वृषाली धोंगडी
नैसर्गिक प्रक्रिया, तसेच मानवी कृती यांमुळे सजीवांना अपायकारक ठरणाऱ्या आणि ठरू शकतील अशा काही घटना आहेत. त्यामध्ये जैविक, रासायनिक, यांत्रिक, पर्यावरणीय अथवा प्राकृतिक कारकांपैकी कोणत्याही कारकामुळे मानव, इतर सजीव अथवा पर्यावरण यास अपायकारक व हानिकारक ठरेल, अशी स्थिती निर्माण होऊ शकते; त्या स्थितीला पर्यावरणीय अवनती /आपत्ती, असे म्हणतात.
काही नैसर्गिक प्रक्रिया आणि मानवी कृती पर्यावरणाची अवनती होण्यास कारणीभूत ठरतात. नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर आणि निरंतर वापर हे पर्यावरण अवनतीचे प्रमुख कारण आहे. मनुष्य आपल्या दैनंदिन वापरातील वस्तूंच्या निर्मितीसाठी नैसर्गिक संसाधनांचा कच्चा माल म्हणून वापर करतो. वस्तूंच्या वाढत्या निर्मितीमध्ये नैसर्गिक संसाधनांचा अधिकाधिक ऱ्हास होत असतो. तसेच संसाधनांच्या अतिवापरांमुळे अपशिष्ट निर्माण होते. अपशिष्टे अतिसंचित झाल्यामुळे सजीवांचे स्वास्थ्य बिघडते आणि सामाजिक, आर्थिक, तसेच पारिस्थितिकीय समस्या निर्माण होतात.
हेही वाचा – UPSC-MPSC : पर्यावरण : गवताळ प्रदेश परिसंस्था
पर्यावरण व्यवस्थापन व उद्दिष्टे
पर्यावरणाच्या अवनतीमुळे सर्व सजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पर्यावरण तज्ज्ञ, अभ्यासक, शासक, प्रशासक, सामाजिक, तसेच राजकीय कार्यकर्ते या समस्यांवर विचारविनिमय करीत आहेत. त्यातूनच पर्यावरण व्यवस्थापन ही संकल्पना पुढे आली आहे. पर्यावरण व्यवस्थापन ही विकास व नियोजनाच्या संदर्भातील संकल्पना आहे. यात समाजाचा सर्वांगीण विकास करणे, तसेच नैसर्गिक संसाधनांचा समतोल वापर करून सामाजिक व आर्थिक विषमता दूर करणे, ही उद्दिष्टे अभिप्रेत आहेत. त्याचबरोबर मानवाच्या अविचारी कृतींवर नियंत्रण, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण व पर्यावरणीय समस्यांच्या निवारणासाठी निर्धारित केलेली तत्त्वे यांचा पर्यावरण व्यवस्थापनात समावेश होतो. मानवाच्या सामाजिक व आर्थिक विकासाबरोबर पर्यावरणाची गुणवत्ता राखण्याचा प्रयत्न यातून केला जातो. पर्यावरण व्यवस्थापन ही मानव आणि निसर्ग यांच्यात समन्वय साधणारी प्रक्रिया आहे.
हेही वाचा – UPSC-MPSC : पर्यावरण : पर्यावरणीय उत्तराधिकार
पर्यावरण व्यवस्थापनाची उद्दिष्टे
- पर्यावरणाच्या नियोजनाची रूपरेषा तयार करणे.
- पर्यावरणाच्या विविध घटकांना प्रदूषणमुक्त ठेवणे.
- पर्यावरणातील निरनिराळ्या घटकांचे संशोधन करणे.
- मानवाला प्रदूषणाच्या परिणामांपासून वाचविणे.
- अवक्षय होत असलेल्या सजीवांना संरक्षण देणे.
- पर्यावरणाचा दर्जा राखला जावा म्हणून-विशिष्ट नियमावली वा तत्त्वे ठरविणे. प्रदूषण नियंत्रणाद्वारे पर्यावरणाच्या गुणवत्तेचे रक्षण करणे.
- व्यवस्थापनासाठी नियोजित केलेल्या उपायांच्या परिणामांची तपासणी करणे.
- पर्यावरण व्यवस्थापनासाठी साहित्यसंग्रह करणे.
- व्यवस्थापनासाठी उपायांचे समीक्षण करणे आणि त्यात सुधारणा करणे.
- पर्यावरण शिक्षण देण्याची व्यवस्था करणे आणि समाजात जाणीव व जागृती निर्माण करणे.
- संसाधनांचा बहुउद्देशीय वापर करून, पारिस्थितिकीय संतुलन राखण्याचा प्रयत्न करणे.
- जैवविविधतेचे परिरक्षण करणे.
- स्वच्छ तंत्रज्ञान उत्पादन संकल्पना स्वीकारणे.
- पर्यावरण संधारणासाठी नियम व कायदे करून त्यांची अंमलबजावणी करणे.