UPSC-MPSC With Loksatta : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी महत्त्वाचे’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे दररोज घडणाऱ्या घटनांचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
लोभ आणि गरज या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. लोभ, गरज, इच्छा व अहंकार यांमुळे वैवाहिक आणि वैयक्तिक जीवन बिघडू शकते. एका घटनेच्या आधारे हा विषय समजून घेणे यूपीएससी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल. नीतिशास्त्र हा विषय यूपीएससी-सीएसई सामान्य अध्ययन पेपर-IV अंतर्गत येतो. निबंधलेखन, संकल्पना स्पष्ट करा, व्यक्तिमत्त्व चाचणी याकरिता हा विषय महत्त्वाचा आहे.
काय आहे घटना?
अद्भुत हा अत्यंत हुशार आणि महत्त्वाकांक्षी मुलगा होता. लहानपणापासून त्याने मोठेपणी आयएएस होण्याचे ठरवले होते. तो त्या दृष्टीनं परीक्षेची तयारीदेखील करीत होता. त्यानं चार वेळा प्रीलिम परीक्षा आणि मुख्य परीक्षा दिलेल्या होत्या. परंतु, प्रत्येक वेळी मुलाखतीमध्ये त्याला एक-दोन गुण कमी मिळत. त्यामुळे त्याचं स्वप्न हुकत असल्यामुळे त्याला नैराश्य आलं होतं. कधी कधी त्याला स्वतःच्या क्षमता, बौद्धिकता याविषयी शंका वाटे. त्याची स्वप्नं मोठी होती. त्याला भरपूर पैसे कमावून, ऐषारामात राहायचं होतं; पण आयएएस होण्याचं स्वप्न आणि त्यात येणारे अपयश यामुळे तो खचला होता. त्याची अन्य क्षेत्रांत नोकरी करण्याची इच्छा नव्हती. पण, पैसे कमावण्याची इच्छा, श्रीमंतीत राहण्याची स्वप्नं यांमुळे त्यानं बऱ्यापैकी पैसे कमावले.
एक दिवस त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या लग्नाचा विषय काढला. तो त्यासाठी फार उत्सुक नसला तरी त्यानं नकार दिला नाही. त्यानं त्याच्या उंचीला म्हणजेच स्टेट्सला साजेशी मुलगी पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. वधूसंशोधनात त्यांना योग्य मुलगी भेटली. प्रतिभा ही अत्यंत हुशार, श्रीमंत, आयएएस ऑफिसर मुलगी होती. तिचं अद्भुतवर प्रेमदेखील होतं. त्यामुळे प्रतिभा आणि अद्भुत यांचं लग्न झालं.
लग्नानंतर पाच-सहा वर्षांनी त्यांनी समुद्रकिनाऱ्यापासून जवळच मोठं घर घेतलं. अद्भुतला कायम ऐषाराम आणि भव्य गोष्टी करायला आवडत. त्यामुळे त्याचं हे घरसुद्धा भव्य-दिव्य होतं. त्यानं सहजच प्रतिभाला विचारलं, ”तुला हे घरं कसं वाटलं? तू मोठी ऑफिसर आहेस. त्यामुळे अजून मोठं घर घेऊ शकतेस. पण, तरीही ३० कोटींचं घर बांधणं ही साधी गोष्ट नाही. तर तुला कसं वाटतंय?” प्रतिभा म्हणाली की, तुझं म्हणणं बरोबर आहे; पण माझ्यासाठी तू महत्त्वाचा आहेस. थोड्या वेळात त्यांच्याकडे एक व्यक्ती सुंदरशी नेमप्लेट घेऊन आली. त्या नेमप्लेटवर अद्भुत आणि प्रतिभा अशी नावं कोरलेली होती. प्रतिभाच्या नावाखाली लहान फॉन्टमध्ये आयएएस लिहिलेलं होतं. अद्भुत आणि प्रतिभा घराविषयी बोलत होते. पण, प्रतिभाचं लक्ष विशेषकरून तिच्या नावाकडे होतं. अद्भुतच्या हे लक्षात आलं. तो तिथून निघून गेला. प्रतिभा आनंदानं ती नेमप्लेट लावत होती. नेमप्लेट लावताना ती आईशी बोलत होती. ती म्हणाली, ”बघ, पैसा, सत्ता व प्रेम सर्व मला एकाच ठिकाणी मिळालं आहे.”
प्रतिभा नोकरीमध्ये उच्च पदावर कार्यरत होती. व्यवस्थित स्थिरस्थावर होती. त्याला त्याच्या परीक्षेचं अॅडमिट कार्ड आठवलं. रवींद्रनाथ टागोरांचं वाक्यही आठवलं की, जी आपली गोष्ट आहे, आपली क्षमता आहे; ती गोष्ट आपल्याला प्राप्त होईल.
घटनेमागील नीतिशास्त्र
अद्भुत हा मोठी स्वप्न, आकांक्षा व वास्तव यामध्ये मानसिक संघर्ष करीत होता. आयुष्यात येणाऱ्या अपयशामुळे त्याला स्वत:च्या क्षमतांबाबत शंका वाटत होती. त्याला आयएएस होण्याची इच्छा होती; पण त्याची पत्नी आयएएस झालेली होती. ती तिचं पद, यश यामध्येच गुंतून होती. तिचं अद्भुतवर प्रेम होतं; पण या प्रेमाच्या मागे पैसा, भौतिक सुख होतं. चांगला माणूस बनणं, चांगला सरकारी अधिकारी बनणं हे महत्त्वाचं आहे.