वृषाली धोंगडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखातून आपण हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीविषयीची माहिती घेतली. या लेखातून आपण शाश्वत विकास व त्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करू या. आपण मनुष्याच्या विकासासाठी निसर्गाचा अशा प्रकारे वापर केला पाहिजे की, पर्यावरणाला हानी पोहोचू नये आणि निसर्ग व विकासामध्ये संतुलन राखले जाऊ शकेल. जो विकास पिढी दर पिढीच्या मूलभूत गरजा धोक्यात न आणता पूर्ण करतो, त्याला ‘शाश्वत विकास’, असे म्हणतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल म्हणजे नेमके काय? त्याचे परिणाम कोणते?

१९८३ मध्ये नॉर्वे येथे झालेल्या ब्रुटलांड आयोगाने सादर केलेल्या ‘Our Common Future’ अहवालात शाश्वत विकास ही संकल्पना मांडून, तिची व्याख्या करण्यात आली होती. त्यानंतर खऱ्या अर्थाने १९९२ मधे रिओ दी जानेरो, ब्राझीलच्या वसुंधरा परिषदेत शाश्वत विकासाला चालना मिळाली. त्यालाच ‘अजेंडा-२१‘ म्हणतात. शाश्वत विकास साध्य करण्यासाठी १७ शाश्वत विकास उद्दिष्टे (एसडीजी) २०१५ च्या पॅरिस येथे झालेल्या COP-२१ मध्ये ठरविण्यात आली असून, २०१५ पासून २०३० पर्यंत ही उद्दिष्टे लागू करण्याचा सर्वच देशांचा प्रयत्न आहे.

वर उल्लेखित १७ उद्दिष्टे सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय परिमाणांचे एकत्रीकरण करून, भारतासाठी सर्वसमावेशक विकासात्मक कार्यसूची समाविष्ट करतात. ती १७ उद्दिष्टे खालीलप्रमाणे :

१) दारिद्रय निर्मूलन : सर्वत्र, सर्व स्वरूपातील दारिद्र्य / गरिबी नष्ट करणे.

२) भूक निर्मूलन : अन्नाची सुरक्षितता व सुधारित पौष्टिकता साध्य करणे आणि शाश्वत शेतीची जाहिरात करणे.

३) चांगले आरोग्य : निरोगी आयुष्याची खात्री करून घेणे आणि सर्व वयोगटांमधील लोकांना स्वास्थ्य राखण्यास मदत करणे.

४) दर्जेदार शिक्षण : सर्वांसाठी सर्वसमावेशित व योग्य शिक्षणाची खात्री करून घेणे आणि सर्वांना आयुष्यभर शिक्षणाच्या सुसंधी मिळवून देण्यासाठी मदत करणे.

५) लैंगिक समानता : लैंगिक समानता साध्य करणे आणि सर्व महिला व मुलींना अधिकार देणे.

६) शुद्ध पाणी आणि आरोग्यदायी स्वच्छता : सर्वांसाठी पाणी आणि आरोग्यदायी स्वच्छता उपलब्ध असल्याची खात्री करून घेणे आणि त्याची व्यवस्था बघणे.

७) नूतनीकरण करण्याजोगी आणि स्वस्त ऊर्जा : सर्वांना स्वस्त, विश्वसनीय, शाश्वत व आधुनिक ऊर्जा उपलब्ध असल्याची खात्री करून देणे.

८) चांगल्या नोकऱ्या आणि अर्थशास्त्र : सर्वांसाठी, कायम चालू ठेवलेली (सस्टेन्ड), सर्वसमावेशक व शाश्वत आर्थिक वाढ, पूर्ण आणि फलदायी कामधंदा / नोकरी आणि योग्य काम मिळवून देण्यास मदत करणे.

९) नवीन उपक्रम आणि पायाभूत सुविधा : लवचिक पायाभूत सुविधा उभारणे, सर्वसमावेशक व शाश्वत उद्योगीकरण आणि भरभराटीस साह्य करणाऱ्या नवीन उपक्रमांना मदत करणे.

१०) असमानता कमी करणे : सर्व देशांमधील आणि देशांची आपापसांतील असमानता कमी करणे.

११) शाश्वत शहरे व वसाहती : शहरे व मानवी समाजांना सर्वसमावेशक, सुरक्षित, संवेदनक्षम व शाश्वत बनविणे.

हेही वाचा – UPSC-MPSC : पर्यावरणीय समस्या म्हणजे काय? त्याची मुख्य कारणे कोणती?

१२) उपलब्ध साधनांचा जबाबदारीपूर्वक वापर : साधनांचा शाश्वत उपभोग आणि उत्पादन नमुना यांची खात्री करून घेणे.

१३) हवामानाचा परिणाम : हवामानातील बदल आणि त्यांच्या परिणामांचे निराकरण करण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे.

१४) शाश्वत महासागर : शाश्वत विकासासाठी महासागर, समुद्र व सागरी साधने यांचे जतन करणे आणि त्यांचा सातत्याने वापर करणे.

१५) जमिनीचा शाश्वत उपयोग : जमिनीवरील पर्यावरण संस्थेचे रक्षण करणे, त्याची पुनर्स्थापना करणे, त्याचा शाश्वत वापर करण्यास मदत करणे, सातत्याने जंगलांची व्यवस्था बघणे, जंगले ओसाड होण्यापासून थांबवणे, जमिनीची धूप थांबवणे व धूप झालेल्या जमिनीची पुनर्स्थापना करणे आणि जैवविविधतेची हानी होण्यापासून थांबवणे.

१६) शांतता आणि न्याय : शाश्वत विकासासाठी शांतताप्रिय आणि सर्वसमावेशक समाजांना प्रोत्साहन देणे, सर्वांना न्याय मिळवून देणे, सर्व पातळ्यांवर कार्यक्षम, जबाबदार आणि सर्वसमावेशक संस्था स्थापन करणे

१७) शाश्वत विकासासाठी भागीदारी : शाश्वत विकासाची पूर्तता करण्याच्या पद्धती सामर्थ्यवान करणे आणि जागतिक भागीदारीमध्ये नवचैतन्य निर्माण करणे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc environment what is sustainable development goals and its objective mpup spb
First published on: 04-10-2023 at 17:46 IST