वृषाली धोंगडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखातून आपण प्लास्टिक प्रदूषणाविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण सागरी परिसंस्थेविषयी जाणून घेऊया. परिसंस्थेचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. भूतलीय परिसंस्था आणि जलीय परिसंस्था. पृथ्वीच्या एकूण एक तृतीयांश भागात पाणी आहे. पृथ्वीवरील पाण्याचा विचार करता आपणास जलीय परिसंस्थेची विशालता लक्षात येते. जलीय संस्थेचे पुन्हा दोन प्रकार पडतात. एक खाऱ्या पाण्यातील आणि दुसरी गोड्या पाण्यातील परिसंस्था.

पृथ्वीवरील या पाण्यापैकी ९७.५ टक्के पाणी हे महासागर आणि समुद्रामध्ये आहे जे की खारे आहे व २.५ टक्के पाणी नदी, नाले, ओढे यांच्यामधे आहे जे गोड आहे. खाऱ्या पाण्यातील परिसंस्थेलाच सागरी परिसंस्था असे म्हणतात. सागरी परिसंस्थांमध्ये विविध परिसंस्था समाविष्ट आहेत, जसे की समुद्र, महासागर, दलदल, प्रवाळ खडक, उथळ किनारपट्टी पाणी, पश्चजल, किनाऱ्यावरील खाऱ्या पाण्याचे तलाव, खडकाळ किनारे आणि किनारपट्टीचे क्षेत्र.

हेही वाचा – UPSC-MPSC : प्लास्टिक प्रदूषणासंदर्भात भारत सरकारचे धोरण काय?

आज मानव विविध ग्रहे व ताऱ्यांपर्यंत पोहोचला आहे आणि त्यांचा अभ्यास करत आहे. सागर तळातील मानवाला माहीत असलेला पॉइंट म्हणजे प्रशांत महासागरातील मरियाना गर्ता ज्याची समुद्र सपाटीपासूनची खोली ११ किलोमीटर एवढी आहे. म्हणजेच मानवासाठी अनाकलनीय व गूढ असलेली गोष्ट म्हणजे सागर तळ होय. सागरी किनाऱ्यापासून खोल अंधाऱ्या सागरी तळापर्यंतच्या सागरी परिसंस्थेचे खालील घटक पडतात.

  • Neuston
  • Planktons (प्लवक)
  • Nektons (तरणक जीव)
  • Benthos (तलस्थ जीव)

विविध स्तरावरील जीवांचे आणि पोषण द्रवांचे वर्गीकरण हे पाण्याचा प्रवाह, पाण्यातील ऑक्सिजन आणि कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण, वातावरणातील उष्ण व थंड प्रवाह यावर अवलंबून असते.

न्यूस्टन हे जीव सागराच्या पाण्याच्या थरावर राहतात. या जीवांमध्ये कोळी, फ्लाइंग फिश, बीटल, सरगासो सी, तरंगणारे बार्नेकल्स, गोगलगाय, न्युडिब्रॅंच आणि निडारियन्स यांचा समावेश होतो.

प्लवक हा पाण्यात तरंगणारा सूक्ष्मजीव, सागरी परिसंस्थेच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. प्लवकाच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश व पोषक द्रव्यांची गरज असते. त्यामुळे मुख्यत्वे सूर्यप्रकाशित तसेच कमी उष्ण भागात ते जोमाने वाढतात.

प्लवकाचे दोन प्रकार आहेत : १) प्राणिप्लवक व २) वनस्पतिप्लवक. वनस्पतिप्लवक हे सर्वाधिक महत्त्वाचे प्लवक आहेत. ते प्रकाशसंश्लेषणाद्वारे स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात. त्यांना ‘सागरी कुरण’ म्हटले जाते. वनस्पतिप्लवक हा सागरी परिसंस्थेतील ‘उत्पादक’ किंवा ‘स्वयंपोशी’ घटक आहे. हे सूर्यप्रकाशित पट्ट्यात (किनारी भागात १६ मी., तर भर समुद्रात सुमारे १५० मी. खोलीपर्यंत) आढळतात. वनस्पतिप्लवक हे प्राणिप्लवक व इतर काही प्राण्यांचे अन्न असते. त्यांना प्राथमिक भक्षक म्हणतात.

नेकटॉनमध्ये सक्रियपणे पाण्यात फिरणारे प्राणी समाविष्ट आहेत. उदाहरणांमध्ये मासे, व्हेल, कासव, शार्क यांसारख्या पृष्ठवंशी प्राण्यांचा समावेश होतो आणि अपृष्ठवंशी प्राण्यांमध्ये स्क्विडचा समावेश होतो. ब्लू व्हेल, ग्रे व्हेल, स्पर्म व्हेल, ऑर्कास, डॉल्फिन यांसारखे सस्तन प्राणीसुद्धा नेकटॉनमध्ये येतात. नेकटॉन पाण्याच्या प्रवाहापेक्षा वेगाने पोहू शकतात. प्राणिप्लवक व लहान जलचर प्राणी हे या प्राण्यांचे भक्ष्य असते. म्हणून त्यांना द्वितीय आणि तृतीय भक्षक असे म्हणतात. शार्क मासा हा सागरी अन्नसाखळीतील सर्वांत वरच्या पातळीवरील तृतीय भक्षक आहे.

सामान्यत: किनाऱ्यापासून दूर असलेल्या समुद्रतळावर तलस्थ जीव (बेंथोन) राहतात. उदा. तळाला चिकटून राहणारे स्पंज, प्रवाळ, तळावर सरपटत व रांगत जाणारे खेकड्यासारखे जड कवचधारी प्राणी, बार्नेकलसारखे बीळ करून राहणारे प्राणी इत्यादी. वरील सर्व स्थरांवरील मृत शरीरे तसेच प्राण्यांनी उत्सर्जित केलेली द्रव्ये यांचे सर्व खोलींवर सूक्ष्म जीवांमार्फत विघटन होऊन पोषक द्रव्ये निर्माण होतात. ही व तळावरील इतर पोषक द्रव्ये अभिसरणाने वर आणली जातात आणि ती वनस्पतिप्लवकांना मिळतात. अशा प्रकारे श्रेणीबद्ध पद्धतीने सागरी परिसंस्थेतील अन्नसाखळी चालू असते.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारत सरकारने ‘प्रोजेक्ट चित्ता’ उपक्रम का सुरू केला? त्याचे नेमके फायदे कोणते?

आर्थिक, सामाजिक, वातावरण, पर्यावरण आणि जैविकदृष्ट्या सागरी परिसंस्था महत्त्वाच्या आहेत. पर्यावरण संतुलनासाठी त्यांचे योगदान फार मोठे आहे. सागरी वनस्पतींच्या माध्यमातून महासागराकडून कार्बन डाय ऑक्साइड वायू शोषला जातो व ऑक्सिजन वातावरणात सोडला जातो. सागरी परिसंस्था वैश्विक हवामान संतुलित राखतात. परंतु, गेल्या काही दशकांत वाढत्या तापमानामुळे समुद्राचे तापमानसुद्धा वाढले आहे. त्यामुळे सागरी परिसंस्थेचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला आहे. विशेषतः प्रवाळ क्षेत्र. वातावरणात कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण वाढल्यामुळे हिमाच्छादित प्रदेश वितळू लागले आहेत. त्यामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढून लवणतेची पातळी घटते. त्याचा परिणाम सागरी जीवांवर होतो.

मानव हा समुद्रातून खोलीवरून नैसर्गिक वायू व कच्चे तेल काढतो. कधी कधी तेल गळती होते. त्याचा सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम पडतो. वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मासेमारी होत आहे. यात मोठ्या माश्यांबरोबर लहान मासेदेखील पकडले जात आहेत. याचा त्यांच्या प्रजनन प्रक्रियेवर परिणाम पडून संख्या घटत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर यासाठी वेगवेगळे प्रयत्न चालू आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ मरीन काँनसर्वेशन, मिशन ओशन यांसारख्या अनेक संस्था कार्यरत आहेत. सागरी संवर्धनासाठी मरीन हॉटस्पॉट तयार करण्याबरोबरच विशिष्ट प्राण्यांसाठी विविध संवर्धन कार्यक्रम चालू आहेत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc environment what is marine ecosystem and its main components mpup spb
Show comments