UPSC-MPSC With Loksatta : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्याअंतर्गतच आम्ही मुख्य परीक्षेच्या सरावाकरिता ‘लोकसत्ता टेस्ट सीरिज’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे तुमच्या सरावासाठी प्रश्न दिले जातात. तसेच त्याचे उत्तर कसे लिहावे, या संदर्भातील मार्गदर्शनही केले जाते. या लेखातून आपण मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन-१ च्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात जाणून घेऊ.
प्रश्न क्र. १ : विजयनगर साम्राज्याच्या काळात भारताच्या स्थापत्यकलेने एक वेगळा आणि प्रभावशाली कालखंड कसा अनुभवला, चर्चा करा.
या प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे :
मुख्य परीक्षेत उत्तर लिहिताना ते साधारणत: तीन भागांत असावे. एक म्हणजे परिचय, दुसरा म्हणजे मध्य भाग व तिसरा म्हणजे निष्कर्ष.
परिचय : उत्तर लिहिताना परिचय हा साधारण तीन ते चार ओळींचा असावा; एका ओळीचा परिचय लिहू नये. त्यामध्ये मूलभूत माहिती किंवा एखादी व्याख्या असावी.
मुख्य उत्तर : हा तुमच्या उत्तराचा मुख्य भाग असतो. त्यामुळे प्रश्न विचारणाऱ्याला नेमके काय अपेक्षित आहे ते समजून घ्यावे. त्यानुसार संक्षिप्त स्वरूपात उत्तर लिहावे. मोठे परिच्छेद किंवा पॉइंटर स्वरूपात उत्तर लिहू नये. त्याबरोबरच सरकारद्वारे प्रकाशित आकडेवारी किंवा माहिती वापरून आपले उत्तर सर्वसमावेशक होईल, याकडे लक्ष द्यावे. महत्त्वाचे शब्द पेन्सिलने अधोरेखित करावेत आणि गरज असेल तिथे आकृत्यांचा वापर करावा. त्यामुळे तुमची उत्तरे अधिक आकर्षक होतील.
निष्कर्ष : तुमच्या उत्तराचा शेवट सकारात्मक असावा. जर तुम्हाला वाटत असेल की, एखादा महत्त्वाचा मुद्दा किंवा एखादी समस्या अधोरेखित करणे आवश्यक आहे, तर तुम्ही ती तुमच्या निष्कर्षात लिहू शकता. मात्र, निष्कर्ष लिहिताना तुमच्या उत्तराचा परिचय किंवा मुख्य भागातील मुद्द्यांची पुनरावृत्ती होणार नाही, असा प्रयत्न करा. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेल्या अहवाल किंवा सर्वेक्षणांचे निष्कर्ष वापरू शकता.
हेही वाचा – UPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सिरीज – ३७
वरील प्रश्नांच्या उत्तरांत तुम्ही खालील मुद्द्यांचा वापर करू शकता :
प्रश्न क्र. १ : विजयनगर साम्राज्याच्या काळात भारताच्या स्थापत्यकलेने एक वेगळा आणि प्रभावशाली कालखंड कसा अनुभवला, चर्चा करा.
उत्तर :
परिचय :
संगमा साम्राज्याच्या राजा हरिहरा पहिला याने विजयनगर साम्राज्याची स्थापना केली होती. हे साम्राज्य १३३६ ते १६६४ या काळात अस्तित्वात होते. पुढे कृष्णदेवराय याचा काळ (१५०९ ते १५२९) हा विजयनगर साम्राज्यासाठी सुवर्णकाळ होता. या काळात विजयनगर साम्राज्याने बहामनी साम्राज्य, गोवळकोंड्याचा सुलतान व ओडिशातील गजपतींवर विजय मिळवला.
मुख्य उत्तर :
विजयनगर साम्राज्याने कला, संस्कृती व स्थापत्यशास्त्रात महत्त्वपूर्व योगदान दिले. या साम्राज्याच्या काळात तमीळ, तेलुगू, कन्नड भाषेतील कविता, लेखनशैली व साहित्याची भरभराट झाली. विजयनगर साम्राज्याच्या स्थानाविषयी बोलायचे झाल्यास, हे साम्राज्य तुंगभद्रा नदीच्या खोऱ्यात वसले होते. ही नदी उत्तर-पूर्व दिशेने वाहते.
१५ व्या शतकात पर्शियाच्या शासकाने त्याचा राजदूत विजयनगर साम्राज्यात पाठवला होता. त्यावेळी येथील किल्ल्याची तटबंदी बघून तो प्रभावित झाला. त्याच्या म्हणण्यानुसार, या किल्ल्याची तटबंदी ही केवळ किल्ल्यापुरती मर्यादित नव्हती; तर या तटबंदीने आजूबाजूच्या शेतीलाही वेढा घातला होता. वास्तविक ही तटबंदी शहराबाहेर असलेल्या टेकडीपर्यंत होती. त्याबरोबरच या किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी सुसज्ज आणि मोठा दरवाजा होता. त्यावर कोरीव काम केले होते.
या प्रदेशातील मंदिरांनाही मोठा इतिहास आहे. येथील मंदिरांची निर्मिती ही पल्लव, चालुक्य, होयसळ व चोल या राजघराण्यांपासून झाली होती. ही मंदिरे त्या काळी शिक्षणाची मुख्य केंद्रे होती. येथील हजारा राम मंदिरावर तर रामायणातील दृश्ये कोरली होती.
विरुपाक्ष मंदिर : या मंदिराला मोठा इतिहास आहे. काही शिलालेखांवरून असे लक्षात येते की, येथील पहिल्या मंदिराची निर्मिती नवव्या ते ११ व्या शतकादरम्यान झाली असावी. विजयनगर साम्राज्याच्या निर्मितीसह या मंदिराचा विस्तार झाला. या मंदिरासमोरील सभामंडप हा कृष्णदेवराय याने आपल्या राज्यस्थापनेचे प्रतीक म्हणून बांधला. पुढे विविध कार्यक्रमांसाठी या सभामंडपाचा वापर करण्यात आला.
निष्कर्ष :
विजयनगर साम्राज्याचा काळ हा सांस्कृतिक पुराणमतवादाचा काळ म्हणून ओळखला जातो. कारण- त्यावेळी भारतीय उपखंडात, विशेषत: उत्तरेकडे ज्या प्रकारे मुस्लीम शासकांद्वारे विस्तारवादी नीती अवलंबली जात होती, अशा वेळी विजयनगर साम्राज्याने हिंदू संस्कृतीचे जतन केले. महत्त्वाचे म्हणजे आज विजयनगर साम्राज्याची राजधानी राहिलेल्या हंपीला युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे.