सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखातून आपण महाराष्ट्रातील ऊर्जा संसाधनांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण महाराष्ट्राचे हवामानशास्त्र समजून घेऊ या. महाराष्ट्र राज्य कर्कवृत्ताच्या (२३°३०’ उ) खाली स्थित असल्यामुळे ते उष्ण कटिबंधीय हवामान क्षेत्रात येते आणि त्यामुळे राज्यात उष्ण हवामान आढळून येते. महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यालाच आपण कोकण किनारपट्टी संबोधतो. कोकण किनारपट्टीस अरबी समुद्राच्या सान्निध्यामुळे खारे वारे व मतलई वारे यांचा फायदा मिळतो. तर, दख्खनचे पठार हे सह्याद्री पर्वतामुळे अरबी समुद्रापासून अलग झालेले आहे. म्हणून मराठवाडा व विदर्भ हे भाग खंडांतर्गत (कॉन्टिनेन्टल) प्रदेशात येत असल्याने त्यांच्यावर सागरी वाऱ्यांचा परिणाम होत नाही. त्यामुळे कोकण व पठारावरील तापमानामध्ये बरीच तफावत दिसते. २१ मार्चनंतर उत्तर गोलार्धात सूर्यकिरणे लंबरूप पडण्यास प्रारंभ होतो, तसेच दिवसाचा कालावधी वाढत जातो. महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान सुमारे १६° उ. अक्षांश ते २२° उ. अक्षांशांदरम्यान असल्याने या काळात तापमान वाढत जाते.

हेही वाचा – UPSC-MPSC : क्षयक्षम ऊर्जासंपत्ती म्हणजे काय? महाराष्ट्रातील कोणत्या भागात ही ऊर्जा संसाधने आढळतात?

महाराष्ट्रातील तापमान

महाराष्ट्राचा प्रदेश हा विषुवृत्ताच्या भागाजवळ असल्यामुळे तसेच कर्कवृत्त व मकरवृत्तादरम्यान असल्यामुळे (Tropic zone) महाराष्ट्राच्या भूभागावर सतत सूर्यप्रकाश बघायला मिळतो. त्यामुळे महाराष्ट्राचे सरासरी तापमान २५° से ते ३०° से.दरम्यान असते.

राज्यातील वेगवेगळया प्रदेशांचे उन्हाळ्यातील दैनिक कमाल तापमान

कोकणात दैनिक कमाल तापमान ३०° से. ते ३३° से.दरम्यान आढळते. रत्नागिरीस ३२° से.; तर मुंबईला ३३° से. तापमान असते. याचदरम्यान दख्खनच्या पठारावरील तापमान ३५°से. ते ४०° से.पर्यंत वाढते. पुण्याला ३७° से. व सोलापूरला ४१° से.पर्यंत तापमान वाढत जाते. तसेच आणखी पूर्वेकडे गेल्यास विदर्भामध्ये अतिशय तप्त उन्हाळा अनुभवास येतो. नागपूर व अमरावती भागात तर ४२°से. ते ४३° से.च्या आसपास तापमान असते.

उन्हाळ्यात खानदेश व विदर्भात ४६° से. ते ४८° से.पर्यंत तापमान वाढत असल्याची नोंद आहे. कोकणात जास्तीत जास्त तापमान ४१° से.पेक्षा जास्त वाढत नाही. याचे कारण असे की, समुद्रसानिध्याच्या प्रदेशांमध्ये सम तापमान आढळत असून, तापमान कक्षा खूप मोठी नसते. महाराष्ट्रातील किमान दैनिक तापमान बघितल्यास प्रदेशानुसार दैनिक किमान तापमानात बदल झाल्याचे आपल्याला दिसते. उत्तर कोकणात दैनिक किमान तापमान २६° से. ते ३१° से.; तर दक्षिण कोकणात २४° ते २७° से.दरम्यान असते. पुणे व सोलापूरला दैनिक किमान तापमान अनुक्रमे २२° से. व २५° से.; तर अमरावती व नागपूर भागात २८° से.च्या आसपास दैनिक किमान तापमान असते.

वरील माहितीवरून असे आढळते की, उन्हाळ्यात काही महत्त्वाच्या शहरांच्या दैनिक तापमान कक्षा कुठे जास्त; तर कुठे खूप कमी आहेत. जसे की, कोकणात दैनिक तापमान कक्षा ५° ते ६° से. दरम्यान असते; तर त्या मानाने पठारावर दैनिक तापमान कक्षा वाढत जाते. पुणे, सोलापूर, नागपूर या भागांत तापमान कक्षा १५° से.पेक्षा जास्त असते. मे महिन्यातील अतिशय कडक ऊन असणाऱ्या दिवसाचे तापमान पाहिले असता, आपल्या लक्षात येते की, विदर्भामध्ये किती असहनीय उन्हाळा असतो. उदाहरणार्थ, नागपूरमध्ये दिवसाचे तापमान ४८° से.पर्यंत वाढत जाते आणि रात्रीचे तापमान १९° से.पर्यंत खाली घसरते. म्हणजेच त्या ठिकाणी दैनिक तापमान कक्षा २९° से.पर्यंत असते. म्हणूनच विदर्भासारख्या प्रदेशात हवामान विषम स्वरूपाचे आहे. याचे असेही कारण आहे की, हा प्रदेश भारताच्या मध्य भागात असून, तो अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरापासून अतिदूर असल्याने थंड सागरी वाऱ्यांचा उपयोग तापमानातील ही तफावत कमी करण्यास होत नाही. म्हणजेच विदर्भ विभागातील हवामान खंडीय हवामानात मोडते.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रात खनिजसंपत्ती प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते?

सरासरी संपूर्ण राज्याचा विचार केल्यास महाराष्ट्रात मे महिन्यात ४२.५° से.पेक्षा जास्त सरासरी कमाल तापमान आढळते. विदर्भाच्या पूर्व भागात भंडारा, गोंदिया व चंद्रपूर हे संपूर्ण जिल्हे आणि नागपूर जिल्ह्याचा पूर्व भाग, वर्धा जिल्ह्याच्या पूर्व भाग व गडचिरोलीच्या उत्तर भागात उच्च तापमान कक्षा आहे. महाराष्ट्रात सर्वांत जास्त तापमानाची नोंद यवतमाळ जिल्ह्यात पुसद येथे ८ एप्रिल १९९० रोजी ४९.९° से. झालेली आहे. त्याखालोखाल जळगाव व वर्धा ४८.४° से. अशी नोंद आहे. यावरून असे लक्षात येईल की, महाराष्ट्रात मराठवाडा, खानदेश व विदर्भात मे महिन्यात सरासरी कमाल तापमान ४०° से.पेक्षा जास्त पाहायला मिळते.

संपूर्ण हवामाशास्त्र जर एकंदरीत विचारात घेतले, तर हवामानाचा सर्व खेळ हा हवेची दिशा, दाब व तापमान यावर अवलंबून आहे. आपण वरती तापमानाबद्दल बघितले आहे. आता आपण राज्यातील हवेचा दाब व वाऱ्याची दिशा याबद्दल पाहू. उन्हाळ्यात तापमान वाढत गेल्याने साहजिकच हवेचा दाब कमी कमी होत जातो आणि कोकण किनारपट्टीस समभार रेषा समांतर होत जातात. उन्हाळ्याच्या सुरुवातीस समभार रेषांमधील अंतर जास्त असल्यामुळे वायुभाराचा उतार मंद स्वरूपाचा असतो. एप्रिल व मे महिन्यात जसजसा उन्हाळा कडक होत जातो तसतशा समभार रेषा जवळजवळ येऊ लागतात आणि वायुभार/दाब तीव्र होत जातो. अरबी समुद्रावरील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहू लागतात आणि किनारपट्टीवर दुपारच्या कडक उन्हानंतर आरोह प्रकारचा पाऊस देतात. मराठवाडा व विदर्भात उन्हाळ्याच्या शेवटच्या कालखंडात धुळीची वादळे निर्माण होतात. खंडांतर्गत प्रदेशात उन्हाळा तीव्र स्वरूपाचा असल्याने अमरावती, अकोला, नागपूर, तसेच खानदेशात धुळे व जळगाव इथे उष्माघाताने लोक मृत्युमुखी पडतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्राची भूगर्भ रचना नेमकी कशी आहे?

या वाऱ्याच्या उलटसुलट परिस्थितीमुळे ऋतूंची निर्मिती होते. महाराष्ट्रात भारताप्रमाणे मुख्यत्वे तीन ऋतू आहेत :

  • उन्हाळा : मार्च ते मे
  • पावसाळा : जून ते सप्टेंबर
  • हिवाळा : ऑक्टोबर ते फेब्रुवारी

महाराष्ट्र राज्याचे पर्जन्य आणि उर्वरित हवामानशास्त्र यांची सविस्तर चर्चा पुढील लेखात करू या.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc geography climate of maharashtra mpup spb
First published on: 16-10-2023 at 19:54 IST