वृषाली धोंगडी
मागील लेखातून आपण औद्योगिक आपत्तीविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण जैविक आपत्ती विषयी जाणून घेऊया. जीवाणू आणि विषाणू यासारख्या सूक्ष्मजीवांमुळे मानव, प्राणी आणि वनस्पतींमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग होणारी नैसर्गिक परिस्थिती म्हणजे जैविक आपत्ती होय. जीवाणू, विषाणू, कवके, शैवाल, रोग जनक (Pathogens), संसर्गित मानव इत्यादी कारणांमुळे जैविक आपत्ती उद्भवू शकते. जैविक आपत्ती ही एक नैसर्गिक आपत्ती आहे, ज्यामध्ये रोगजनक सूक्ष्मजीव, विषारी आणि जैव क्रियाशील पदार्थ यांचा समावेश होतो. त्यामुळे दुखापत, आजारपण वेळप्रसंगी मृत्यूही होऊ शकतो. एवढेच नव्हे तर जैविक आपत्तीमुळे उपजीविका आणि सेवा आणि मालमत्तेचे नुकसान, सामाजिक आणि आर्थिक व्यत्यय किंवा पर्यावरणीय नुकसानही होते. जैविक आपत्तींच्या उदाहरणांमध्ये साथीच्या रोगांचा उद्रेक, वनस्पती किंवा प्राण्यांचा संसर्ग, कीटक किंवा इतर प्राण्यांच्या पीडा आणि संसर्ग यांचा समावेश होतो.
जैविक आपत्ती या खालील स्वरूपात असू शकतात :
१) साथीचे रोग (Epidemics) :
साथीचे रोग म्हणजे एकाच वेळी मोठ्या रोगाने, मोठी लोकसंख्या, समुदाय किंवा प्रदेशातील मोठ्या संख्येने व्यक्तींना प्रभावित करणारी रोगाची साथ होय. ही घटना अगदी कमी काळात घडते व खूप काळ चालू शकते. साथीचे रोग पसरण्यास रोग जनके किंवा लोकसंख्या किंवा पर्यावरण किंवा तिन्ही घटकातील बदल कारणीभूत असतात. साथीचे रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कारका (Vectors) द्वारा पसरतात. या कारकांमध्ये सजीव किंवा निर्जीव दोन्ही गोष्टींचा समावेश होतो. सजीवांमध्ये कीटक, माशी, डास यांचा समावेश होतो, तर निर्जीव घटकामध्ये पाणी, अन्न, हवा यांचा समावेश होतो. साथीच्या रोगामध्ये कॉलरा, प्लेग, जपानी एन्सेफलायटीस (JE)/ तीव्र एन्सेफलायटीस सिंड्रोम (AES) यांचा समावेश होतो.
२) महामारी (Pandemics) :
महामारी ही एक अशी स्थिती आहे, ज्यात विशिष्ठ रोग एका मोठ्या प्रदेशात पसरते, म्हणजे एक देश, एक खंड, किंवा अगदी जगभर. महामारीमध्ये रोग नवीन असू शकते किंवा जुनाच रोग पुन्हा नवीनरित्या उद्भवू शकतो. महामारीमध्ये कोविड, सार्स, प्लेग यांचा समावेश होतो. इस. १३४६ ते १३५३ या काळात उत्तर आफ्रिका आणि यूरोपमध्ये बुबॉनिक प्लेगमुळे ७ ते २० कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. ही मानवी इतिहासातील सर्वात मोठी महामारी होती. तर कोविड -१९ मुळे २०१९ पासून आता पर्यंत ६९ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. एखादा रोग महामारी आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार जागतिक आरोग्य संघटनेस असतो.
हेही वाचा – UPSC-MPSC : औद्योगिक आपत्ती म्हणजे काय? त्याची महत्त्वाची कारणे कोणती?
३) जैव-दहशतवाद ( Bio – terrorism) :
वरील दोन्ही प्रकार हे नैसर्गिक स्वरूपाचे होते. परंतु जैव-दहशतवाद हा मानवी निर्मित असतो. यामध्ये घातक जिवाणू किंवा विषाणूचा वापर शत्रू राष्ट्र किंवा प्रदेश यांच्या विरोधात दहशतवादी करतात. हा युद्ध रणनीतीचा अत्यंत क्रूर प्रकार आहे, कारण यात रोगाची तीव्रता व परिणाम माहिती नसतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. यात प्लेग, ऍन्थ्रॅक्स, काजण्या यासारख्या रोगाचे विषाणू हे एका साध्या पद्धतीने शत्रू प्रदेशात पाठवले जातात, जसे टपाल मार्फत किंवा प्राण्यांमार्फत. नंतर संसर्ग होऊन हे रोग मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहचतात आणि त्यांना आजारी करतात. यामुळे लोक मृत्यूमुखीही पडू शकतात.
जैविक आपत्तीवरील उपाय :
१) सामान्य जनतेला शिक्षित केले पाहिजे आणि जैविक आपत्ती संबंधित धोक्यांची जाणीव करून दिली पाहिजे.
२) फक्त शिजवलेले अन्न आणि उकडलेले/क्लोरीन केलेले/फिल्टर केलेले पाणी प्यावे.
३) कीटक आणि उंदीर नियंत्रणाचे उपाय त्वरित सुरू केले पाहिजेत.
४) संशयित आणि पुष्टी झालेल्या प्रकरणांचे क्लिनिकल निदान आवश्यक आहे.
५) लवकर अचूक निदान करणे, ही जैविक युद्धातील जीवितहानी व्यवस्थापित करण्याची गुरुकिल्ली आहे. म्हणून, निश्चित रोग निदानासाठी विशेष प्रयोगशाळा स्थापन केल्या पाहिजेत.
६) विद्यमान रोग निगराणी प्रणाली तसेच वेक्टर नियंत्रण उपायांचा अधिक कठोरपणे पाठपुरावा करावा लागेल. उदा. डासासाठी फवारणी करणे
७) संशयित भागात मोठ्या प्रमाणत लसीकरण कार्यक्रमाची सुरुवात करावी.
८) वैद्यकीय तज्ञांचे ज्ञान आणि कौशल्ये वाढवणे.
९) जैव-दहशतवादाशी संबंधित अनेक कायदे संयुक्त राष्ट्राने केले आहेत. तरीही देशांनी याचा इतिहास समजून धोरण बनवतांना जैविक – सुरक्षा यावर भर दिला पाहिजे.