वृषाली धोंगडी
मागील लेखातून आपण वाळवंटीय परिसंस्थेविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण टुंड्रा व अल्पाईन परिसंस्थेविषयी जाणून घेऊ. टुंड्रा व अल्पाइन परिसंस्था या भूस्थित परिसंस्थेचा एक प्रकार आहेत. टुंड्रा हा शब्द फिनिश शब्द Tunturi पासून तयार झाला आहे; ज्याचा अर्थ झाडे नसलेला प्रदेश होय. टुंड्रा आणि त्यानजीकच्या वनांमधील सीमारेषेला ‘वृक्षरेषा किंवा तरुरेषा’ म्हणतात. या परिसंस्थेचे अल्पकालीन उन्हाळा व दीर्घकाळ हिवाळा किंवा कमी तापमान व नगण्य पाऊस ही मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
पृथ्वीवरील उच्च अक्षवृत्त व जास्त उंची असलेल्या प्रदेशात ही परिसंस्था आढळते. या परिसंस्थेत पाणी या घटकापेक्षा तापमान हा घटक अधिक प्रभावशाली असतो. त्यामुळे वनस्पतींची वाढ खुंटलेली असते. यामध्ये विशिष्ट प्रकारच्या वनस्पती आणि हवामान यांचे प्राबल्य असते. त्यामुळे या परिसंस्थेचा उल्लेख ‘टुंड्रा जीवसंहती’ असाही केला जातो. भूपृष्ठाचा दहावा हिस्सा ‘टुंड्रा प्रदेशाने’ व्यापलेला आहे.
टुंड्रा परिसंस्थेचे सामान्यपणे तीन प्रकार आहेत :
१) आर्क्टिक टुंड्रा
२) अल्पाइन टुंड्रा
३) अंटार्क्टिक टुंड्रा
१) आर्क्टिक टुंड्रा
अ) प्रदेश : आर्क्टिक टुंड्रा प्रदेशात आर्क्टिक महासागर (जो उत्तर ध्रुवापर्यंत पसरलेला आहे), कॅनडाचा काही भाग, ग्रीनलँड (डेन्मार्कचा एक प्रदेश), रशियाचा काही भाग, युनायटेड स्टेट्समधील अलास्का, आइसलँड, नॉर्वे, स्वीडन व फिनलंड यांचा समावेश आहे. अंटार्क्टिक टुंड्रा प्रदेशात पृथ्वीचे दक्षिण टोक म्हणजे पूर्ण अंटार्क्टिक खंड समाविष्ट आहे. अल्पाइन टुंड्रा प्रदेश जगभरातील पर्वतांवर उंचावर स्थित आहे; जेथे झाडे वाढू शकत नाहीत.
ब) प्रदेशातील वनस्पती व प्राणी : आर्क्टिक प्रदेश त्याच्या थंड, वाळवंटासारख्या परिस्थितीसाठी ओळखला जातो. हिवाळ्यात सरासरी तापमान -३४° सें. पण उन्हाळ्याचे सरासरी तापमान ३° सें. ते १२° सें. असते; जे या बायोमला जीवन टिकवून ठेवण्यास सक्षम करते. त्यामुळे येथे वनस्पतीवाढीचा हंगाम ५० ते ६० दिवसांचा असतो. आर्क्टिकच्या वेगवेगळ्या प्रदेशांत पाऊस वेगवेगळा असू शकतो. वितळलेल्या बर्फासह वार्षिक पर्जन्यमान १५ ते २५ सेंमी. आहे. माती हळूहळू तयार होते. पर्माफ्रॉस्ट नावाच्या कायमस्वरूपी गोठलेल्या अवस्थेतील मातीचा एक थर अस्तित्वात आहे; ज्यामध्ये बहुतेक रेती आणि बारीक खडे असतात. बर्फ वितळल्यामुळे झाडांना ओलावा मिळतो.
आर्क्टिक टुंड्रा प्रदेशातील वनस्पतींमध्ये कोणत्याही खोल मूळ प्रणाली नाहीत. तथापि, अजूनही अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत; ज्या थंड हवामानाचा प्रतिकार करण्यास सक्षम आहेत. आर्क्टिक आणि सबार्क्टिकमध्ये सुमारे १७०० प्रकारच्या वनस्पती आहेत आणि त्यामध्ये छोटी झुडुपे, रेनडियर हरिता (मॉस), गावात, यकृतका (लिव्हर वॉर्ट्स), दगडफूल (लायकेन) व ४०० प्रकारची फुले आढळतात. शाकाहारी प्राण्यांमध्ये लेमिंग, आर्क्टिक ससे, खार, कॅरिबू; तर मांसभक्षी प्राण्यांमध्ये कोल्हे, लांडगे व पांढरी अस्वले, रेनडियर, कस्तुरी बैल आढळतात. तसेच रेवन, स्नो बर्ड, फाल्कन्स, लून, हिम घुबड यांसारखे स्थलांतर करणारे पक्षी आढळतात.
२) अल्पाइन टुंड्रा
अल्पाइन टुंड्रा प्रदेशात वृक्षवाढीचा हंगाम अंदाजे १८० दिवसांचा असतो. दिवसा तापमान १०° सें.पर्यंत असते; तर रात्री ते गोठण बिंदूच्या खाली असते. येथील जमीन आर्क्टिक टुंड्रापेक्षा जास्त पाण्याचा निचरा करणारी असल्यामुळे येथे गवत, छोटी पाने असलेली झुडपे, हिथ, छोटी झाडे आढळतात. तर, प्राण्यांमध्ये पिकास, मार्मोट्स, पहाडी शेळ्या, मेंढ्या, एल्क, आयबेक्स, मारखोर, याक, हिम चित्ता आणि स्प्रिंगटेल्स, बीटल, टोळ, फुलपाखरे हे कीटक आढळतात. मत्स्यवर्गीय व उभयचर प्राण्यांचा येथे अभाव असतो.
३) अंटार्क्टिक टुंड्रा
अंटार्क्टिक खंडावरील बहुतेक भूमी हिमाच्छादित असते. मात्र, अंटार्क्टिकाच्या उत्तरेकडील खडकाळ प्रदेशात काही वनस्पती वाढलेल्या दिसतात. या प्रदेशात ३००-४०० जातींची दगडफुले, १०० जातींची हरिता, २५ जातींची यकृतका (लिव्हर वॉर्ट्स) आणि ७०० जातींची जलीय शैवाले वाढलेली आढळतात. तसेच येथे अंटार्क्टिक हेअर ग्रास आणि अंटार्क्टिक पर्लवोर्ट या सपुष्प वनस्पती वाढतात. इतर खंडांपासून अंटार्क्टिका खंड अलग असल्यामुळे या खंडावर सस्तन प्राणी कमी आढळतात. त्यांपैकी सील हे समुद्रकिनारी आढळतात. मांजरे आणि ससे अंटार्क्टिकालगतच्या बेटांवर सोडल्यामुळे तेथे आढळतात. नेमॅटोसेरस डायनेमम आणि नेमॅटोसेरस सल्कॅटम या ऑर्किडच्या जाती, रॉयल पेंग्विन व अँटिपोडियन अल्बाट्रॉस हे मूळचे येथील आहेत.
जागतिक हवामानबदलामुळे येथील प्रदेशात तापमान वाढत आहे. तापमान वाढल्यामुळे येथील बर्फ वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे येथील जीवनसंहितेला धोका निर्माण झाला आहे. येथील प्राण्यांनी कमी तापमानात जिवंत राहण्यासाठी विशेष शारीरिक वैशिष्ट्ये आत्मसात केली आहेत आणि वातावरणाशी स्वतःला जुळवून घेतले आहे. परंतु, तापमान वाढल्यास ही गोष्ट त्यांच्या ऱ्हासास कारणीभूत ठरेल.