सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखातून आपण महासागर आम्लीकरण म्हणजे काय? याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण समुद्राची पातळी वाढणे म्हणजे काय? आणि त्याचा किनारपट्टीवरील समुदायांवर कसा परिणाम होतो? याबाबत जाणून घेऊ. समुद्राची पातळी वाढणे हे प्रामुख्याने जागतिक तापमनवाढीशी (ग्लोबल वॉर्मिंग) संबंधित दोन घटकांमुळे होते. एक म्हणजे बर्फाचे वितळणारे आवरण व हिमनद्यांमधून सोडलेले पाणी आणि दुसरे समुद्राच्या पाण्याचा गरम होताना होणारा विस्तार. १८८० पासून जागतिक सरासरीनुसार समुद्राची पातळी सुमारे आठ-नऊ इंच (२१-२४ सेंटीमीटर) वाढली आहे. पाण्याची ही पातळी वाढण्याची बाब मुख्यतः हिमनद्यांमधून वितळलेले पाणी आणि समुद्राच्या पाण्याचा थर्मल विस्तार यांमुळे घडत आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : ‘महासागर आम्लीकरण’ म्हणजे काय? त्याचा सागरी परिसंस्थेवर कसा परिणाम होतो?

२०२२ मध्ये जागतिक सरासरीनुसार समुद्र पातळी १९९३ च्या पातळीपेक्षा १०१.२ मिलिमीटर (चार इंच) वाढली आहे; जी उपग्रहाच्या रेकॉर्डमधील सर्वोच्च वार्षिक सरासरी वाढ ठरली आहे. २००६-२०१५ पर्यंत महासागरातील पाण्याच्या पातळीची जागतिक सरासरी दरवर्षी ०.१४ इंच (३.६ मिलिमीटर)ने वाढली; जी वाढ विसाव्या शतकातील बहुतांश काळात प्रतिवर्षी ०.०६ इंच (१.४ मिलिमीटर) म्हणजे सरासरी दराच्या २.५ पट होती. येत्या काही दशकांमध्ये हरितगृह वायुउत्सर्जन तुलनेने कमी असेल; पण तरीही २१ व्या शतकाच्या अखेरीस जागतिक सरासरी समुद्र पातळी २० व्या शतकाच्या पातळीपेक्षा किमान एक फूट (०.३ मीटर) वाढण्याची शक्यता असल्याचे म्हटले जाते. काही महासागर खोऱ्यांमध्ये उपग्रह रेकॉर्ड सुरू झाल्यापासून समुद्राची पातळी ६-८ इंच (१५-२० सेंटिमीटर) इतकी वाढली आहे.

या वाढीमध्ये प्रादेशिक फरक दिसून येतो. कारण- वारा आणि सागरी प्रवाहांच्या परिणामातून नैसर्गिक परिवर्तनशीलता घडून येते; जे समुद्राचे खोल थर किती आणि कोठे उष्णता साठवतात यांवर प्रभाव टाकतात. तसेच समुद्राच्या पातळीतील वाढ ही स्थानिक कारणांमुळे जागतिक सरासरीपेक्षा कमी किंवा जास्त असू शकते. युनायटेड स्टेट्समध्ये, मेक्सिकोच्या आखातामध्ये मिसिसिपीच्या मुखातून पश्चिमेकडे समुद्राची पातळी वाढण्याचा दर सर्वांत जास्त आहे. त्यानंतर मध्य अटलांटिक महासागर पातळीत वाढ होत आहे. केवळ अलास्का आणि पॅसिफिक नॉर्थवेस्टमधील काही ठिकाणी समुद्राची पातळी घसरत आहे.

समुद्र पातळी मोजणे

समुद्राची पातळी दोन मुख्य पद्धतींनी मोजली जाते. १) समुद्राची भरती-ओहोटी आणि २) उपग्रह उंचीमापक. जगभरातील टाइड गेज (किनारपट्टीवर स्थित एक यंत्र) स्टेशन्सने विविध मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक सेन्सर्सचा वापर करून शतकाहून अधिक काळ दैनंदिन उच्च व निम्न भरती मोजल्या आहेत. जगभरातील अनेक स्थानकांचा डेटा वापरून, शास्त्रज्ञ जागतिक सरासरी काढू शकतात आणि हंगामी फरकांसाठी ते समायोजित करू शकतात. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीपासून, रडार अल्टिमीटर वापरून समुद्राची पातळी अंतराळातून मोजली जात आहे; जे समुद्राकडे निर्देशित केलेल्या रडार पल्सच्या परतीचा वेग आणि तीव्रता मोजून समुद्राच्या पृष्ठभागाची उंची निर्धारित करतात.

समुद्र पातळी का महत्त्वाची आहे?

१) जगात समुद्राची वाढती पातळी किनारपट्टीच्या वादळांपासून संरक्षण आणि व्यावसायिकदृष्ट्या मौल्यवान मत्स्यपालनासह मासे आणि वन्यजीवांसाठी निवासस्थान प्रदान करणाऱ्या परिसंस्थांवर ताण निर्माण करते.

२) समुद्र पातळी वाढीमुळे उच्च आणि अधिक वारंवार भरती-ओहोटी आणि वादळ-लाट पूर येणे, किनारपट्टीची धूप वाढणे, अधिक व्यापक किनारपट्टीचा पूर येणे, पृष्ठभागाच्या पाण्याची गुणवत्ता आणि भूजलातील बदल, प्राथमिक उत्पादन प्रक्रियेस प्रतिबंध करणे, मत्स्यशेतीवर परिणाम, सांस्कृतिक संसाधनांचे नुकसान, किनारी अधिवासांचे मोठे नुकसान, पर्यटन, करमणूक आणि वाहतूक संबंधित कार्यांचे नुकसान होऊ शकते. या परिणामांना रोखण्याकरीता समुद्र पातळीची वाढ थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : १९८६ साली पारित करण्यात आलेला पर्यावरण संरक्षण कायदा काय आहे? त्याची वैशिष्ट्ये कोणती?

समुद्र पातळी वाढण्याचे कारण काय आहे?

  • ग्लोबल वॉर्मिंगमुळे जागतिक सरासरी समुद्र पातळी दोन प्रकारे वाढत आहे. प्रथम, जगभरातील हिमनद्या व बर्फाचे तुकडे वितळत आहेत आणि समुद्रात पाणी भरत आहेत. दुसरे म्हणजे,जसजसे पाणी गरम होते तसतसे समुद्राचे प्रमाण वाढत आहे.
  • अंटार्क्टिक महाद्वीपावरील बर्फ जगातील ७०% गोड्या पाण्याचा साठा करतो. तापमानवाढीमुळे बर्फाच्या शीटच्या पायथ्याशी वितळण्याचे प्रमाण वाढते आणि समुद्र पातळी वाढते.
  • समुद्र पातळी वाढण्याचा जगातील सर्वांत मोठा संभाव्य स्रोत म्हणजे पूर्व अंटार्क्टिक बर्फाची शीट (EAIS). त्यात जागतिक समुद्राची पातळी ५३.३ मीटर (१७४ फूट १० इंच)ने वाढवण्यासाठी पुरेसा बर्फ आहे आणि हा बर्फ वेगाने वितळत आहे.
  • २० व्या शतकाच्या तुलनेत २१ व्या शतकाच्या सुरुवातीला ग्रीनलँडमधील बर्फाचे सरासरी नुकसान दुपटीने वाढले आहे.
  • पृथ्वीवर अंदाजे दोन लाख हिमनद्या आहेत; ज्या सर्व खंडांमध्ये पसरलेल्या आहेत. त्यांचे वितळणे म्हणजे समुद्र पातळीत वाढ होणे होय.
  • समुद्रातील बर्फाचे नुकसान जागतिक समुद्र पातळी वाढण्यास योगदान देते.
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc environment sea level rise its causes and impact on coastal communities mpup spb
Show comments