वृषाली धोंगडी
आशियाई हत्ती हा भारतातील सर्वांत मोठ्या आकाराचा भूस्थित सस्तनशील प्राणी आहे. असे समजले जाते की, एकेकाळी हा प्राणी टिग्रीस (प. आशिया)पासून पूर्वेकडे पर्शियामधून भारतीय उपखंड व आग्नेय आशिया (श्रीलंका, जावा, सुमात्रा, बोर्निओपासून उत्तर चीन)पर्यंतच्या प्रदेशात आढळत होता. मात्र, आज हा प्राणी केवळ भारतीय उपखंड, आग्नेय आशिया आणि काही आशिया बेटे (श्रीलंका, इंडोनेशिया, मलेशिया) या प्रदेशांपुरताच मर्यादित आहे. भारतीय हत्ती हे त्यांच्या आफ्रिकेतील नातलगांपेक्षा जास्त हुशार आहेत. त्यामुळेच लाकडे उचलण्यासारख्या अनेक कामांसाठी त्यांना प्रशिक्षित करता येते.
हत्तींचे संचार क्षेत्र हे मोठे असते. हत्ती हा सामाजिक प्राणी आहे. तो नेहमी कळपांमध्ये राहतो. एका कळपामध्ये अनेक नातलग असतात. प्रत्येक कळपाचे नेतृत्व ज्येष्ठ व अनुभवी मादीकडे असते. नर हत्तीमध्येच हस्तिदंत असतात आणि त्यांची वास घेण्याची क्षमता अद्वितीय असते. मात्र, त्यांची नजर व ऐकण्याची क्षमता कमजोर असते. हत्ती एका वेळी एकाच पिल्लाला जन्म देऊ शकतो. जर कळपातील एखादा हत्ती मरण पावला, तर तो मृत झालेल्या ठिकाणी हा कळप अधूनमधून भेट देऊन शोक व्यक्त करतो. मृत नातलगाच्या शिल्लक हाडांना स्पर्श करून, त्यांना सोंडेत घेऊन हा शोक व्यक्त केला जातो. त्यास ‘Mourning of Elephants’ अशी संज्ञा आहे.
हेही वाचा – UPSC-MPSC : जागतिक जीवावरण राखीव क्षेत्र दिन का साजरा करण्यात येतो? भारतात अशी किती क्षेत्रे आहेत?
जंगल कटाईमुळे हत्तींचा घटता अधिवास, हस्तिदंतांच्या मागणीमुळे होणारी कत्तल या कारणांमुळे हत्तींची संख्या कमी झाली आहे. IUCN च्या यादीनुसार आशियाई हत्ती संकटग्रस्त प्रजाती आहे आणि वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार अनुसूची १ मध्ये त्याचा समावेश होतो. त्यासाठी त्यांच्या संवर्धनाची गरज निर्माण झाली. भारतामध्ये हत्तींच्या संवर्धनासाठी १९९२ मध्ये ‘प्रोजेक्ट एलिफंट’ सुरू करण्यात आला. तसेच १२ ऑगस्ट हा ‘हत्ती दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
या प्रोजेक्टअंतर्गत उचलली गेलेली पावले आणि आवश्यक सुधारणा खालीलप्रमाणे :
- ही एक केंद्रपुरस्कृत योजना असून, भारतातील १६ प्रमुख राज्यांमध्ये हा प्रोजेक्ट राबविण्यात येत आहे. तसेच काही राज्यांना त्यासाठी वित्तपुरवठाही करण्यात येतो.
- हत्तींच्या लोकसंख्येचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी हत्तींच्या अभयारण्यात पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.
- हत्तींचे संवर्धन करण्यासाठी हत्ती शिकारविरोधी पथके आणि ट्रेकर्स नियुक्त केले जातात.
- आवश्यक भागात मानव आणि प्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी बॅरिकेडिंग आणि कुंपण घालण्यास प्रोत्साहन दिले जाते.
- हत्तींचा सन्मान करण्यासाठी ‘गजयात्रा’ हा एक राष्ट्रीय जागृती कार्यक्रम केला जातो. त्यामध्ये हत्तींच्या कॉरिडॉरच्या संरक्षणाच्या महत्त्वावर भर दिला जातो.
- हत्ती हे मुक्त संचार करणारे असल्यामुळे त्यांच्या फिरण्यासाठी मोठे क्षेत्र लागते. त्यामुळे दोन क्षेत्रे जोडण्यासाठी कॉरिडॉरची निर्मिती करणे आवश्यक आहे.
- ७) क्षेत्रसंवर्धन उपक्रमांच्या यशाचे मूल्यांकन करण्यासाठी २००३ मध्ये ‘मॉनिटरिंग द इलिसिट किलिंग ऑफ एलिफंट्स (MIKE)’ कार्यक्रम स्थापन करण्यात आला आहे. त्यांतर्गत संपूर्ण आफ्रिका आणि आशियातील हत्तींच्या बेकायदा हत्येबद्दलच्या माहितीच्या ट्रेंडचे परीक्षण केले जाते.
भारतातील हत्तींची स्थिती
आशियाई हत्तींपैकी ६० टक्क्यांहून अधिक हत्ती एकट्या भारतात राहतात. २०१७ मध्ये झालेल्या सर्वांत अलीकडील हत्तीगणनेत २९,९६४ हत्तींची संख्या नोंदवण्यात आली होती. त्यात सर्वाधिक हत्ती कर्नाटक राज्यात (६,०४९) असून, त्यापाठोपाठ आसाम व केरळचा क्रमांक लागतो. भारतात सध्या ३३ हत्ती राखीव क्षेत्रे आहेत. कर्नाटकातील दांडेली एलिफंट रिझर्व्ह, नागालँडमधील सिंगफन एलिफंट रिझर्व्ह, तमिळनाडूमधील अगस्तियामलाई एलिफंट रिझर्व्ह आणि तेराई एलिफंट रिझर्व्ह (उत्तर प्रदेश) ही भारतातील हत्तींच्या अभयारण्यात सर्वांत अलीकडील भर आहे. त्यामुळे भारतातील हत्ती अभयारण्यांखालील एकूण प्रदेश १४ राज्यांमध्ये ७६,५०८ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला आहे.
भारतातील हत्ती राखीव क्षेत्र –
१) आंध्र प्रदेश- रायला
२) अरुणाचल प्रदेश- कमेंग, दक्षिण अरुणाचल
३) आसाम- सोनित्पूर, दिहांग-पत्काई, काझीरंगा-कार्बी आंगलाँग, धनसिरी, चिरांग
४) छत्तीसगढ- बादलखोल, लेमरू
५) झारखंड- सिंघभूम
६) कर्नाटक- म्हैसूर, दांडेली
७) केरळ- वायनाड, नीलंबुर, अनामुडी, पेरियार
८) मेघालय- गारो
९) नागालँड- इंटकी, सिंगफण
१०) ओडिशा- मयूरभंज, महानदी, संबलपूर
११) तमिळनाडू- निलगिरी, कोईम्बतूर, अनामलाई, श्रीविल्लीपुत्तूर, अगस्त्यमलाई
१२) उत्तरप्रदेश- उत्तर प्रदेश, तराई
१३) उत्तराखंड- शिवालिक
१४) पश्चिम बंगाल- मयूरझर्ना, ईस्टर्न डोअर्स