही व्यक्तिमत्व चाचणी २७५ मार्कांची असते. मुख्य परीक्षेचे १७५० आणि व्यक्तिमत्व चाचणीचे २७५ असा निकाल लागतो. संघ लोकसेवा आयोग या टप्प्याला व्यक्तिमत्व चाचणी (Personality test) म्हणतं, मुलाखत (interview) नाही की जी तुमच्या व्यक्तिमत्वाची चाचणी करणारी परीक्षा आहे सामान्य ज्ञानाची तपासणी करणारी नाही ही महत्त्वाची गोष्ट आहे.
दर आठवड्याला या सदरातल्या मार्गदर्शनाच्या निमित्ताने उमेदवारांना आत्मविश्वासाने व्यक्तिमत्त्व चाचणी परीक्षेस सामोरे जात यशाच्या मार्गावर वाटचाल करता येईल असा आम्हाला विश्वास आहे.
(महेश मुरलीधर भागवत तेलंगणमध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक आहेत)
mmbips@gmail. com
(सुप्रिया देवस्थळी या संयुक्त महालेखा नियंत्रक, ICAS आहेत)
supsdk@gmail. com