सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील काही लेखांतून आपण दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, आशिया व आफ्रिका या खंडांविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण अंटार्क्टिका खंडाविषयी जाणून घेऊ. अंटार्क्टिका हा एकमेव खंड असा आहे; जो अंटार्क्टिक सर्कलच्या जवळजवळ संपूर्णत: दक्षिणेस आहे. अंटार्क्टिका म्हणजे ‘ऑपोझिट द आर्क्टिक’ म्हणजेच आर्क्टिक महासागराच्या (उत्तर गोलार्ध) विरुद्ध दिशेला असलेला खंड होय. हा पृथ्वीवरील पाचव्या क्रमांकाचा खंड आहे. बर्फाच्या प्रचंड जाडीमुळे या खंडाचा भूभाग संपूर्णपणे झाकलेला आहे. या ठिकाणी बर्फाची खोली ४,८०० मीटरपर्यंत आहे. हे जगातील सर्वांत थंड ठिकाणांपैकी एक आहे. तसेच अंटार्क्टिकामध्ये अनेक ज्वालामुखीसुद्धा आहेत, त्यापैकी काही सक्रिय (Active Volacanoes) आहेत. अंटार्क्टिकाचा ९८ टक्के भूभाग बर्फ आणि हिमनद्यांनी व्यापलेला आहे; ज्यात जगातील ७० टक्के ताजे पाणी सामावले असल्याचे मानले जाते. अंटार्क्टिका तांबे, सोने, निकेल, पेट्रोलियम व प्लॅटिनम या संसाधनांनी समृद्ध आहे.

अंटार्क्टिका खंडाची ठळक वैशिष्ट्ये

या खंडाने पृथ्वीच्या एकूण भूभागांपैकी ९.३% क्षेत्र व्यापले आहे. येथील सर्वांत मोठी हिमनदी (Glacier) लॅम्बर्ट ग्लेशियर असून, ती ५० मैल (८५ किमी) रुंद, २५० मैल (४०० किमी)पेक्षा जास्त लांब आणि सुमारे २,५०० मीटर खोल आहे. सर्वांत मोठी आइस-शेल्फ एमरी (Amery) शेल्फ, रॉन्ने (Ronne) शेल्फ व रॉस (Ross) शेल्फ ही आहेत. विशेष म्हणजे अंटार्क्टिकामध्ये कोणताही देश नाही. याउलट तिथे अनेक देशांनी संशोधन केंद्रे उभारलेली आहेत. त्यामध्ये सर्वांत मोठे संशोधन केंद्र मॅकमुर्डो नामक यू.एस.ए. देशाचे आहे. या संशोधन केंद्रांवर राहणारी तात्पुरती लोकसंख्या हिवाळ्यात २५०, तर उन्हाळ्यात १,००० इतकी सीमित आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : उत्तर अमेरिका खंड; पर्वत, पठारे, नद्या अन् त्यांची वैशिष्ट्ये

अंटार्क्टिकामधील भारतीय स्थानके

अंटार्क्टिक प्रदेशात मानवाने पहिल्यांदा १७७३ मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तब्बल २०८ वर्षांनी भारताने हे यश संपादन केले आणि अंटार्क्टिकात प्रवेशणारे भारत हे १७ वे राष्ट्र ठरले.

दक्षिण गंगोत्री : १९८१ च्या नोव्हेंबरअखेरीस डॉ. कासिम यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या मोहिमेस प्रारंभ झाला. ९ जानेवारी १९८२ रोजी ही धाडसी मोहीम फत्ते झाली आणि पहिल्यांदा अंटार्क्टिकावर भारताचा तिरंगा फडकला.

मैत्री (संशोधन केंद्र) : हे अंटार्क्टिकामधील भारताचे दुसरे कायमस्वरूपी संशोधन केंद्र आहे. जानेवारी १९८९ मधे डॉ. बी. बी. भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखालील टीमसह या केंद्राची स्थापना करण्यात आले. मैत्री हे नाव तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुचवले होते. जीवशास्त्र, ग्लेशियोलॉजी, पृथ्वी विज्ञान, हवामानशास्त्र याविषयीचे संशोधन या केंद्रावर होते.

अंटार्क्टिका खंडावर घडणाऱ्या नैसर्गिक घटना (Natural Phenomenon)

अरोरा : हिवाळ्यात, ध्रुवीय प्रदेशात तीन महिने सतत रात्र असते. या काळात या काळोख्या रात्रींवर चमकदार रंगीत दिव्यांचा प्रकाश दिसतो. हा प्रकाश वरच्या वातावरणातील चुंबकीय वादळांमुळे (Earth’s magnetic field) निर्माण होतो. एकंदरीत अरोरा हे सौरवाऱ्यामुळे चुंबकीय क्षेत्रामध्ये होणार्‍या व्यत्ययाचे परिणाम आहेत. त्यांना अरोरा ऑस्ट्रलिस (Southern lights /aurora australis ) असे म्हणतात.

अंटार्क्टिका खंडातील सर्वांत जुना बर्फ पूर्वेकडे आहे. या भागात क्रॅटॉन नावाच्या खडकांच्या केंद्रकांच्या स्वरूपात खंडीय अवशेष आहेत. तर, पश्चिमेकडील भागावर अनेक वेळा भूगर्भीय क्रियाकलापांमुळे खडकांची पुनर्रचना केली गेली आहे.

अंटार्क्टिका खंडाची भौगोलिक वैशिष्ट्ये

पश्चिम अंटार्क्टिक कॉर्डिलेरा : हे ज्वालामुखी आणि भूकंपांचे वर्चस्व असलेले ठिकाण आहे; ज्याचे मूळ दक्षिण अमेरिका खंडातील अँडीज पर्वतरांगेशी संलग्न असल्याचे म्हटले जाते.

ट्रान्सअँटार्क्टिक पर्वत : याची उत्पत्ती एका फॉल्ट भूकंपाने झाली असल्याचे मत आहे. ही सुमारे ३,००० किमी लांबीची पर्वतश्रेणी आहे. त्यावर असलेला सर्वांत प्रसिद्ध माउंट एरेबस ज्वालामुखी अजूनही सक्रिय आहे आणि तो सतत क्लोरिन उत्सर्जित करतो.

अंटार्क्टिकाची नैसर्गिक संसाधने : अंटार्क्टिकामध्ये कोणती खनिज संसाधने आहेत, हे अचूकपणे जाणून घेणे कठीण आहे. कारण- ते जाड बर्फाच्या चादरीने वेढलेल्या खडकात पुरली गेली आहेत. असे मानले जाते की, बर्फाखाली मोठ्या आणि मौल्यवान खनिजांचे साठे आहेत. हे उघडकीस आलेल्या खडकाच्या छोट्या भागातून घेतलेल्या नमुन्यांमध्ये आढळून आले आहे.

खनिजे : लोह खनिज, क्रोमियम, तांबे, सोने, निकेल, प्लॅटिनम आणि इतर खनिजे, तसेच कोळसा व हायड्रोकार्बन्स अल्प प्रमाणात या खंडात सापडली आहेत. अंटार्क्टिक कराराच्या पर्यावरण प्रोटोकॉलद्वारे वैज्ञानिक संशोधन वगळता इथे खनिज खणनावर बंदी आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : आशिया खंड; भौगोलिक स्थान, क्षेत्रफळ, लोकसंख्या अन् हवामान

अंटार्क्टिका खंडाची जैवविविधता

पेट्रेल्स, पेंग्विन, कॉर्मोरंट्स व गुलच्या प्रजातींसह अंटार्क्टिकावर किंवा त्याजवळ प्रजनन करणाऱ्या सुमारे ४० पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. अंटार्क्टिक प्रदेशात बुरशीच्या सुमारे १,१५० प्रजाती नोंदल्या गेल्या आहेत. अंटार्क्टिकामधील एकपेशीय वनस्पतींच्या ७०० प्रजातींपैकी निम्म्या प्रजाती समुद्री फायटोप्लँक्टन आहेत. परंतु, अंटार्क्टिकाचे हवामान विस्तृत वनस्पती तयार होऊ देत नाही; ज्यामुळे कमी आणि मर्यादित प्रजातींची विविधता आढळते.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc geography antarctica continent cold desert weather and mountain ranges mpup spb
Show comments