वृषाली धोंगडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वर्षी ‘प्रोजेक्ट चित्ता’अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच १७ सप्टेंबर २०२२ साली तीन नर आणि पाच मादी चित्ते मध्य प्रदेश येथील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले. हे चित्ते नामिबिया या देशातून भारतात आणले गेले होते. त्यामुळे देशात चित्त्यांचे पुनरागमन झाले. पुढे आणखीन १२ चित्ते दक्षिण आफ्रिका या देशातून भारतात आले. त्यासाठी भारताने या दोन्ही देशांबरोबर करार केला होता.

‘प्रोजेक्ट चिता’ उपक्रम काय आहे?

प्रोजेक्ट चित्ता हा जगातील पहिला आंतरखंडीय मोठ्या वन्य मांसाहारी प्राण्यांसंबंधीचा स्थित्यंतरण उपक्रम म्हणून ओळखला जातो; ज्याचा उद्देश भारतामध्ये १९५२ साली नामशेष झालेली चित्ता प्रजाती पुन्हा भारतात आणणे आणि भारतीय परिसंस्थेत आशियाई चित्त्यांची संख्या वाढवणे हा आहे. हा उपक्रम २०२२ साली चालू झाला असला तरी त्यासाठी प्रयत्न आणि तयारी खूप अगोदरपासून सुरू झाली होती.

हेही वाचा – UPSC-MPSC : ‘रामसर करार’ का करण्यात आला? या कराराचा मुख्य उद्देश कोणता?

चित्ता या प्राण्याविषयी

चित्ता हा बिग कॅट परिवारातील एक प्राणी आहे. बिग कॅट परिवारातील बाकी सदस्यांपेक्षा तो वजनाने कमी असून, त्याच्या वेगासाठी तो सर्वत्र प्रसिद्ध आहे. चित्ता ही एक हलकी बांधा असलेली, ठिपके असलेली मांजर आहे. लहान गोलाकार डोके, एक लहान जबडा, काळ्या चेहऱ्यावरील रेषा, खोल छाती, लांब पातळ पाय व एक लांब शेपटी, ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. त्याचा सडपातळ, कुत्र्यासारखा (Canine) आकार वेगासाठी अत्यंत अनुकूल आहे.

चित्ताची लांबी ही साधारणपणे १ ते १.५ मीटर असते. चित्ता हा बिग कॅट परिवारातील असा एकमेव प्राणी आहे, की जो डरकाळी फोडू शकत नाही; तर तो मांजरीप्रमाणे आवाज काढतो. या कारणांमुळे चित्त्यांची मोठ्या प्रमाणात शिकार झाली. तसेच ब्रिटिशांच्या ‘चित्त्यांच्या हत्येवरील इनाम’ धोरणामुळे चित्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. १९४७ मध्ये शेवटच्या ठरलेल्या चित्त्याचा मृत्यू कोरिया (koriya) संस्थानाचे ( सध्याचे छत्तीसगढ) राजे, महाराजा रामानुज प्रताप सिंग देव यांच्या हातून झाला. शेवटच्या चित्त्याच्या मृत्यूने एकेकाळी भरभराट म्हणता येईल अशी मोठ्या प्रमाणात असणारी चित्यांची संख्या शून्यावर आली. त्यावेळी ही प्रजाती अधिकृतपणे नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले. आजच्या घडीला पृथ्वीवर आशियाई चित्ता व आफ्रिकन चित्ता या दोनच प्रजाती अस्तित्वात आहेत. आययूसीएन (IUCN)च्या लाल यादीनुसार आशियाई चित्ता हा अतिशय संकटग्रस्त श्रेणीमध्ये (Critically Endangered species); तर आफ्रिकन चित्ता हा असुरक्षित श्रेणी (Vulnerable species) मध्ये येतो.

‘प्रोजेक्ट चित्ता’अंतर्गत सर्वप्रथम इराणवरून भारतात चित्ते येणार होते. परंतु, आशियाई सिंहाला कूनो राष्ट्रीय उद्यानात हलवण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे या गोष्टीला एक दशकाचा काळ लोटला आणि मग हा निर्णय मागे पडला. अखेर २०२२ मध्ये नामिबिया व दक्षिण आफ्रिकेवरून चित्ते भारतात आणण्यात आले.

भारतात आणलेल्या चित्त्यांसाठी कुनो राष्ट्रीय उद्यानच का निवडले गेले?

आफ्रिकन चित्त्यांना आवश्यक असणाऱ्या जल, वायू, तापमान व अर्धशुष्क प्रदेश या बाबी कुनो राष्ट्रीय उद्यानात आहेत. तसेच चित्त्यांचे नैसर्गिक भक्ष्य असणारे चितळ, सांबर, नीलगाय, जंगली डुक्कर, ससे या प्राण्यांची संख्या कूनो राष्ट्रीय उद्यानात मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील डॉ. मुरतकर व त्यांच्या टीमने चित्त्यांसाठी आवश्यक असणाऱ्या कुरणांची निर्मिती कुनो राष्ट्रीय उद्यानात केली होती. हे सर्व चित्ते नेहमीच निगराणीखाली राहतात आणि त्यासाठी मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला गेला आहे. त्याचबरोबर त्याच्या स्वास्थ्यासाठी विशेष डॉक्टरांचा चमूदेखील कार्यरत आहे.

हा प्रकल्प सुरू झाल्याच्या काही काळानंतर नामिबियावरून आणलेल्या ज्वाला (सियाया) या चित्ता मादीने चार पिल्लांना जन्म दिला. त्यामुळे ७० वर्षांनंतर देशात चित्त्यांचा जन्म झाला. परंतु, लू वाऱ्यांच्या प्रभावाने तापमान वाढल्यामुळे, तसेच मानेत घातलेल्या कॉलरच्या इन्फेक्शनमुळे काही चित्त्यांचा मृत्यूही झाला आहे. तरीही भारत सरकार व डॉक्टरांचा चमू या प्रकल्पाबाबत आशावादी आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : मृदासंवर्धन म्हणजे नेमके काय? त्यासाठी भारतात कोणत्या उपाययोजना केल्या जातात?

प्रोजेक्ट चित्ता प्रकल्पाचे फायदे

या प्रकल्पाचा फायदा देशातील लुप्त झालेल्या चित्त्यांची संख्या पुन्हा वाढवण्यासाठी होणार आहे. त्यामुळे भारत हा बिग कॅट परिवारातील पाच सदस्य असणारा एकमेव देश बनेल. चित्ता भारतात परत आणल्यामुळे इको टुरिझमला वाव मिळेल आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या रोजगार उपलब्ध होऊन, स्थानिक समुदायांच्या जीवनाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल. चित्ता हा अन्नसाखळीतील सर्वोच्च शिकारी आहे. त्याच्यामुळे अन्नसाखळीचे संतुलन राखता येईल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc environment what is project cheetah initiative and its benefits mpup spb
First published on: 20-10-2023 at 17:28 IST