वृषाली धोंगडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखातून आपण जैवविविधता ही संकल्पना नेमकी काय आहे, याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण जैवविविधतेच्या वर्गीकरणाबाबत जाणून घेऊया. कॉन्सर्वेशन इंटरनॅशनल (CI) व युनायटेड नेशन इन्व्हरमेंट प्रोग्राम (UNEP) नुसार भारत हा १७ महाविविधता (Megadiversity) केंद्रांपैकी एक आहे. या सत्रात १७ देशांमध्ये ब्राझील, ऑस्ट्रेलिया, पेरू, अमेरिका, इंडोनेशिया, मलेशिया, काँगो यांसारख्या देशांचा समावेश आहे.

जगाच्या २.४% भू क्षेत्रफळ असणाऱ्या भारतात एकूण सात ते आठ टक्के जैवविविधता आढळते. ग्लोबल बायोडायव्हर्सिटी इंडेक्सनुसार भारत हा जगात आठव्या क्रमांकावर आहे. भारतातील या सर्व जैवविविधतेचे वर्गीकरण प्रमुख १० जैवभौगोलिक विभागात करण्यात आले आहे. १,०३,२५८ पेक्षा जास्त प्राण्यांच्या व ५५,०४८ पेक्षा जास्त वनस्पतींच्या प्रजातीचे या १० जैवभौगोलिक क्षेत्रात दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. फुलांची विविधता लक्षात घेता ५५,०४८ पैकी १२,०९५ प्रजाती या स्थानिक (Endemic) आहेत. स्थानिक प्रजाती म्हणजे विशिष्ट क्षेत्रात आढळणाऱ्या वनस्पती होय.

हेही वाचा – UPSC-MPSC : टुंड्रा आणि अल्पाइन परिसंस्था म्हणजे काय? त्याचे प्रकार कोणते?

भारतातील १० जैव भौगोलिक विभाग :

१) ट्रान्स हिमालयीन विभाग : भारताचा सर्वात उत्तरेकडील भाग या विभागात येतो. या विभागात पर्वतीय प्रदेशाबरोबरच पर्वताभोवताली असणाऱ्या प्रदेशांचा समावेश होतो. या विभागात वनस्पतींचे अनियमित वितरण आहेत. दर्जेदार लोकर उत्पादित करणाऱ्या मेंढ्या, बकऱ्या, हिमचित्ते, माळढोक यांसारखे वन्यजीव येथे आढळतात.

२) हिमालयीन विभाग : येथील जैवविविधतेच्या विपुलतेमुळे या भागाचा समावेश जगातील ३६ जैवविविधता हॉटस्पॉटमध्ये होतो. या भागात हिमालयीन तपकिरी अस्वल, काळे अस्वल, हिमचित्ता, कश्मिरी हंगूल, आयबेक्स, कस्तुरी हरीण, मारखोर, सोनेरी गरुड यांसारखे प्राणी प्रजाती आढळतात; तर मेपल, अल्डर, ब्रम्ह कमळ यांसारख्या वनस्पती प्रजाती आढळतात.

३) वाळवंट प्रदेश : हे परिक्षेत्र राजस्थान या राज्यात आहे. प्रामुख्याने यात थार वाळवंटाचा समावेश होतो. या प्रदेशात उंट, गाढव, चिंकारा, माळढोक, साप व उंदराच्या प्रजाती आढळतात. वनस्पतीचे वितरण कमी असून सर्वत्र काटेरी झुडपे व निवडुंग आढळतात.

४) निम- शुष्क विभाग : हे परिक्षेत्र राजस्थानमध्ये सुरू होऊन पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्येही विस्तारलेले आहे. या भागात प्राणी जीवन अत्यल्प आहे. प्राण्यांमध्ये हरीण, नीलगाय यांसारखे प्राणी आढळतात; तर वनस्पतींमध्ये ऑर्किड, बांबू या प्रजाती आढळतात.

५) पश्चिम घाट : हे परिक्षेत्र भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात आहे. या परिक्षेत्राचा समावेश जैवविविधता हॉटस्पॉटमध्ये होतो. या भागात विविध प्रकारचे माकड, वन्य कुत्रे, मलबार मोठी खार, वाघ, काळा चित्ता, सिस्पारा पाल या प्राणी प्रजाती, तर उष्णकटिबंधीय पानझडी वने आढळतात.

६) दख्खनचे पठार दक्षिण भारताचा मुख्य भूभाग असणाऱ्या या प्रदेशात महाराष्ट्र, ओरिसा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, केरळ या राज्यांचा समावेश होतो. या भागात वाघ, माकडे, अस्वल, निलगिरी ताहर सांबर, चितळ, वन्य म्हैस, उंदीर, हरीण, नीलगाय हे प्राणी आढळतात.

७) गंगेचा मैदानी विभाग : या विभागात मानवी वस्तीचे केंद्रीकरण झालेले आहे. त्यामुळे हरीण, बारासिंगा, विविध माकडे यांसारखे प्राणी राष्ट्रीय उद्यानात सापडतात. गंगा डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय मासा येथे आढळतो. या भागात टीक, पाईन, देवदार, सीडार, पिंपळ, बांबू यांसारखी पानझडी वने आढळतात.

८) ईशान्य भारत विभाग : हे परिक्षेत्र जैवविविधतेच्या मानाने अति महत्त्वाचे असून या भागात अनेक स्थानविशिष्ट प्रजाती आढळतात. एकशिंगी गेंडा, पानमांजर, मलायन सूर्य अस्वल, स्वाम्प हरीण, रेड पांडा, क्लॉडेड चित्ता, गायल, गौर, संगाई, गिबन, लांगुर हे प्राणी आढळतात. ऑर्किड, झिंगिबर, याम, रोडोडेंड्रॉन, बांबू, केन्स यांसारखे वृक्ष आढळतात.

९) किनारपट्टी विभाग : हे परिक्षेत्र सागरी प्राण्यांच्या प्रजननासाठी महत्त्वाचे आहे. या भागात मगर, डगॉन्ग, डॉल्फिन, रॉयल बंगाल टायगर, ऑलिव्ह रिडले कासव आणि समुद्री ओटर्स व हंस, बदल, साँगबर्डसारखे स्थलांतर करणारे पक्षी आढळतात. तसेच सुंद्री वने, खारफुटी वने, मार्शेस, सीग्रास यांसारखे किनारी वृक्ष आढळतात.

१०) किनाऱ्याजवळील बेटे : या भागात अंदमान निकोबार बेटे, लक्षद्वीप बेटे यांचा समावेश होतो. या भागात डॉल्फिन, वेल, स्पॉटेड डियर, डुगोंग, गेको यांसारखे प्राणी आढळतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : जैवतंत्रज्ञान म्हणजे काय? भारतात जैवतंत्रज्ञान मंडळाची स्थापना का करण्यात आली?

या प्राण्यांचे आणि वनस्पतींचे संवर्धन करणेदेखील तेवढेच गरजेचे आहे. त्यासाठी देशात ११० राष्ट्रीय उद्याने व ५७० अभयारण्ये स्थापन करण्यात आली आहेत. २०२३ पर्यंत महाराष्ट्रात सहा राष्ट्रीय उद्याने व ५० अभयारण्ये आहेत. भारतात विशिष्ट प्राण्यांच्या संरक्षणासाठी विशिष्ट क्षेत्र स्थापन केलेली आहेत. त्यात ५५ व्याघ्र प्रकल्प (१९७३), एक चित्ता प्रकल्प (कुनो राष्ट्रीय उद्यान), एका आशियायी सिंहासाठी प्रकल्प, १९७२ (गिर राष्ट्रीय उद्यान) व एकशिंगी गेंड्यांसाठी, १९८७ (मानस अभयारण्य) प्रकल्प आहेत. प्रोजेक्ट हत्ती (१९९२), प्रोजेक्ट क्रोकोडाइल (१९७४), प्रोजेक्ट मस्क डियर, रेड पांडा प्रकल्प (१९९६) हे प्रकल्पसुद्धा या प्राण्यांच्या संवर्धनासाठी सुरू करण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc environment biodiversity classification in india know in details mpup spb
Show comments