सागर भस्मे
मागील लेखातून आपण महासागर आम्लीकरण म्हणजे काय? याविषयीची माहिती घेतली. या लेखातून आपण वाळवंटातील टोळ म्हणजेच शिस्टोसेर्का ग्रेगेरिया याविषयी जाणून घेऊ. शिस्टोसेर्का ग्रेगेरिया (वाळवंटातील टोळ) ही टोळांची एक प्रजाती आहे. वाळवंटातील टोळांच्या समस्यांमुळे आफ्रिका, मध्य पूर्व व आशियातील कृषी उत्पादनाला अनेक शतकांपासून धोका निर्माण झाला आहे.
वाळवंटातील टोळ (Schistocerca gregaria) जगातील सर्वांत विनाशकारी स्थलांतरित कीटक आहे. ते अन्न पिके आणि चारा यांचे नुकसान करतात. फक्त एक चौरस किलोमीटर परिसरातील त्यांची थव्यामधील संख्या ८० दशलक्ष असू शकते आणि ते एका दिवसात ३५ हजार लोकांइतके अन्न खाऊ शकतात इतकी त्यांची क्षमता असते. त्यांच्या मोठ्या झुंडीमुळे अन्नसुरक्षा आणि ग्रामीण जीवनमानाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
हेही वाचा – UPSC-MPSC : समुद्राची पातळी वाढणे म्हणजे काय? त्याचा किनारपट्टीवरील समुदायांवर कसा परिणाम होतो?
वाळवंटातील टोळ त्याच्या शरीराच्या स्वरूपात नियतकालिक बदल दर्शवितो आणि पर्यावरणीय परिस्थितीच्या प्रतिसादात अनेक पिढ्यांमध्ये ते एकाकी, लहान पंख असलेल्या, बिगर-स्थलांतरित स्वरूपापासून ते एकाग्र, लांब पंख असलेल्या व स्थलांतरित अवस्थेत बदलू शकतात. ते नवीन भागात लांब अंतरापर्यंत प्रवास करू शकतात. काही वर्षांमध्ये नवीन क्षेत्रांवर आक्रमण करू शकतात; जिथे ते पिकांसह सर्व वनस्पती खाऊ शकतात आणि इतर वेळी ते कमी संख्येने लक्ष न देता जगू शकतात.
वाळवंटातील टोळांच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी आणि पिकांचा विनाश करणाऱ्या या कीटकांचा सामना करण्यासाठी, तसेच देशांना मदत करण्यासाठी FAO कडे दीर्घकालीन कौशल्य आहे. वाळवंटातील टोळ त्यांच्या शरीराच्या वजनाच्या अंदाजे समतुल्य (२ ग्रॅम म्हणजे ०.०७ औंस) दररोज हिरव्या वनस्पती खातात. ते पॉलीफॅगस आहेत आणि पाने, कोंब, फुले, फळे, बिया, देठ व झाडाची साल खातात. मोती बाजरी, मका, ज्वारी, बार्ली, तांदूळ, कुरणातील गवत, ऊस, कापूस, फळझाडे, खजूर, केळीची झाडे, भाजीपाला व तण यांसह जवळपास सर्व पिके आणि बिगरपीक वनस्पती त्यांच्याकडून खाल्ल्या जातात.
वाळवंटातील टोळ कोठे आढळतात?
वाळवंटातील टोळ सामान्यत: आफ्रिकेतील अर्धशुष्क आणि रखरखीत वाळवंट, जवळच्या पूर्व आणि दक्षिण-पश्चिम आशियामध्ये मर्यादित असतात; ज्यात दरवर्षी २०० मिमीपेक्षा कमी पाऊस पडतो अशा ठिकाणी आढळतात. वाळवंटातील टोळ ही टोळांची सर्वांत महत्त्वाची प्रजाती मानली जाते. कारण- ते मोठ्या अंतरावर स्थलांतरित होण्याच्या आणि त्यांची संख्या वेगाने वाढवण्याच्या क्षमतेमुळे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत.
हेही वाचा – UPSC-MPSC : ‘महासागर आम्लीकरण’ म्हणजे काय? त्याचा सागरी परिसंस्थेवर कसा परिणाम होतो?
टोळहल्ल्याचे दुष्परिणाम
१) अन्नसुरक्षेवरील दुष्परिणाम : जर या टोळांची पैदास खरीप पिकाच्या बरोबरीने होत असेल, तर त्याचा तांदूळ, मका व ज्वारीवर वाईट परिणाम होऊ शकतो. टोळांच्या हल्ल्यामुळे अन्नसुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा अन्न आणि कृषी संघटनेने दिला आहे.
२) शेतकर्यांवरील दुष्परिणाम : याचा अर्थ असा की, टोळ केवळ मौल्यवान उभी पिकेच खाऊन टाकत नाहीत; तर ते शेतकर्यांचे आणि कृषी पुरवठा साखळीशी निगडित लोकांचे जीवनमानही नष्ट करू शकतात.
३) शहरी भागांवरील दुष्परिणाम : नुकत्याच झालेल्या रब्बी पिकांच्या कापणीमुळे शेतात पिके नाहीत. त्यामुळे वाळवंटातील टोळ शहरी भागात वळत आहेत. शहरातील झाडांना टोळ लक्ष करू शकतात. टोळांच्या शहरातील आक्रमणामुळे जास्त नुकसान होत नसले तरी त्यांच्या येण्यामुळे दैनंदिन जीवनात व्यत्यय येऊ शकतो.