वृषाली धोंगडी
मागील लेखातून आपण भूस्खलन आणि हिमस्खलन म्हणजे काय? आणि त्याची नेमकी कारणे कोणती? याविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण दुष्काळ जाहीर करण्याचे निकष काय? त्याची कारणे आणि त्यावरील उपाय कोणते? याविषयी जाणून घेऊ. दुष्काळ हा शब्द म्हणजे एखाद्या ठिकाणच्या नेहमीच्या परिस्थितीच्या तुलनेत दीर्घ काळासाठी पाण्याची अनुपस्थिती होय. पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाण्याचे वितरण समान नाही. काही ठिकाणी पाणी जास्त असते; तर काही ठिकाणी कमी.
एखाद्या प्रदेशात सामान्यपणे बऱ्यापैकी पाऊस पडत असेल आणि एखाद्या पावसाळ्यात पाऊस कमी पडला किंवा झालाच नाही, तर त्या प्रदेशातील लोक, प्राणी व वनस्पती यांच्यामध्ये थोडासा कोरडेपणा जाणवू लागेल. अशा परिस्थितीला दुष्काळ म्हणता येईल.
दुष्काळ म्हणजे पाण्याची आणि त्यामुळे अन्नस्रोतांची अनुपलब्धता किंवा तीव्र पाणीटंचाई असलेला अनेक महिन्यांचा किंवा वर्षाचा दीर्घ कालखंड होय. याचाच अर्थ असा होतो की दुष्काळामध्ये पाऊस न पडणे, कमी पडणे, जास्त पडणे, या सर्व बाबींचा समावेश होतो. ही एक गंभीर आपत्ती आहे.
हेही वाचा – UPSC-MPSC : वाळवंटातील टोळ कुठे आढळतात? त्याचा शेतपिकांवर कसा दुष्परिणाम होतो?
दुष्काळाचे प्रकार
दुष्काळाचे साधारण चार मुख्य प्रकार पडतात. १) हवामानशास्त्रीय दुष्काळ, २) जलविज्ञान दुष्काळ, ३) कृषी दुष्काळ व ४) सामाजिक-आर्थिक दुष्काळ. या प्रकारांबाबत सविस्तरपणे जाणून घेऊ.
१) हवामानशास्त्रीय दुष्काळ : हा दुष्काळ पावसाची कमतरता किंवा कोरड्या कालावधीच्या लांबीवर आधारित आहे. याला कारणीभूत गोष्ट म्हणजे भारतातील पावसाचे असमान वाटप होय आणि कमी पावसाचा परिणाम पाण्याची भूजल पातळी कमी होण्यात होतो.
२) जलविज्ञान दुष्काळ : हा दुष्काळ पावसाच्या कमतरतेच्या पाणीपुरवठ्यावर होणाऱ्या परिणामांवर आधारित आहे; जसे की विविध पाणी प्रवाह, जलाशय व तलावांची पातळी आणि भूजल पातळीत घट होणे. असा दुष्काळ हा दीर्घ हवामानातील दुष्काळामुळे उदभवतो. याला ‘जलकाल’सुद्धा म्हणतात.
३) कृषी दुष्काळ : कृषी दुष्काळ म्हणजे पावसाची तूट, जमिनीतील पाण्याची कमतरता, भूगर्भातील पाणी कमी होणे किंवा सिंचनासाठी आवश्यक असलेल्या जलाशयाची पातळी कमी होणे आणि यांसारख्या घटकांमुळे शेतीवर दुष्परिणाम होणे होय. अशा परिस्थितीत पिके नष्ट होतात. त्यालाच ‘अकाल’सुद्धा म्हणतात.
वरील तिन्ही परिस्थिती म्हणजे दुष्काळ, अकाल, जलकाल यांसोबत उदभवल्यास त्याला ‘त्रिकाल’ असे म्हणतात. याव्यतिरिक्त दुष्काळाचा आणखी एक प्रकार पडतो.
४) सामाजिक-आर्थिक दुष्काळ : यामध्ये फळे, भाजीपाला, धान्य व मांस यांसारख्या काही आर्थिक वस्तूंचा पुरवठा आणि मागणी यांवर दुष्काळी परिस्थितीचा (हवामानशास्त्रीय, कृषी किंवा जलविज्ञानविषयक दुष्काळ) परिणामांचा विचार केला जातो. जेव्हा पाणीपुरवठ्यातील हवामानाशी संबंधित तुटीमुळे आर्थिक वस्तूंची मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त होते तेव्हा सामाजिक-आर्थिक दुष्काळ उदभवतो.
भारत आणि महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती
भारतातील एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी ६८% क्षेत्र हे दुष्काळाच्या धोक्यात आहे. त्यामध्ये मुख्यतः राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशमधील कोरडवाहू प्रदेशांचा समावेश होतो. तसेच लडाख या थंड प्रदेशाचाही यात समावेश होतो. महाराष्ट्रातील जवळपास ६१% भाग हा कोरडवाहू प्रकारात मोडतो आणि याच भागात दुष्काळ पडण्याची शक्यता अधिक असते. त्यात पर्जन्यछायेतील काही जिल्हे उदा. पुणे, सांगली, सोलापूर (या जिल्ह्यांमधील काही तालुके) आणि मराठवाडा व विदर्भ यांतील काही भागांचा समावेश होतो.
दुष्काळ जाहीर करण्याचे निकष
देशात एखाद्या क्षेत्रात दुष्काळ जाहीर करण्याचा अंतिम अधिकार राज्य सरकारचा आहे. २०१६ मध्ये भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) दुष्काळ जाहीर करण्याच्या निकषांमध्ये काही बदल केले गेले. दुष्काळग्रस्त क्षेत्र घोषित करण्यासाठीचे निकष चारवरून सहापर्यंत वाढविण्यात आले.
हे निकष पुढीलप्रमाणे :
- १) पावसाची कमतरता
- २) पेरणी झालेल्या क्षेत्राचे प्रमाण
- ३) वनस्पती निर्देशांक सामान्य फरक (normalised difference vegetation Index)
- ४) आर्द्रता पर्याप्तता निर्देशांक (Moisture adequacy index)
- ५) पीक परिस्थिती निर्देशांक
- ६) भूमी सत्यापन (ground verification)
कमीत कमी चार निकष तीव्र असले, तरच दुष्काळाचे वर्गीकरण तीव्र होईल. तसेच फक्त दुष्काळ तीव्र असेल, तरच केंद्राने राज्यांना मदत करणे अपेक्षित आहे.
हेही वाचा – UPSC-MPSC : पर्यावरण नैतिकता म्हणजे काय? त्यातील विविध समस्या कोणत्या?
दुष्काळावरील उपाय
जेथे दुष्काळ पडतो, त्या ठिकाणची उत्पादकता, वाढवणे खूप कठीण असते. तेथे जीवन पूर्ववत होण्यास अनेक वर्षे लागू शकतात. २०१६ मध्ये लातूर महानगरपालिका असलेल्या शहरालासुद्धा आगगाडीने पाणी आणावे लागले. म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजणे गरजेचे आहेत.
१) जलसंधारण : मोठे धरण प्रकल्प बांधून, त्यावर आधारित योग्य सिंचन प्रक्रिया राबवल्यास दुष्काळाला तोंड देता येईल; परंतु हा उपाय फार खर्चीक आहे. आधुनिक काळात विकेंद्रित व क्षेत्रीय जलसंधारण राबवले जाते. हा तुलनेने कमी खर्चाचा व सोपे तंत्रज्ञान असलेला उपाय आहे. पावसाचे पाणी जास्तीत जास्त गावाच्या शिवारात अडवून विकेंद्रित स्वरूपाचे पाणीसाठे निर्माण करणे, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे असे उपाय यामध्ये आहेत. उदा. शिरपूर पॅटर्न.
२) सरकारी प्रयत्न : राज्य सरकारची जलयुक्त शिवार योजना आणि केंद्र सरकारची प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या दुष्काळावर मात करून शेतकरी उत्पन्न वाढवण्यासाठी कार्य करीत आहेत.
३) जनजागृती : लोकांपर्यंत पाण्याचे महत्त्व पोहोचणार नाही तोपर्यंत ही समस्या समूळ नष्ट होणार नाही. अमीर खान यांचे ‘पाणी फाउंडेशन’ आणि मकरंद अनासपुरे व नाना पाटेकर यांचे ‘नाम फाउंडेशन’ या दोन्ही संस्था लोकसहभागातून जलसंधारणाचे कार्य करीत आहेत.