काही दिवसांपूर्वीच हिमाचल प्रदेशमध्ये आणि उत्तराखंडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. यावेळी बऱ्याच ठिकाणी भूस्खलनाच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे ढगफुटी म्हणजे नेमके काय आहे? ढगफुटी ही सामान्य घटना आहे का? ढगफुटीचा अंदाज आधी वर्तवता येतो का? याविषयी जाणून घेणे गरजेचे आहे. हा विषय संघ लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन-३ या पेपरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
हेही वाचा –UPSC-MPSC : पर्यावरण : ओझोन अवक्षय म्हणजे काय?
ढगफुटी म्हणजे काय?
ढगफुटी ही एका ठिकाणी होणारी तीव्र पर्जन्यमानाची क्रिया आहे. साधारणत: मैदानी आणि डोंगराळ प्रदेशात ढगफुटीच्या घटना घडतात. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होत असेल, तर त्याला ढगफुटी म्हणता येणार नाही. ढगफुटीची एक विशिष्ट व्याख्या आहे. त्यानुसार सुमारे १० किमी X १० किमी परिसरात एका तासात १० सेंमी किंवा त्याहून अधिक पाऊस पडत असेल, तर त्याला ढगफुटी म्हणतात. त्यानुसार अर्ध्या तासात पाच सेंमी पाऊस पडत असेल तरीदेखील त्याला ढगफुटी म्हणून घोषित केले जाते.
भारतात साधारणत: एका वर्षात सुमारे ११६ सेमी पाऊस पडतो. मात्र, काही ठिकाणी भौगोलिक रचनेेनुसार यापेक्षा १० पट जास्तही पाऊस पडतो. याची मागील काही वर्षांतील उदाहरण द्यायच झाल्यास २६ जुलै २००५ रोजी मुंबईत झालेल्या पावसाचे देता येईल. त्यावेळी मुंबईत २४ तासांत ९४ सेंमी पावसाची नोंद झाली होती. तसेच या घटनेत ४०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता आणि जवळपास एक अब्ज डॉलरचे नुकसान झाले होते.
ढगफुटी होणे ही सामान्य घटना आहे का?
ढगफुटी ही काही सामान्य घटना नाही. मात्र, पावसाळ्यात हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या राज्यांमध्ये अशा घटना सातत्याने घडतात. काही ठिकाणी पर्जन्यमापन यंत्रांअभावी या घटनांची नोंदही होत नाही. ज्यावेळी एखाद्या प्रदेशात मुसळधार पाऊस पडतो, मोठ्या प्रमाणात भूस्खलनाच्या घटना घडतात, महापूर येतो आणि परिणामत: संपत्तीचे नुकसान होऊन जनजीवन विस्कळित होते. अशा वेळी ढगफुटी जाहीर केली जाते आणि त्यावेळी ढगफुटी जाहीर करण्यासाठी लागणारे निकष तपासले जात नाहीत.
ढगफुटीचा अंदाज येऊ शकतो का?
हवामान विभागाद्वारे पावसाचा अंदाज आधीच वर्तवला जातो. मात्र, पाऊस किती सेंमी पडेल, याचा अंदाज ते वर्तवू शकत नाहीत. ते ढोबळमानाने पावसाचा अंदाज वर्तवतात. त्याशिवाय हवामान विभागाकडून वर्तवण्यात येणारा अंदाज मोठ्या भौगोलिक क्षेत्रासाठी असतो. ते एखाद्या विशिष्ट लहान क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज वर्तवू शकत नाहीत. याचाच अर्थ काय तर एखाद्या विशिष्ट भागात ढगफुटीच्या घटनेचा अंदाज वर्तवला जाऊ शकत नाही. हवामान विभागाने ज्या ठिकाणी अतिमुसळधार पावसााची शक्यता वर्तवली आहे, अशा ठिकाणी ढगफुटी होण्याची शक्यता जास्त असते. असे अंदाज साधारण सहा ते १२ तासांपूर्वी वर्तवले जातात.
डोंगराळ राज्यांमध्ये भूस्खलन
काही वर्षांपासून पावसाळ्यात हिमालयीन राज्यांमध्ये भूस्खलनाच्या घटना सातत्याने वाढत आहेत. या राज्यांमध्ये होणारी जंगलतोड, शेतीमध्ये झालेले बदल आणि इतर विकासकामे यांसाठी कारणीभूत आहेत. या संदर्भात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट (NIDM) यांनी ‘लँडस्लाईड हॅझार्ड झोन अॅटलस ऑफ इंडिया’ हा अहवाल प्रकाशित केला होता. त्यानुसार हिमाचल प्रदेशमधील जवळपास ३८ हजार चौरस किमीपेक्षा जास्त क्षेत्र धोकादायक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. शिवाय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) २०१९ साली प्रकाशित केलेल्या एका अहवालातही भूस्खलनाच्या घटनांना शहरी नियोजनाचा अभाव आणि अनियंत्रित बांधकाम जबाबदार असल्याची टिप्पणी केली होती.
हेही वाचा – UPSC-MPSC : ‘आम्ल वर्षा’ म्हणजे काय? त्याची कारणे कोणती?
“मागील काही वर्षांत ढगफुटी आणि त्यामुळे भूस्खलन, पूर येण्याच्या घटना वाढल्या आहेत. या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागात करण्यात आलेले बहुतेक बांधकामांमध्ये मानक नियमांचे पालन करण्यात आले नसून सरकारी विभागाकडूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ही चिंताजनक बाब आहे”, असे या अहवालात म्हटले होते.