वृषाली धोंगडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील काही लेखांतून आपण विविध परिसंस्थांविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण ‘बागेश्री’ कासव आणि एकंदरीतच भारतातील कासव संवर्धनाविषयी जाणून घेऊया. वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने नुकताच एक ऑलिव्ह रिडले कासवावरील विलक्षणीय अभ्यास जगासमोर आणला. यात ‘बागेश्री ‘ नावाच्या एक ऑलिव्ह रिडले कासविणीने सात महिन्यांत तब्बल पाच हजार किमीचा पल्ला गाठला आहे.

‘बागेश्री’ ही कासवीण फेब्रुवारी, २०२३ मध्ये अंडी घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागरच्या किनाऱ्यावर आली होती. हे पश्चिम किनाऱ्यावरील ठिकाण आहे. अशीच काही ठिकाणे पूर्व किनाऱ्यावरदेखील आहेत. उदा. गहिरमाथा, ऋषिकुल्या. त्यावेळी तिला व सोबतच्या सात कासवीणींवर सॅटेलाइट ट्रान्समीटर (ट्यागिंग करण्यात आले) बसवण्यात आला आणि आता त्यांच्या समुद्रातल्या प्रवासाचं ट्रॅकिंग सुरू आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : पर्यावरण नैतिकता म्हणजे काय? त्यातील विविध समस्या कोणत्या?

हा प्रकल्प मॅनग्रोव्ह सेल आणि वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी एकत्रितपणे हाती घेतलेला आहे. हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील कासवांच्या प्रवासावर करण्यात आलेला पहिला प्रकल्प आहे. या प्रकल्प अभ्यासासाठी सर्व कासव या मादा घेतल्या आहेत, कारण मादा कासव फक्त अंडी घालण्यासाठी काही काळ जमिनीवर येतात; नर कासव जास्त काळ समुद्राच्या आतच राहतात. त्यांचं मेटिंग हे सगळं समुद्रातच होतं. ‘बागेश्री ‘ हिने अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ ते अगदी कन्याकुमारीच्या किनाऱ्यालगत प्रवास केला आणि मग २०२३ च्या जुलै महिन्यात ती श्रीलंकेला जाऊन पोहोचली.

श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत हिंदी महासागरात ती बरेच दिवस होती आणि मग तिने बंगालच्या उपसागराचा मार्ग घेतला. बागेश्री आता पुन्हा बंगालच्या उपसागरातून श्रीलंकेकडे वळली आहे. बागेश्री ही कासवीण बंगाल उपसागरामध्ये असताना जवळ असलेल्या पूर्व किनार्‍यावर अंडी घालायला न जाता परत अरबी समुद्राकडे येत आहे. याचे कारण असे की, या कासवांचा जन्म ज्या किनाऱ्यावर झाला आहे तिथेच ते अंडी घालायला येतात, ही गोष्ट या अभ्यासावरून स्पष्ट झाली आहे. याबरोबरच भविष्यातील कासवांसंबधी अभ्यासातही ट्यागिंग (tagging) तंत्रज्ञान किती उपयुक्त ठरू शकते याची पावतीदेखील प्राप्त झाली आहे.

भारतातील कासव संवर्धन :

कासव पाण्यात आणि जमिनीवर राहणारा उभयचर प्राणी आहे. जमिनीवर राहणाऱ्या कासवांना “टॉर्टोइस” आणि पाण्यामध्ये राहणाऱ्या कासवांना “टर्टल” असे संबोधतात. समुद्री कासवाच्या सात प्रजातींपैकी भारतात चार प्रजाती आढळतात. त्या म्हणजे ऑलिव्ह रिडले कासव, ग्रीन टर्टल, हॉक्स आणि साधारण समुद्री कासव होय. कासव सागरातील पेलेजिक झोनमध्ये राहतात. मादा कासव प्रजननासाठी दरवर्षी समुद्रकिनाऱ्यावर येतात आणि घरटी बनवून अंडी घालतात. एक मादा कासव एका वेळी पाच किंवा अधिक अंडी घालतात. अंडी घालून पुन्हा समुद्रात परतात व अंड्यांसाठी परत येत नाही. कासवांचे या दरवर्षीच्या स्थलांतरास “आरीबाडा” (Arribada) असे म्हणतात. अंड्यांमधून पिल्ले बाहेर आल्यावर आश्चर्यकाररित्या काही अनुभव नसताना समुद्राकडे प्रवास सुरू करतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : पर्यावरणासंदर्भात कोणत्या आंतरराष्ट्रीय परिषदा भरवण्यात आल्या? त्यांची उद्दिष्टे कोणती?

गेल्या काही दशकांमध्ये कासवांची होत असलेली शिकार आणि मासेमारी इत्यादी कारणांमुळे कासवांच्या प्रजातींच्या संख्येत निम्म्याने घट झाली आहे. त्यामुळे ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती आता आययुसीएन (IUCN) यादीमध्ये ‘असुरक्षित’ प्रजाती म्हणून ओळखली जाते, त्यामुळे त्यांना संवर्धनाची गरज आहे. यासाठी सरकारने किनाऱ्यावर कासवांसाठी गहिरमाथा, गुहागर, तारकर्ली, वेळास, वायंगणी (सिंधुदुर्ग) येथे सुरक्षित प्रजनन केंद्रे स्थापन केली आहेत. त्यामुळे किनारपट्टीवर घरट्यांच्या स्थानांची होणारी हानी रोखता येईल. स्थानिक लोकांकडून घरट्यांमधून अंडी गोळा करण्यावर आळा बसेल आणि मासेमारी जाळ्यामध्ये अडकून मारणाऱ्या कासवांचे प्रमाण कमी होईल. वेळास हे गाव रत्नागिरी जिल्ह्यात असून येथे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात ‘कासव महोत्सव’देखील आयोजित केला जातो. ऑलिव्ह रिडले कासवांची पिल्ले बाहेर पडण्याचा अपूर्व सोहळा इथे पाहायला मिळतो. जिवंत कासवांच्या बेकायदेशीर व्यापारावर प्रतिबंध लावण्यासाठी ‘मिशन सेव कुर्मा’ चालू करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc environment turtle conservation in india mpup spb
Show comments