मागील लेखातून आपण भारतातील कासव संवर्धनाविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण जागतिक जीवावरण राखीव क्षेत्र दिनाविषयी जाणून घेऊ. ३ नोव्हेंबर हा दिवस जगभरात ‘जागतिक जीवावरण राखीव क्षेत्र दिन’ (Biosphere Reserves In India) म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्तानेच ३ नोव्हेंबर २०२३ रोजी चेन्नई (तमिळनाडू) येथे १० व्या साऊथ अॅण्ड सेंट्रल एशियन बायोस्फिअर रिझर्व्ह नेटवर्क (SACAM) परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद युनेस्को, भारताचे पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय आणि नॅशनल सेंटर फॉर कोस्टल मॅनेजमेंट यांच्याद्वारे आयोजित करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या परिषदेमध्ये जागतिक जीवावरण राखीव क्षेत्र दिनाचे औचित्य साधून जीवावरण राखीव क्षेत्राचे महत्त्व सांगण्यात आले. या दिवसाची थीम ‘रिज टू रीफ (Ridge to Reef) – दक्षिण आणि मध्य आशियातील शाश्वत पर्यावरणीय पद्धतींवर सहयोग सुलभ करणे’, अशी होती. जागतिक जीवावरण राखीव दिन जैवविविधतेचे संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी युनेस्कोद्वारे २०२२ पासून ३ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारतात कासवाचे किती प्रकार आढळतात? सरकारने कासवांच्या संवर्धनासाठी कोणत्या उपाययोजना केल्या?

जीवावरण राखीव क्षेत्र हे १९७१ पासून युनेस्कोच्या ‘मॅन अॅण्ड बायोस्फिअर रिझर्व्ह्ज प्रोग्राम (MAB) अंतर्गत घोषित केले जाते. हे क्षेत्र स्थलीय (Terrestrial), किनारी (Coastal) किंवा सागरी (Marine) परिसंस्थेच्या मोठ्या क्षेत्रावर पसरलेले असते. या क्षेत्रांना संयुक्त राष्ट्र (UN) तसेच आययूसीएन (IUCN) मार्फत मान्यता व संरक्षण प्राप्त असते. जीवावरण राखीव क्षेत्र सांस्कृतिक व पर्यावरणीय जैवविविधतेचे संवर्धन करतात, आर्थिक विकासास चालना देतात आणि पर्यावरणीय शिक्षण, देखरेख व संशोधनामध्ये मोठा हातभार लावतात.

जीवावरण राखीव क्षेत्राचे विभाजन :

जीवावरण राखीव क्षेत्रामध्ये तीन मुख्य झोन असतात. १) कोअर झोन, २) बफर झोन व ३) संक्रमण झोन.

१) कोअर झोन : हे कायद्याने संरक्षित क्षेत्र आहे. येथे नैसर्गिक प्रक्रिया आणि जैवविविधता जतन केली जाते. या क्षेत्रातील मानवी हस्तक्षेप अत्यंत मर्यादित असतो.

२) बफर झोन : हे क्षेत्र कोअर क्षेत्राभोवती आहे. येथे मानवी हालचाली आणि पर्यावरण शिक्षण व संशोधन अशा क्रियांना परवानगी असते.

३) संक्रमण झोन : हे सर्वांत बाह्य क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये कृषी कार्य, मानवी वसाहत आणि इतर मानवी वापरास परवानगी असते.

जीवावरण राखीव क्षेत्राची वैशिष्ट्ये :

  • नुकसान झालेली परिसंस्था संरक्षण करून पुन्हा मूळ स्थितीत आणता येते.
  • प्रजाती, परिसंस्था, आनुवंशिक विविधता यांचे जतन करता येते.
  • हवामानातील बदल रोखण्यासाठी कार्बन सिंक म्हणून कार्य करते.
  • जैविक प्रयोग करण्यासाठी उपयुक्त क्षेत्र म्हणून कार्य करते.
  • परिसंस्थेबाबत शिक्षण आणि प्रशिक्षण देते.
  • इको-टुरिझम करण्यास योग्य व त्यामार्फत स्थानिक लोकांना आर्थिक साह्य देता येते.

जीवावरण राखीव क्षेत्रासमोरील आव्हाने

  • जैवविविधता ऱ्हास
  • जंगलतोड
  • हवामान बदल
  • शेती, खाणकाम व इतर मानवी कामांसाठी राखीव क्षेत्राचा वापर
  • आक्रमक प्रजातींचे अशा क्षेत्रात होणारे स्थलांतर; ज्यामुळे तेथील स्थानिक प्रजातींना धोका

सध्या जगात १३४ देशांमधील ७४८ ठिकाणांचा जीवावरण राखीव क्षेत्रामध्ये समावेश आहे. सर्वाधिक क्षेत्र स्पेनमध्ये (५३) असून, त्याखालोखाल रशिया (४८) व मेक्सिको (४२) यांचा क्रमांक लागतो. भारतामध्ये एकूण १८ क्षेत्रे असून १२ मॅन अॅण्ड बायोस्फिअर रिझर्व्हज प्रोग्राम अंतर्गत नोंदीत आहेत. युरोपमधील मुरा-द्रावा-दानुबे या जगातील पहिल्या पाच देशांमध्ये (ऑस्ट्रिया, स्लोव्हेनिया, क्रोएशिया, हंगेरी व सर्बिया) जीवावरण राखीव क्षेत्र आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : पर्यावरण नैतिकता म्हणजे काय? त्यातील विविध समस्या कोणत्या?

भारतातील जीवावरण राखीव क्षेत्र व ठळक माहिती :

  • थंड वाळवंट (हिमाचल प्रदेश)
  • नंदादेवी (उत्तराखंड)
  • कांचनगंगा (सिक्कीम)
  • मानस, दिब्रू सैखोवा (आसाम)
  • देबांग (अरुणाचल प्रदेश)
  • नोकरेक (मेघालय)
  • सुंदरबन (पश्चिम बंगाल)
  • कच्छ रण (गुजरात)
  • पंचमढी, पन्ना (मध्य प्रदेश)
  • अचानकमर – अमरकंटक (छत्तीसगड, मध्य प्रदेश)
  • सिमलीपाल (ओडिशा)
  • शेशाचलम (आंध्र प्रदेश)
  • निलगिरी (कर्नाटक)
  • अगस्थमाला (तमिळनाडू, केरळ)
  • मुन्नार आखात (तमिळनाडू)
  • ग्रेट निकोबार (अंदमान – निकोबार बेट)

अशी एकूण १८ जीवावरण राखीव क्षेत्रे देशात आहेत. त्यापैकी निलगिरीहे सर्वांत पहिले, कच्छ रण हे क्षेत्रफळानुसार सर्वांत मोठे व दिब्रू सौखोवा हे क्षेत्रफळानुसार सर्वांत छोटे जीवावरण राखीव क्षेत्र आहे. युनेस्कोमार्फत दिला जाणारा मिशेल बॅटिस पुरस्कार २०२३ हा मुन्नार आखात या जीवावरण राखीव क्षेत्रास प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्यात एकही जीवावरण राखीव क्षेत्र नाही.