वृषाली धोंगडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखातून आपण भारतातील व्याघ्रसंवर्धनाविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण अक्षय ऊर्जा स्रोत, तसेच या संदर्भातील अलीकडील घडामोडींबाबत जाणून घेऊ. १ नोव्हेंबर २०२१ ग्लासगो येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेच्या कॉप २६ (Conference of Parties 26) परिषदेच्या मंचावरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताने प्रथमच कार्बन उत्सर्जन २०७० पर्यंत निव्वळ शून्य लक्ष्य (Net Zero Target) निश्चित केल्याची प्रतिज्ञा केली. निव्वळ शून्य उत्सर्जन किंवा कार्बन न्यूट्रल होणे म्हणजे वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण न वाढवणे. चीनने २०६० पर्यंत कार्बन न्यूट्रॅलिटीची योजना जाहीर केली आहे; तर यूएस (US) आणि ईयूने (EU) २०५० पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे. याचा मुख्य उद्देश पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे होय.

निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्यासाठी आपल्याला अक्षय ऊर्जेत (Renewable Energy) मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून, त्याच्या वापरास प्रोत्साहन द्यावे लागेल. अक्षय ऊर्जा स्रोत म्हटल्यावर आपणास सूर्य, वारा यांसारख्या गोष्टी आठवतात. मानवाच्या उत्पत्तीपासूनच मानवाने सूर्याच्या उष्णतेचा उपयोग स्वतःचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी केला आहे. अक्षय ऊर्जेच्या स्रोतापासून ऊर्जेची निर्मिती करण्याचा पुरावा आपणास १८०० च्या शतकात पाहावयास मिळतो. या काळात मानवाने पाण्याच्या गतीचा वापर करून जलविद्युत निर्मिती करण्याचा प्रयत्न चालू केला; परंतु तरीही कोळसा हा ऊर्जेचा मोठा स्रोत होता. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विविध शोधांमुळे अक्षय ऊर्जास्रोतांचा विकास होत गेला आणि या स्रोतांपासून ऊर्जानिर्मिती सुलभ होऊ लागली. आज देशात खालील अक्षय ऊर्जास्रोतांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारतात ‘प्रोजेक्ट टायगर’ उपक्रम कधी सुरू करण्यात आला? त्याचा नेमका उद्देश काय होता?

सौरऊर्जा : सूर्यापासून होणारे विकिरण उष्णता निर्माण करण्यास, रासायनिक अभिक्रिया घडवून आणण्यास किंवा वीज निर्माण करण्यास सक्षम आहेत. पृथ्वीवरील सौरऊर्जेचे एकूण प्रमाण जगाच्या सध्याच्या आणि अपेक्षित ऊर्जेच्या गरजेपेक्षा जास्त आहे. ती योग्य रीतीने वापरल्यास, या अत्यंत विखुरलेल्या स्रोतामध्ये भविष्यातील सर्व ऊर्जा गरजा पूर्ण करण्याची क्षमता आहे. सौरऊर्जा हे कोळसा, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू या मर्यादित जीवाश्म इंधनांच्या अगदी विरोधात आहे. त्यामुळे २१ व्या शतकात सौरऊर्जा हा अक्षय ऊर्जास्रोत म्हणून अधिकाधिक आकर्षक बनण्याची अपेक्षा आहे. कारण- त्याचा न थांबणारा पुरवठा आणि त्याच्यापासून न होणारे प्रदूषण.

भारताने २०२२ पर्यंत १०० GW सौरऊर्जानिर्मितीचे लक्ष्य ठेवले होते. त्याचाच भाग म्हणून राजस्थान येथे भादला सोलर पार्कची निर्मिती करण्यात आली. हे सोलर पार्क भारतातीलच नव्हे, तर आशियातील सगळ्यात मोठे सोलर पार्क आहे. त्यापाठोपाठ सर्वाधिक मोठे सोलर पार्क पावागडा कर्नाटक येथे आहे. सध्या एकूण ऊर्जेच्या १३ ते १४ टक्के ऊर्जा ही सूर्यापासून मिळवली जाते.

पवनऊर्जा : यात पवनचक्क्यांचा (Wind turbines) उपयोग ऊर्जानिर्मितीसाठी केला जातो, तसेच वाऱ्याचा वेग, पवनचक्क्यांच्या पात्यांची लांबी, पवनचक्कीचे स्थान यांसारख्या गोष्टींवर विशेष लक्ष दिले जाते. तमिळनाडूमधील मुप्पणदल पवनऊर्जा प्रकल्प हा भारतातील सगळ्यात मोठा प्रकल्प आहे. सध्या एकूण ऊर्जेच्या १० टक्के ऊर्जा ही वाऱ्यापासून निर्माण केली जाते.

जलविद्युत : यात वाहत्या पाण्याच्या ऊर्जेचा वापर करून, त्याद्वारे टर्बाईन फिरवले जाते आणि ऊर्जानिर्मिती केली जाते. तेहरी, कोयना व श्रीसैलम हे भारतातील काही मोठे जलविद्युत प्रकल्प आहेत. भारतातील ऊर्जानिर्मितीच्या जवळपास २० ते २२ टक्के ऊर्जा ही जलविद्युत प्रकारची आहे.

अणुविद्युत : परमाणू प्रतिक्रियांचा वापर करून उष्णता निर्माण केली जाते; ज्याचा वापर बहुतेक वेळा स्टीम टर्बाईनमध्ये अणुऊर्जा प्रकल्पात वीजनिर्मितीसाठी केला जातो. विभक्त विखंडन (fission), विभक्त क्षय (decay) व विभक्त संमीलन (fusion) प्रतिक्रियांमधून अणुऊर्जा शक्ती मिळवली जाऊ शकते. सध्या अणुऊर्जेपासून मिळणारी बरीचशी वीज युरेनियम व प्लुटोनियमच्या विभक्त विखंडनाने तयार होते. तमिळनाडूमधील कुडनकुलम हा भारतातील सगळ्यात मोठा अणुविद्युत प्रकल्प आहे. याव्यतिरिक्त कैगा, काक्रापार, रावतभाटा, नरोरा व तारापूर या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प आहेत. एकूण ऊर्जानिर्मितीच्या तीन टक्के ऊर्जानिर्मिती ही अणुविद्युत प्रकल्पांपासून मिळते. अणुऊर्जा प्रकल्पाच्या स्थापनेसाठी लागणारा पैसा आणि अणुऊर्जा प्रकल्पापासून निर्माण झालेल्या अणुकचऱ्याची विल्हेवाट लावणे हे या प्रकल्पांचे तोटे आहेत.

हेही वाचा – UPSC-MPSC : शाश्वत विकास म्हणजे काय? त्याची उद्दिष्टे आणि त्यासाठी उपाययोजना कोणत्या?

भारतात याव्यतिरिक्त भूऔष्णिक ऊर्जा, लाटांपासून तयार होणारी ऊर्जा, बायोगॅस, बायोमास यांसारख्या अक्षय ऊर्जास्रोतांचा वापर केला जातो. अशा प्रकारे अक्षय ऊर्जास्रोतांचा वापर करून आपणास विद्युतनिर्मिती करता येईल. त्यामुळे कोळसा, नैसर्गिक वायू, जळाऊ लाकडे यांच्या वापराला आळा बसेल आणि पर्यावरण प्रदूषण कमी होऊन, त्याचे संवर्धन होईल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc environment what are sources and projects in india for generation of renewable energy mpup spb
First published on: 10-10-2023 at 19:33 IST