वृषाली धोंगडी
मागील लेखातून आपण शाश्वत विकास आणि वसुंधरा परिषदेविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण जैवविविधता ही संकल्पना आणि तिच्या महत्त्वाविषयी जाणून घेऊ. जैवविविधता किंवा ज्याला आपण बायोडायव्हर्सिटीसुद्धा म्हणतो; हा शब्द वॉल्टर जी. रोजन यांनी पहिल्यांदा वापरला. हा शब्द पृथ्वीवरील सूक्ष्म जीवापासून ते क्लिष्ट वनस्पती आणि प्राणी जीवनाच्या विविधतेचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. एका प्रदेशातील किंवा परिसंस्थेमधील सर्व प्रजातींचा संदर्भ देण्यासाठी हे अधिक विशेषतः वापरले जाऊ शकते. जैवविविधता म्हणजे वनस्पती, जीवाणू, प्राणी आणि मानवांसह प्रत्येक सजीव वस्तूचा संदर्भ. या पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण आणि जतन करणारे एक अग्रणी म्हणून डॉ. इ. ओ. विल्सन यांना जैवविविधतेचा जनक म्हणतात. तर भारतात माधव गाडगीळ यांना जैवविविधतेचे अग्रणी समजले जाते.
हेही वाचा – UPSC-MPSC : शाश्वत विकासासंदर्भात कोणत्या आंतरराष्ट्रीय परिषदा भरवण्यात आल्या? त्यांची उद्दिष्टे कोणती?
जैवविविधतेचा अभ्यास हा तीन पातळ्यांवर केला जातो. जनुकीय विविधता, जीव प्रजातीय विविधता व परिसंस्था विविधता. प्रत्येक सजीवामधे विविध जनुकीय संचय (Gene pool) असतो. या जनुकीय संचातील विविधतेमुळे प्रत्येक प्राणी, वनस्पती हे एकमेकांपासून वेगळे आहेत. वेगवेगळे सजीव हे वेगवेगळ्या जीवावरण परिस्थितीत राहतात.
भूमीवर म्हणजेच उष्ण कटिबंधात, समशीतोष्ण कटिबंधात, दलदलीच्या प्रदेशात, वाळवंटी प्रदेशात, ध्रुवावर राहणारे व जलीय म्हणजेच समुद्र, नदी, ओढे, महासागर या ठिकाणी राहणारे असे हे सर्व सजीव एकमेकांपासून वेगळे आहेत. शास्त्रज्ञांनी असा अंदाज लावला आहे की, वनस्पती आणि प्राण्यांच्या सुमारे ८.७ दशलक्ष प्रजाती अस्तित्वात आहेत. तथापि, आतापर्यंत केवळ १.२ दशलक्ष प्रजातीच ओळखल्या गेल्या आहेत आणि त्यांचे वर्णन केले गेले आहे. त्यापैकी बहुतेक कीटक आहेत. याचा अर्थ असा होतो की, इतर लाखो जीव एका संपूर्ण गूढमय परिस्थितीत राहतात.
जीव प्रजातींची विविधता व स्थलविशिष्ट प्रजातींची संख्या या आधारावर जगात १७ महाविविधता (megadiversity) दर्जा प्राप्त मिळालेली केंद्रे आहेत. हा दर्जा कॉन्झर्वेशन इंटरनॅशनल (CI) व UNEP यांच्यामार्फत दिला जातो. या १७ केंद्रांमध्ये भारताबरोबर ऑस्ट्रेलिया, चीन, मलेशिया, पेरू, ब्राझील, इंडोनेशिया, इक्विडोर, अमेरिका या देशांचा समावेश आहे. परंतु, मानवाच्या पर्यावरणातील वाढत्या हस्तक्षेपामुळे आज जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे जैवविविधता हॉट स्पॉट्स निर्माण करण्यात आले आहेत. १९८८ मध्ये नॉर्मल मायर्स या संशोधकांने ही संकल्पना मांडली. त्या आधारावर कॉन्झर्वेशन इंटरनॅशनल या संघटनेने वनांतील स्थान, विशिष्ट प्रजातींची संख्या व अधिवास ऱ्हास होण्याची पातळी या आधारावर ३६ जैवविविधता हॉट स्पॉट्स ठरवले गेले आहेत. भारताच्या सीमेचा समावेश असणारे सुंदा लँड, इंडो-बर्मा, हिमालय व पश्चिम घाट, असे चार जैवविविधता हॉट स्पॉट्स आहेत.
हेही वाचा – UPSC-MPSC : वसुंधरा परिषदेत कोणते महत्त्वाचे करार करण्यात आले? त्यांची उद्दिष्टे कोणती?
पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे, हे आपण वर पाहिले; परंतु याचे वितरण मात्र एकसमान नाही. पृथ्वीवर विषुववृत्तीय प्रदेशात जैवविविधता अधिक प्रमाणात आहे; पण आपण जसजसे विषुववृत्तापासून दूर जाऊ तसतशी जैवविविधता कमी होत जाते. आफ्रिकेचा मध्य भाग, ॲमेझॉनचे खोरे, भारत, इंडोनेशिया या भागांत जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आढळते. याच प्रदेशात ग्रेट बॅरियर रीफ, ऑस्ट्रेलियादेखील आहे; जिथे सागरी जैवविविधता मोठ्या प्रमाणात आढळते. त्याचप्रमाणे समुद्रसपाटीवर जैवविविधता सर्वाधिक आढळते आणि आपण जसजसे समुद्रसपाटीपासून वर जाऊ किंवा समुद्रसपाटीपासून खाली खोल समुद्रात गेल्यास जैवविविधता कमी होत जाते.
बेटावरील जैवविविधता ही नेहमीच मुख्य खंडीय भूभागापेक्षा कमी असते. दोन लगतच्या जीवसमुदायांमधील संक्रमणात्मक प्रदेशात जैवविविधता अधिक असते. या प्रदेशाला ‘इकोटोन्स’ असे म्हणतात. दलदलीय प्रदेश, खारफुटी वने व खाडीचा प्रदेश ही काही ‘इकोटोन्स’ची उदाहरणे आहेत.
ग्लोबल बायोडायव्हर्सिटी इंडेक्सनुसार भारत जगात आठव्या स्थानी आहे. या क्रमवारीत ब्राझील हा पहिल्या क्रमांकावर असून, त्यापाठोपाठ इंडोनेशिया व कोलंबिया या देशांचा क्रमांक लागतो. भारतात अंदाजे पक्ष्यांच्या १२१२ प्रजाती, उभयचर प्राण्यांच्या ४४६ प्रजाती, माशांच्या २६०१ प्रजाती, सस्तन प्राण्यांच्या ४४० प्रजाती आणि संवहनी (vascular) वनस्पती प्रजाती ४५ हजारपेक्षा जास्त आहेत. या वनस्पती आणि प्राण्यांपासून मानवाला अन्न, निवारा, औषध, ऊर्जा मिळते. म्हणजेच संपूर्ण पृथ्वीवरील जीवन व मानवाचे जीवन प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या या जैवविविधतेवर अवलंबून आहे. त्यामुळे त्याचे संवर्धन करणे हे नैतिक आणि मानवी हितसंबंध दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे.