सागर भस्मे
मागील काही लेखांतून आपण पृथ्वीचे हवामान, वायुदाब पट्टे, वाऱ्याची दिशा, पृथ्वीवरील समुद्र, समुद्री प्रवाह इत्यादींबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण पृथ्वीवरील स्थित खंडांपैकी एक असलेल्या आशिया खंडासंदर्भात जाणून घेऊ.
भौगोलिक स्थान, क्षेत्रफळ आणि लोकसंख्या
मलेशियाच्या दक्षिण टोकापासून ते रशियाच्या केप चेल्युस्किनपर्यंत आशिया खंडाचा विस्तार आहे. उरल पर्वतरांगा, उरल नदी, कॅस्पियन समुद्र, काकेशस पर्वतरांगा व काळा समुद्र युरोपपासून आशिया खंडाला वेगळे करतात. तर, लाल समुद्र आणि सुएझ कालवा हे आफ्रिका खंडापासून आशिया खंडाला वेगळे करतात. तसेच पूर्वेकडील बेअरिंग स्ट्रेट आशियाला अमेरिकेपासून वेगळे करते. आशिया हे सर्वांत मोठे आणि सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले खंड आहे. आशियाचे क्षेत्रफळ (बेटांसह) ४,४६,००,८५० चौ. किमी. असून, या एकट्या खंडाने पृथ्वीवरील सुमारे ३० टक्के जमीन व्यापलेली आहे. आशिया खंडाची लोकसंख्या एकूण जगाच्या लोकसंख्येच्या जवळजवळ दोन-तृतीयांश एवढी आहे. मंगोलिया हा आशियातील सर्वांत विरळ लोकसंख्या असलेला देश आहे; तर आशियातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता इंडोनेशियाच्या जावा बेटावर आढळते.
हेही वाचा – UPSC-MPSC : भारतीय उपखंडाची निर्मिती कशी झाली? भारताची भौगोलिक रचना कशी?
आशिया खंडातील धर्म
आशिया खंड हा यहुदी, ख्रिश्चन, इस्लाम, कन्फ्युशियन, हिंदू, बौद्ध, जैन व शीख धर्माचे जन्मस्थान आहे. आशिया खंडात एकूण ४८ देश आहेत. त्यामध्ये श्रीलंका (सिलोन), पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश, नेपाळ, भूतान, भारत, अफगाणिस्तान, इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमीर राज्ये, कतार, बहरीन, ओमान, येमेन, जॉर्डन, सीरिया, इस्रायल, लेबानन, तुर्कस्तान, मंगोलिया, चीन, तैवान, उत्तर व दक्षिण कोरिया, जपान, नाऊरू, फिलिपिन्स, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, ब्रूनेई, इंडोनेशिया व मालदीव हे देश असून, ब्रिटिश सत्तेखालील हाँगकाँग, मकाव व तिमोर बेटांचा भाग आणि अरबस्तानातील काही अशासकीय प्रदेशांचाही यात समावेश होतो. इजिप्तचा सिनाई भाग आशियातच मोडतो; तसेच सायप्रस बेटही आशियातच येते.
आशिया खंड हे देशांच्या स्थानावरून खालीलप्रमाणे विभागलेले आहे :
१) दक्षिण-पश्चिम आशिया : यात अफगाणिस्तान, इराण, इराक, इस्रायल, जॉर्डन, लेबनॉन, सीरिया व तुर्कस्तान यांचा समावेश आहे.
२) दक्षिण आशिया : या प्रदेशात बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान व श्रीलंका यांचा समावेश होतो.
३) दक्षिण पूर्व आशिया : या प्रदेशात ब्रुनेई, इंडोनेशिया, लाओस, कंपुचिया (कंबोडिया), मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स व व्हिएतनाम यांचा समावेश आहे.
४) पूर्व आशिया : यात चीन, जपान, उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांचा समावेश होतो.
५) मध्य आशिया : यात कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान व उझबेकिस्तान या प्रजासत्ताकांचा समावेश आहे.
६) उत्तर आशिया (सायबेरिया) : रशियाच्या आशिया खंडात असलेल्या सर्वांत उत्तरेकडील भागाला सायबेरिया म्हणून ओळखले जाते.
आशिया खंडाचे हवामान
आशिया खंडात सायबेरियाच्या आर्क्टिक समशीतोष्ण हवामानापासून ते उष्ण कटिबंधीय हवामानपर्यंत विविधता पाहावयास मिळते. खंडाच्या अंतर्गत भागातील हवामान अतिशय विषम असल्याने या भागात उन्हाळा अतिउष्ण; तर हिवाळा अतिथंड असतो. आशियाच्या एक-तृतीयांश भागावर पाऊस किंवा हिम या रूपांनी पाऊस पडतो. हिंदी महासागरावरून येणारे मान्सून वारे हिमालयाच्या दक्षिणेस आणि सिंधू खोऱ्याच्या पूर्वेस पाऊस देतात.
आशिया खंडातील पर्वतरांगा
आशिया खंडात पामीर गाठ (Pamir knot)पासून सर्व पर्वतरांगा निघतात. भारतात या पर्वतरांगांना हिमालय, चीनमध्ये कुणलून शान, तर पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये जाणाऱ्या रांगांना हिंदकुश, सुलेमान अशी नावे आहेत. २,४०० किलोमीटरची हिमालय पर्वतरांग ही आशिया खंडातील सर्वांत लांब पर्वतरांग आहे. हिमालयात वसलेले नेपाळ देशातील माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वांत उंच शिखर आहे; ज्याची उंची ८,८४८ मीटर आहे. त्यांच्याव्यतिरिक्त इराणमध्ये झग्रोस (Zagros), रशियामध्ये वरखुयांस (Verkhoyanks) व उरल, इस्रायलमध्ये माउंट कार्मेल, जपानमध्ये हिद (Hida), किशो (Kiso) अकैसी (Akaisi) या पर्वतरांगा आहेत.
हेही वाचा – UPSC-MPSC : भारतातील राज्ये, केंद्रशासित प्रदेश अन् त्यांची निर्मिती
आशिया खंडात असणाऱ्या प्रमुख नदीप्रणाली :
आशियाला महत्त्वाच्या अशी विविध नदीखोऱ्यांचा लाभ झाला आहे. ती विविध परिसंस्थांना समर्थन देतात आणि जैवविविधता वाढविण्यास मदत करतात. चीनमधील यांग्त्झी नदीखोऱ्यापासून ते भारत आणि बांगलादेशमधील सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण गंगा-ब्रह्मपुत्रा-मेघना खोऱ्यापर्यंतच्या या जलप्रणाली आशिया खंडाच्या इतिहास आणि संस्कृतीवर प्रभाव टाकण्यात महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. भारत-बांगलादेशमधील गंगा-ब्रह्मपुत्रा नदीप्रणाली, चीनमधील यांगत्झे व यल्लो नदीखोरे, पूर्व आशियातील मेकाँग नदीखोरे, भारत व पाकिस्तानमधील सिंधू नदीप्रणाली, इराण, इराक, तुर्कस्तान या तीन देशांमध्ये असणारी टिग्रिस – युफ्रटीस नदीप्रणाली अशा अनेक लहान-मोठ्या नदीखोर्यांनी आशिया खंडाचे क्षेत्र बनलेले आहे.